नाटक पाहताना....

दिंनाक: 18 May 2019 17:46:53
 

 
गेल्या आठवड्यात ग्रिप्स नाट्य महोत्सव होता. चार दिवस चार नाटकांची मेजवानी. मुलाचं भावविश्व उलगडून दाखवताना मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या संहिता ही या नाटकांची जमेची बाजू होती.
१. गोष्ट simple पिल्लाची - एका काळ्या पण हुशार मुलीची गोष्ट
२. तू दोस्त माह्या - गावावरून आलेल्या चुलत भावाबरोबर जडलेलं मैत्र
३. जम्बा बम्बा बू - धार्मिक - जातीय सलोखा आणि माणूसपणाची शिकवण
४. आई पण बाबा पण - आई - बाबांच्या भांडणाचा मुलांवर होणारा परिणाम
 
मुलांच्या नाटकात मुलांनी काम करायचं असतं तरच ती प्रेक्षक मुलांना कळतात, हा समज चुकीचा ठरवत मोठ्यांनी केलेली लहान मुलांची कामं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे त्यातला. नाटक सुरू होताना मुलांना दिलेल्या तीन सूचनाही सुजाण प्रेक्षक घडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आहेत. सूचना
१. नाटक सुरू असताना कुणीही बोलायचं नाही, पण हसायला आलं तर हसू शकता, नाचावंस वाटलं तर नाचू शकता.
२. नाट्यगृहात काहीही खायचं नाही. पाणी प्यायला परवानगी आहे.
३. आपल्या आई - बाबांना सांगा आपले मोबाईल सायलेंट ठेवा.
 
या तीन सूचनांचं पालन करत, आपलं भान हरपून मुलं नाटक पाहण्यात रंगून जात होती, हे यात या सूचनांचाही तितकाच वाटा होता. नाट्यगृहातली ही शिस्त याच वयात लागली पाहिजे, हे फार कौतुकास्पद आहे.
नाटकाचे विषयही तितकेच ताकदीचे, कालसुसंगत होते. (विषय वर दिले आहेत.) बटबटीत विषय आणि प्रबोधनपर संवाद टाळत केलेली ही नाटकं म्हणूनच मुलांच्या आणि अर्थात मोठांच्याही अधिक पसंतीला उतरली असणार. गंभीर विषयांची गंभीर मांडणीही लहान वयाच्या मुलांनी ताकदीने पेलली. त्यात सतत काही तरी घडत होतं आणि ते घडणं मुलांना आपल्याशी रिलेट करता येत होतं, म्हणूनच मुलं नाटक बघताना मोक्याच्या जागी हसत होती, उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद देत होती आणि प्रयोगाची रंगत वाढवायला हातभार लावत होती. नेपथ्य मांडणीही कलाकार आपली आपणच करत होते. नाटकातली गाणी, संगीत आणि प्रकाशयोजनाही साजेशी होती. केशभूषा, वेशभूषाही अगदी चपखल होती.
शेवटी back stage artist पासून सुरू केलेली कलाकारांची ओळख पण मुलांना मज्जा देत होती. नाटक संपल्यावर कलाकारांना हात लावून पाहण्याची संधी आणि मुलांनी आवर्जून कलाकारांचं कौतुक फार फार आनंद देणारं होतं.
मुलांच्या भावविश्वाळा वेगळं वळण देणारी ही नाटकं निश्चित पाहण्यासारखी असतात. आवर्जून पाहावं असं काही तरी....
 
- डॉ. अर्चना कुडतरकर