टोचाटोची

दिंनाक: 22 May 2019 12:11:16


 
साहित्य :
६ फुगे. 
३ बॉलपॉइंट पेन.
३ पेन्सिली.

खेळायची तयारी :
हा खेळ किमान दोन आणि जास्तीत जास्त कितीही जणांत खेळता येईल. आता तिघं जणं हा खेळ खेळत आहेत. हा खेळ खेळण्याआधी घरातला पंखा आणि खिडकी बंद करा. टेबलावर १ बॉलपॉइंट पेन आणि त्याच्या बाजूला १ पेन्सिल ठेवा. आता दोन फुगे घ्या. दोन्ही फुगे फुगवा. समजा, एक फुगा लाल रंगांचा आहे, तर दुसर्‍या फुग्यावर पेनने चांदण्या काढा. 
चला खेळू या :
आता खेळ सुरू करताना लाल फुगा उजव्या हातात, तर चांदणी फुगा डाव्या हातात घ्या. आधी लाल फुगा हवेत उंच उडवा. टेबलावर ठेवलेले बॉलपॉइंट पेन चटकन उजव्या हातात घ्या. लाल फुगा हवेत राहण्यासाठी त्याला पेनने खालून वर टोचायचे आहे.
आता चांदणी फुगा हवेत उंच उडवा. मग टेबलावर ठेवलेली पेन्सिल डाव्या हातात घ्या. या चांदणी फुग्याला पेन्सिलीने खालून वर टोचत राहायचे आहे.
हे दोन्ही फुगे हवेतच राहिले पाहिजेत. या खेळात तुम्हाला फक्त टोचाटोची करायची आहे. फुग्यांना नेमक्या ठिकाणी टोचताना दोन्ही हातांचे कोन समान राखणे हे या खेळातले कौशल्य आहे.

नियम :
कुठलाही फुगा जमिनीवर पडला तर खेळाडू आउट.लाल फुग्याला जर पेन्सिल लागली किंवा चांदणी फुग्याला जर बॉलपॉइंट पेन लागले, तर खेळाडू आउट.
 
कोण जिंकेल :
ज्याचे फुगे जास्त वेळ हवेत राहतील तो जिंकला.

आणखी थोडी गंमत :
आता करू या बॉक्सिंग! फुगे हवेत उडवा. फुगे खाली येऊ लागले तर त्यांना खालून हलकेच ठोसे मारा. जर का जोरात ठोसा मारलात, तर फुग्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला उड्या मारत डिस्को डान्स करावा लागेल. आणि जर का फुग्याला चुकीच्या दिशेने ठोसा लगावलात, तर मग फुग्यांचीच होईल ठोसाठोशी आणि तुम्ही पडाल तोंडघशी.
- राजीव तांबे