‘सखू, अगं उद्या जरा वेळ काढून ये बरं का! दिवाळीच्या फराळाची तयारी करू या.’ ‘व्हय, व्हय, येते. म्हंजी मला बी नंतर गडबड नाय व्हनार. आन् हे काय आपलं वासरू न्हाय आलं व्हय अजून?’ तेवढ्यात दार धाडकन वाजलंच. ओवी हातात काहीतरी फडकवत धावत आजीजवळ आली. ‘आजी, बघ आम्हाला काय दिलंय शाळेतून.’ आजी तिला कुरवाळत म्हणाली, ‘काय ग हे? पावती पुस्तक दिसतंय. गणेशोत्सव संपला, नवरात्र पार पडलं. आता कसल्या पावत्या फाडायच्या?’ ओवी अगदी मोठ्या माणसाचा आव आणून सांगू लागली, ‘आजी, आणि हो सखू मावशी, तुम्हीसुद्धा ऐका. या भाऊबीज निधीच्या पावत्या आहेत. फक्त दहा रुपयाची एक. आमच्या संस्थेत गरीब, गरजू; पण शिकण्याची तळमळ असणार्‍या विद्यार्थिनींना यातून मदत केली जाते. गेल्या नव्वद वर्षांपासून ही योजना चालू आहे.’
सखू ओवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ‘लय पुन्याचं काम करतीस बयो. हे घे धा रुपे माझं.’ ओवीला खूप आनंद झाला. तिला आश्‍चर्यही वाटले. सखू मावशी किती गरीब, तरी लगेच दहा रुपये काढून दिले! त्यावर आजी म्हणाली, “अगं, अगदी गाईसारखी आहे आपली सखू.
‘तृणं खादति केदारे जलं पिनति पल्वले
दुग्धं यच्छति लोकभ्यो धेनुनो जननी प्रिया॥’
बघ, गाय कशी कुठेही रानावनात गवत खाते, कुठलेही डबक्यातले पाणी पिते; पण आपल्याला पौष्टिक, सकस दूध देते. जणू काही आईप्रमाणे आपले पोषण करते.” ‘खरंच गं, आपल्या सखू मावशीसुद्धा झोपडीत राहतात, शिळपाकं खातात; पण त्यांचं मन किती मोठं आहे.’, ओवी अगदी समजूतदारपणे बोलत होती.
‘ओवी कळलं का तुला, गाईसारखी कशाचीही अपेक्षा न करता केवळ परोपकार करणे हा गुण जसा सखूकडे आहे, तसाच तुझ्यातही येऊ दे हो! म्हणूनच आपण दिवाळीची सुरुवात गाय-वासराच्या पूजेने करतो.’, आजी म्हणाली.
ओवी लाडात येऊन म्हणाली, ‘नक्की! मी तशीच वागेन. पण आता मला गाईचं दूध प्यायला दे लवकर. मला भाऊबीज गोळा करायला जायचंय.’
 
- शुभांगी देशपांडे
विद्यापीठ हायस्कूल