राणीचा किल्ला

दिंनाक: 20 May 2019 11:41:50


 

मैदानी खेळ

वयोगट – ६ वर्षांवरील मुले

किती जण खेळू शकतात – कमीत कमी १० मुले, जास्तीत जास्त ३० मुले

खेळाची रचना – १ छोटा गोल मध्यावर, त्यावर काही मुले उभी राहतील, १ मोठा गोल, त्यावर जास्त मुले उभी राहतील.

साहित्य – गोल आखण्यासाठी फक्की किंवा खडू आणि मध्यावर ठेवण्यासाठी टोपली किंवा प्लास्टिकची छोटी बादली व बॉल.

खेळ कसा खेळायचा – मुलांच्या संख्येच्या अंदाजाने १ मोठा गोल आखावा. मधोमध एक छोटा गोल आखून त्यामध्ये टोपली ठेवावी. टोपली म्हणजे राणीचा किल्ला. त्याचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती बाहेरच्या बाजूला तोंडे करून मुलांना उभे करावे. मोठ्या गोलावर उभे असणाऱ्या मुलांनी पायाने बॉल मारून टोपली उडवण्याचा प्रयत्न करावा. कोणीही हाताचा उपयोग करु नये. बाहेरील मुलांचे उद्दिष्ट टोपली उडवणे, तर आतील मुलांचे उद्दिष्ट टोपलीला बॉल लागू न देणे, अर्थात किल्ल्याचा बचाव.

या खेळातून काय मिळते

१) हा खेळ मैदानावर खेळायचा असल्याने मोकळ्या हवेत खेळण्याचा फायदा होतो.

२) नेत्रपाद समायोजन वाढते.

३) हात न वापरता खेळणे आवश्यक असल्याने हात स्थिर, मागे ठेवणे हे कौशल्यदेखील वाढते.

४) मुलांना फुटबॉल खेळताना या कौशल्याचा उपयोग होतो.