मुलांनो, तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनालीरामच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना? तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना? राजा, कवी आणि कथा या कथामालेत आपण भारतातील प्रसिद्ध राजे, त्यांच्या दरबारातील कवी व त्या कवीने लिहिलेली महान कथा यांची गोष्ट ऐकणार आहोत. आजची कथा आहे - राजा भोज, कालिदास आणि सरस्वती कंठाभरण. 

आजची कथा आहे बरोबर १००० वर्षांपूर्वीची. ही कथा आहे माळव्याची. माळवा म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मधला भाग. साधारण इ.स. १० व्या शतकापासून १४ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, परमार नावाचे राजे इथे राज्य करत होते. यांच्यापैकी एक प्रसिद्ध राजा होता - राजा भोज.

राजा भोजची राजधानी होती, इंदौरच्या जवळची धारा नगरी. या न्यायी राजाने ४५ वर्षे उत्तम राज्य केले. गुणांची पारख असणारा, विद्वान आणि अत्यंत शूर असा हा राजा होता. याच्या काळात १०२८ च्या दरम्यान, अफगाणिस्तानमधील महमद गझनीने सोमनाथच्या मंदिरावर हल्ला करून ते लुटले होते. परत जाताना भोज राजाच्या सैन्याशी सामना करावा लागू नये, म्हणून तो वाट बदलून परत गेला.

भोजराजा स्वत: एक विद्वान कवी म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याच्या नावावर ८४ ग्रंथ सांगितले जातात. त्या पैकी एक ग्रंथ आहे ‘सरस्वती कंठाभरण’. अर्थात सरस्वतीच्या कंठातील हार! या ग्रंथामध्ये भोजराजाने संस्कृत व्याकरण व काव्य या विषयीची माहिती दिली आहे; तसेच त्यातील नियम कळण्यासाठी उदाहरण म्हणून सुंदर काव्य रचले आहे. 

भोजराजा सरस्वती देवीचा थोर उपासक होता. त्याने आपल्या राज्यात तीन ठिकाणी सरस्वतीचे मंदिर बांधले होते. धारा, उज्जैनी व मंडी येथे ‘सरस्वती कंठाभरण’ नावाचे विद्यापीठ त्याने स्थापन केले होते. या ठिकाणी अनेक विषयांच्या अभ्यासाचे ग्रंथ होते. व्याकरण, ज्योतिषशास्त्र, गणित, खगोल, मूर्तीशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तूशास्त्र यांसारखे अनेक विषय इथे शिकवले जात असत. धारा नगरीच्या विद्यापीठातील सरस्वतीची पूजा भोजराजा स्वत: करत असे. आज प्रतिभावंत लेखकांना ज्ञानपीठ पारितोषिक दिले जाते, त्यामध्ये धाराच्या सरस्वतीच्या मूर्तीची ब्राँझ प्रतिकृती असते. 

खरे तर कवी कालिदास भोज राजाच्या कितीतरी आधी होऊन गेला; पण भोज राजा आणि कालिदास यांच्या अनेक कथा आहेत. हा कदाचित कोणी दुसरा कालिदास नावाचा कवी असावा. राजाने अर्ध पद द्यावे आणि कालिदासाने ते पूर्ण करावे अशा कैक मजेदार कथा आहेत. एकदा राजा भोजने ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ: याने संपणारे पद तयार करण्यास सांगितले. हे ऐकून दरबारातील सगळे कवी बुचकळ्यात पडले. कालिदासाने मात्र हे पद अशा प्रकारे पूर्ण केले - 

रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या।

सोपान मार्गेण करोति शब्दं ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ:॥

अर्थात - रामाच्या अभिषेकासाठी युवती सुवर्णाच्या घटातून पाणी घेऊन जात असता तिच्या हातातून घट निसटला. जिन्यावरून खाली पडणार्‍या घटाने आवाज झाला - ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ:

एकदा भोज राजाने कालिदासाला विचारले, माझ्या मृत्युनंतर तू माझ्याबद्दल काय लिहिशील? कालिदासाने कानावर हात ठेवले आणि म्हणाला, “मी असा विचारसुद्धा करू शकत नाही!” तरी भोजराजाने त्याला फार आग्रह केला, तेव्हा कालिदास धारा नगरीतून निघून गेला. भोज राजाला कालिदासाच्या शिवाय करमेना. त्याने कालिदासाचा शोध करवला आणि वेश बदलून एके दिवशी कालिदासाला भेटला. कालिदासाने त्याची विचारपूस केली, कोण कुठला तू? तेव्हा वेश बदललेल्या राजाने सांगितले मी यात्रेकरू असून, धारा नगरीहून आलो आहे. कालिदासाने विचारले, “अरे, धारा नगरीचा राजा, माझा मित्र, भोजराज कसा आहे?” तेव्हा तो यात्रेकरू म्हणाला, “अरेरे! काय सांगू! वाईट झाले. भोजराजा मृत्यू पावला!”

त्या वेळी उत्स्फुर्तपणे कालिदास म्हणाला -

अद्य धारा निराधारा निरालम्बा सरस्वती ।

पण्डिताः खण्डिताः सर्वेभोजराजे दिवं गते ॥

आज धारा नगरी निराधार झाली, देवी सरस्वतीचा सहयोगी राहिला नाही आणि विद्वान पंडित दु:खी झाले आहेत, कारण भोजराजा दिवंगत झाला.

हे शब्द ऐकून भोज राजाची इच्छा पूर्ण झाली! त्याने कालिदासाला आलिंगन दिले व आपले खरे रूप प्रकट केले! कालिदासाचे दु:ख कुठल्याकुठे पळून गेले आणि आधीचे काव्य दुरुस्त करत म्हणाला -

अद्य धारा सदाधारा सदालम्बा सरस्वती ।

पण्डिताः मण्डिताः सर्वेभोजराजे भुवं गते ॥

धारा नगरीला सदैव आधार आहे, सरस्वती देवीला सदैव सहयोग आहे आणि सर्व पंडित भूषित आहेत, कारण भोजराजा इथे नांदत आहे! 

भोज राजा गेला. त्यानंतर परमार राजांनी १५० - २०० वर्ष राज्य केले. १३०५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने हे राज्य काबीज केले. मधल्या काळात तीनही ठिकाणाची ‘सरस्वती कंठाभरण’ विद्यापीठे नष्ट झाली. धाराच्या मंदिरातील सरस्वतीची मूर्ती आता ब्रिटीश म्युझियममध्ये आहे. आज कालिदासाचे शब्द खरे ठरले आहेत. भोजराजासारखा राजा माळव्यात नाही, म्हणून... अद्य धारा निराधारा निरालम्बा सरस्वती।

- दिपाली पाटवदकर