उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल! कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो! परीक्षेचा सगळा ताण, घरात बसून आलेला शीण घालवण्यासाठी सर्व जण बाहेर मनसोक्त हुंदडायला सज्ज झाले असतील. माझ्याकडे या सुट्टीतला एक हटके प्लॅन आहे. मजा, मस्ती आणि साहस! कोणता सांगू? चला, तर मग, या वेळी आपण जाऊ या हटके अशा गड-किल्ल्यांवर! आपण नेहमीच प्रेक्षणीय स्थळं, बागा, वॉटरपार्क इथे जातच असतो, पण गड किल्ले दुर्लक्षित राहतात. त्यामुळे या सुट्टीत काहीतरी भन्नाट असं करू यात!

शिवाजी महाराजांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. स्वराज्य स्थापन करून त्यांनी दुष्ट आणि कपटी मुघलांना महाराष्ट्रात राज्य करू दिलं नाही आणि यामध्ये महाराजांना साथ दिली ती या गड-किल्ल्यांनी. महाराजांनी अत्यंत चाणाक्ष बुद्धीने गड-किल्ले काबीज केले आणि मुघलांना शह दिला. हे गड-किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्राभोवतींचे संरक्षक कवच आणि आपली संस्कृतीही आहे. चला, तर मग इतिहासात वर्णन केलेल्या किल्ल्यांवर प्रत्यक्षात जाऊ या.

यातला पहिला गड पुण्याच्या जवळचा आहे. ‘कोरीगड’, असं नाव आहे त्याचं. हा गड लोणावळ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. या गडाचा प्रकार गिरीदुर्गमध्ये मोडतो. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर हा गड आहे. गडाची सुरुवात पायवाटेने होते. आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे. त्यामुळे अशा वाटेने जायला मजा येते. घनदाट झाडं, अधूनमधून येणारे पक्ष्यांचे आवाज यांमुळे गड चढताना मुळीच दमायला होत नाही. गडाच्या शेवटाला थोड्या पायर्‍या आहेत. गडावर अखंड तटबंदी आहे. अनेक बुरूज व तोफाही आहेत; तसेच विस्तीर्ण अशी तळी आहेत. तिथेच कोरीदेवीचे सुंदर मंदिर आहे. कोरीगडावर तुंग, तिकोना, नागफणीचे टोक, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान असा सर्व परिसर दिसतो.

पुण्याच्या जवळचा आणखी एक किल्ला म्हणजे वासोटा. हा किल्ला वनदुर्ग या प्रकारात मोडतो. ४२६७ फूट इतका उंच किल्ला महाबळेश्‍वरच्या डोंगररांगांमध्ये स्थित आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातून जावे लागते. म्हणजे बामणोली गावातून बोटीत बसायचे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी जायचे. आजूबाजूला कोयनेचे घनदाट जंगल आहे, जे सदाहरीत असल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा तिथे थंडावा असतो. गडावर चढताना जंगलातून जावे लागते आणि जंगल म्हटले की, प्राणी, पक्षी आपल्याला दिसतात. बरेचदा बिबट्याचा वावरसुद्धा गडाच्या वाटेवर असतो. त्यामुळे काही वेळा थरारक अनुभव येतात. परंतु घाबरायची गरज नाही, कारण फॉरेस्ट गार्ड आपल्याबरोबर असतो. वर पोहोचल्यावर किल्ल्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात, तसेच माचीसुद्धा दिसते. थकून-भागून आल्यावर विसावा घेण्यासाठी महादेवाचे मंदिर तिथे आहे. तर अशा या अ‍ॅडव्हेंचर्स किल्ल्याची एकदा तरी सफर करून यायलाच हवी.

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी आपण नेहमीच जातो, पण त्याला लागून असलेला पेब किल्ला कोणी कोणी पाहिला आहे? तर असे बरेच कमी लोक असतील. रायगड जिल्ह्यात कर्जतच्या डोंगररांगांमध्ये हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पेबी देवीचे मंदिर आहे. गडावर पोहोचल्यावर आजूबाजूला विस्तीर्ण झाडी पसरलेली दिसते आणि शेजारून आंबा नदी वाहताना दिसते. अतिशय नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. या किल्ल्यावरून नवरा-नवरी आणि भटोबा यांचे सुळके दिसतात. किल्ल्यावर एक गुहा आहे. तिथे आपल्याला मुक्काम करता येतो.

आता जो किल्ला मी सांगणार आहे तो खूपच खास आहे. जलदुर्ग या प्रकारात मोडणारा. अजिंक्य असा ‘विजयदुर्ग’. सिंधूदुर्ग जिल्ह्यात, देवगड येथे तो बांधण्यात आला आहे. तब्बल १७ एकर जागेवर पसरलेला हा दुर्ग तीन बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. ११व्या शतकात राजा भोज याने हा किल्ला बांधला व १६५३मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला. महाराजांचे आरमार प्रमुख कानोजी आंग्रे हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. ३ मजबूत वेढे असलेली चिलखती तटबंदी आहे या किल्ल्याला! तसेच किल्ल्यावरून गावात जायला दोनशे मीटरचे भुयार आहे. स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा, समुद्रातील विविध जीव तेथे पाहायला मिळतात. मग आहे की नाही भारी हा किल्ला.

चला मग मुलांनो, बॅग पॅक करून तयार व्हा आणि लागा किल्ल्यांवर जायच्या तयारीला. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच वेगळे, नवीन अनुभव येतील आणि मजा, मस्ती करत तुमची ही सुट्टी नक्कीच सार्थकी लागेल.

- पल्लवी दाढे