मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण १९७० ते १९८५ या पंधरा वर्षाच्या कालखंडात अवकाश स्पर्धेच्या बाबतीत काय काय घटना घडल्या ते पाहिलं. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण १९८५ नंतर इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे या आकाश स्पर्धेने कसा वेग घेतला ते पाहू या.

१९८५ पर्यंतच्या काळापर्यंत अवकाश स्पर्धा ही जवळपास अमेरिकेने जिंकलेली आहे, हे सिद्ध झालेले होते. रशिया त्या मानाने कर्जबाजारी होऊन फारच मागे पडले होते. आता अमेरिकेला जणूकाही अवकाश स्पर्धेची दिशा सापडली होती आणि तिथले सरकार आणि त्याचप्रमाणे उद्योगपतीसुद्धा या स्पर्धेमध्ये अधिकाधिक वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आर्थिक साहाय्य करू लागले होते. त्यातच या दशकात फारच वेगाने झालेली इलेक्ट्रोनिक्समधील क्रांतीसुद्धा याला हातभार लावत होती. अमेरिकेने 1980च्या दशकात एक नागरी मोहीम आखली ज्यात सामान्य नागरिकांमधून काही असामान्य प्रतिभेचे नागरिक निवडून त्यांना अवकाशात जाण्याची संधी देण्यात येणार होती. त्याप्रमाणे अमेरिकेने सामान्य माणसांतून अवकाशवीर निवडण्यासाठी आपली मोहीम सुरू ठेवली. या मोहिमेत इतर सहा आणि सामान्य लोकांमधून निवडलेली एक माध्यमिक शाळेची शिक्षिका होती. सर्वांना फारच कौतुक वाटत होते; कारण अगदी सामान्य कुटुंबामधून येऊन इतकी मोठी संधी तिने मिळवलेली होती. या उड्डाणासाठी तिला इतर अंतराळवीरांप्रमाणेच प्रशिक्षण देण्यात आलेले होते. अखेर २८ जानेवारी १९८६ला हे यान जगाला सामान्य माणूससुद्धा असामान्य कामगिरी करू शकतो असा संदेश देण्यासाठी पृथ्वीवरून अंतराळात झेपावले. परंतु आकाशाच्या दिशेने झेप घेताच ७३व्या सेकंदाला अवकाश यानात बिघाड झाला आणि हे यान सर्व लोकांसमोर स्फोट होऊन नष्ट झाले आणि यात असलेले सर्व सातही अंतराळवीर मृत्युमुखी पडले. सर्वांनी शोक व्यक्त केला, परंतु या धक्क्याने अमेरिका पुन्हा एकदा या स्पर्धेत काही वर्ष मागे गेली.

चॅलेन्जेर या यानाच्या दुर्घटनेनंतर अमेरिकेने पुन्हा शून्यापासून दुर्घटनेचा अभ्यास केला आणि नक्की काय चूक झाली हे शोधून काढले आणि त्याप्रमाणे पुढील यानामध्ये सुधार केले. याच कालखंडात अमेरिकेने एक फारच मोठी मोहीम हाती घेतली. एडविन हबल या शास्त्रज्ञाने एक स्वप्न मांडले होते की पृथ्वीवर धूळ, वातावरण यांचा परिणाम फारच असल्याने आपल्याला आकाशाचे नीट छायाचित्रीकरण करताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे जर आपल्याला पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांसारखी एक मोठी दुर्बीण अशी पृथ्वीभोवती फिरत ठेवता आली तर आपण वातावरण विरहित अवस्थेत त्या दुर्बिणीच्या माध्यमाने अवकाशाचा फार सुंदर अभ्यास करू शकू. यासाठी नासाने १९८५च्या दशकात प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली. या दुर्बिणीचा प्राथमिक आरशाचा व्यासाच २.४ मीटर इतका होता. तो बनवण्यास सुमारे २ वर्षे लागली आणि केसाच्या जाडीच्यापेक्षा हजार पट बारीक इतक्या लहान मापापर्यंत हा आरसा तपासलेला होता. अशा प्रकारे २४ एप्रिल १९९० साली हा टेलिस्कोप अमेरिकेने डिस्कवरी या यानाच्या साहाय्याने अंतराळात यशस्वीरित्या पाठवला. त्यानंतर सर्व शास्त्रज्ञांचे लक्ष हे या टेलिस्कोपकडून पाठवण्यात येणार्‍या छायाचित्रांकडे होते. परंतु पहिलीच पाठवलेली प्रतिमा ही फारच धूसर दिसू लागलेली होती. त्यानंतर अशा अनेक प्रतिमा काढल्या गेल्या, परंतु प्रत्येक वेळी धूसरच प्रतिमा मिळत होत्या. नंतर त्याचा अभ्यास केल्यावर नासाच्या लक्षात आले की, त्या टेलिस्कोपच्या आरशात बिघाड आहे आणि जसा मनुष्याची दृष्टी कमकुवत झाली की त्याला धूसर दिसू लागते, त्याचप्रमाणे हबल टेलिस्कोपलासुद्धा धूसर दिसू लागले. आता चॅलेन्जेरनंतर अमेरिकेसाठी हा दुसरा धक्का होता. कारण हा जर टेलिस्कोप बिघडला आणि चालू नाही शकला तर अमेरिकेची नासा संस्था कर्जबाजारी झाली असती. मग शास्त्रज्ञांनी प्रचंड सखोल अभ्यास केला आणि यावर एक सोप्पा उपाय काढला. ज्याप्रमाणे मनुष्याला चष्मा लावतात तसाच या टेलिस्कोपलासुद्धा एक चष्मा लावायचा आणि दृष्टी सुधारायची. पण हे सर्व अवकाशात जाऊन करावे लागणार होते. त्यामुळे मग काही अवकाशवीरांना त्याचे प्रशिक्षण देऊन मग त्यांनी एका अंतराळ मोहिमेद्वारे हा टेलिस्कोप ठीक केला. आजवर आपण पाहत असलेले बहुतेक तेजोमेघ, दीर्घिका यांची छायाचित्रे ही हबलच्या माध्यमातून काढलेली आहेत. या टेलिस्कोपने जणूकाही मनुष्याचे अवकाशाविषयीचे ज्ञानच बदलून टाकले आहे. तुम्ही यावर थोडा अभ्यास केलात तर तुम्हाला लक्षात येईल की या मोहिमेसाठी किती मेहेनत घेण्यात आली आणि फारच मोठे अपयशसुद्धा कसे यशामध्ये बदलण्यात आले.

नव्वदच्या दशकातील या दोन महत्त्वाच्या मोहिमा आपण पहिल्या. पण याचा अर्थ असा नाही की फक्त दोनच मोहिमा सुरू होत्या; परंतु इतर अनेक मोहिमा गुरू, मंगळ आणि इतर अवकाश या दिशेने सुरू होत्या. मला खात्री आहे की तुम्ही अशा इतर मोहिमांचीसुद्धा माहिती नक्की मिळवून वाचाल आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगाल.

- अक्षय भिडे