मे महिन्याची सुट्टी ही सर्वांनाच आवडणारी, हवीहवीशी वाटणारी. परीक्षा झालेल्या असल्याने परीक्षेचा ताण नाही. अभ्यास नाही आणि अभ्यास करा अशी कोणाच्या मागे भुणभुण नाही. दिवसभर खेळ, मजा, मस्ती व दंगा आणि भूक लागल्यावर थंडगार शीतपेय, फळे आणि आइसक्रीम म्हणजे आनंदच आनंद!
असं सर्व काही आनंदी-आनंद असताना मोठे लोक एकसारखं सांगत असतात की, उन्हात खेळू नका, सावलीत खेळा, टोपी घाला याला कारण सध्या असलेला उन्हाळा. दर वर्षी उन्हाची तीव्रताही वाढत जाणारीच. रोजची वर्तमानपत्रंही आपल्याला याची जाणीव करून देत असतात. या तापमानवाढीचं कारण आहे ‘वैश्‍विक तापमानवाढ’ (Global Warming) आणि काय कारणं आहेत या वैश्‍विक तापमानवाढीची?
मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी शोधलेल्या वस्तू अथवा उपकरणे यांचं अमर्यादित उत्पादन व वापर यांमुळे झालेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाने, उदाहरणार्थ, १)  घर, कार्यालय येथील फर्निचरसाठी केलेली बेसुमार वृक्षतोड, २) एकापेक्षा अनेक घरे, कारखाने यांमुळे कमी झालेलं जंगल क्षेत्र, ३) स्वयंचलित वाहनांचा स्वैरवापर, ४) पाणी व ऊर्जा यांचा अनिर्बंध वापर, ५) प्लास्टिक, थर्माकोलचा अनिर्बंध वापर, ६) ‘वापरा व फेका’ ही प्रवृत्ती बळावल्यामुळे वाढत जाणारा कचरा आणि त्यातून तयार होणारे विषारी वायू.
आणि हे करतानाच प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास झाला. नैसर्गिक साधनसंपत्ती ही दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारची म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, झाडे, सौरशक्ती, सेंद्रिय खत इत्यादी तर दुसर्‍या प्रकारची म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, विविध धातू इत्यादी. दुसर्‍या प्रकारची संपत्ती वापरून संपते. उलट पहिल्या प्रकारची पुन्हा निर्माण होते. म्हणून पहिल्या प्रकाराला नवीकरणक्षम (Renewable), तर दुसर्‍या प्रकाराला अनवीकरणक्षम (Non-Renewable) म्हणतात. या दोन्ही व्यतिरिक्त मानवाने तिसर्‍या प्रकारची संपत्ती तयार केली ती म्हणजे मानवनिर्मित साधनसंपत्ती उदा., कागद, ऊर्जा, प्लास्टिक, थर्माकोल इत्यादी.
या तीनही साधनसंपत्तीचा मानवाने आपले जीवन सुसह्य व आरामदायी करण्यासाठी पुरेपूर वापर केला, पण त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला आणि निर्माण झाले अनेक प्रश्‍न जसे;—१) जल, जमीन व वायू यांचे प्रदूषण, २) ध्वनी प्रदूषण, ३) जंगलाचा र्‍हास, ४) संपत चालेली खनिजसंपत्ती, ५) शहरीकरण व त्यामुळे उभा राहणारा कचर्‍याचा प्रश्‍न.
 क्रिया तशी प्रतिक्रिया याच नियमाला अनुसरून मानवाने या गंभीर प्रश्‍नावर उत्तर शोधण्याचे काम सुरू केले आणि त्यात बर्‍याच प्रमाणात यशही मिळवलेय. उदाहरण द्यायचं झालं, तर नवीकरणक्षम साधनसंपत्ती निर्मित्ती व वापर करणे. जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा समुद्राच्या लांटामधील घषर्णातून वीजनिर्मिती (Tidal Energy). ओल्या कचर्‍यापासून खत किंवा बायोगॅस अथवा वीजनिर्मित्ती करणे, सुक्या कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्लास्टिकपासून इंधन तयार करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे.
आता तर सरकारनेही ‘स्मार्ट सिटी’ असा उपक्रम हाती घेतला आहे. स्मार्ट म्हणजे काय? सर्व प्रकारची संसाधने वापरून केलेला विकास स्मार्ट की पर्यावरणाचा समतोल राखून केलेला विकास स्मार्ट?
चला तर मग, आपणही आपली ही सुट्टी उपयोगात आणून एका ‘स्मार्ट’ प्रकल्पाची प्रतिकृती बनवू या! यासाठी आपण आपले घर, कॉलनी अथवा सोसायटी किंवा शाळा यांपैकी एकाचे स्मार्ट मॉडेल आपल्या घरात उपलब्ध असणार्‍या टाकाऊ वस्तूंपासून बनवू यात. जेणेकरून आपल्या घरातील कचराही कमी होईल. आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. त्याचबरोबर पाठीवर शाबासकीची थापही मिळेल. आपली स्मार्ट प्रतिकृती ही घरातील टाकाऊ वस्तूंपासून बनलेली असेल, त्यामुळे त्याचा विचार तुम्ही करालच. पण त्यात कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव झाला पाहिजे. त्याची काही उदाहरणे पाहू यात -
१) इमारत निसर्गस्नेही असेल
२) पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा वापर असेल
३) वृक्ष, झाड, वेली असतील
४) रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल 
५) सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प असेल
६) कचरा निर्मूलनाचा प्रकल्प असेल.
७) सेंद्रिय शेतीचा विचार केला असेल.
एकूणच आपला हा प्रकल्प ‘टाकाऊतून टिकाऊ’ (इशीीं ऋीेा थरीींश) तर असेलच, पण शाश्वत विकासाची वाट दाखवणारा असेल. चला तर मग, आपण या सुट्टीचा उपयोग स्मार्टपणे करू यात आणि एक पारदर्शक प्रकल्प बनवू या. सर्वात महत्त्वाचे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिक्षणविवेकला अवश्य कळवा.
वैश्‍विक विचार, स्थानिक कृती, वैयक्तिक प्रतिसाद या सूत्रानुसार स्वच्छ पाणी, प्रदूषणमुक्त हवा, कचराविरहीत जागा, हिरवीगर्द झाडी हे सर्व हवे असेल तर आपण आतापासून दैनंदिन जीवन जगताना पुढील गोष्टी कटाक्षाने आपल्या आचरणात आणू यात.
१) अति हव्यास टाळणे
२) आवश्यक तेवढेच घेणे.
३) कमीतकमी वापर करणे.
४) वापर पूर्णपणे करणे.
५) पुनर्वापर आणि पुनर्घटन करणे.
या सवयींचे आपल्यावर तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम नक्कीच चांगले असतील.
 
- प्रणव जोशी