आपलं घर

दिंनाक: 18 May 2019 14:44:00


 

मुलांनो, घर म्हटले की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला? ‘घर’ या शब्दातच एक ‘ऊब’ आहे, जी सर्वांनाच हवीहवीशी असते.

पण मुलांनो, अशी किती मुले या समाजात आहेत, ज्यांना आईबाबा नाहीत, ज्यांना ‘घर’ म्हणजे नक्की काय असते, हेच मुळी माहीत नाही. अशा मुलांसाठी असलेल्या; ऊन, थंडी, वारा यांपासून संरक्षण करणार्‍या; उबदार मायेने भरलेल्या एका ‘घरा’ची आपण ओळख करून घेऊ. विजय फळणीकर काकांच्या ‘आपलं घर’मुळे ५५ अनाथ, निराधार मुलांना ‘आपलं घर’ मिळाले आहे.
मुलांनो, या ‘घरा’च्या निर्मितीचा प्रवास इतका सोपा नाही. नागपूरला राहणार्‍या विजय यांचे पितृछत्र वयाच्या ९-१० वर्षांच्या विजयचे पितृछत्र हरपले. कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी, तसेच लहान वयातच आई, आत्या, छोटी भावंडे यांना चांगले दिवस दाखवायचे, या ध्यासाने घरातील गजानन महाराजांची पितळी मूर्ती विकून विजय नागपूरहून मुंबईला पळून आला. का? तर त्यांना वाटत होते,मुंबईत माणसे श्रीमंत होतात, सिनेमात काम मिळते, हिरो होता येते.
विजय मुंबईला आला. मुंबईची झगमगती गर्दीची दुनिया बघून, आपण इथे नक्की काय करणार?, कसे राहणार? आणि कसे श्रीमंत होणार?, यांविषयी त्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली. पण, खचून न जाता चर्नी रोड चौपाटीवर भेळपुरीच्या प्लेट साफ करण्याचे काम त्यांनी सुरू केले. तिथे आधीच काही मुले हे काम करत होती, ती त्यांना काम करू देईनात. मग मुंबादेवीच्या देवळाजवळ विजय यांनी भीक मागण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला त्यांना खूप लाज वाटायची. तरीही दोन वर्षांतच ते भीक मागण्यातसुद्धा एकदम तरबेज झाले. सगळ्याच ठिकाणी चढाओढ असते, तशी या भिकार्‍यांच्या रांगेतही होती. त्यामुळे भीक मिळण्यासाठी लवकर जागा पकडणे, भांडणे, घुसखोरी करणे या गोष्टी तिथेही होत्या.
अशातच एक दिवस यशवंत रामकृष्ण काळे या सद्गृहस्थाने विजय यांना या भीक मागण्याच्या धंद्यातून बाहेर काढले आणि डोंगरीच्या बालसुधारगृहात दाखल केले. तोच विजय यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा दिवस ठरला. काळे गुरुजी या सुधारगृहात संस्कार वर्ग घेत. नियमित खाणे-पिणे, स्वच्छता, अंगभर कपडे आणि मनातल्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी काळे गुरुजींसारखा मिळालेला गुरू, यांमुळे विजय यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणापासून असलेल्या ‘हार्मोनियम’ वादनाच्या छंदाला नवी दिशा मिळाली. एकूणच बालसुधारगृहातील पाच वर्षे विजय यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली.
पाच वर्षांनी विजय पुन्हा आपल्या घरी नागपूरला आले. तोपर्यंत घरची परिस्थिती तुलनेने बदलली होती. काळे गुरुजींच्या हाताखाली शिकून, विजय हार्मोनियम उत्तम वाजवू लागले होते. त्यामुळे वेगवेगळ्या भजनी मंडळांना साथ करत, विविध नोकर्‍या करत अर्थार्जन सुरू झाले. नागपूर दूरदर्शनवरही विविध नाट्यछटा, बालगीते, अंधश्रद्धेवर आधारित काही नाट्ये त्यांनी लिहिली. छंदाला अर्थार्जनाची आणि बरोबरीने प्रसिद्धीचीही जोड मिळाली. त्यातच पुढील शिक्षणासाठी त्यांनी रात्रशाळेत प्रवेश घेतला. एकूणच सगळे दिवस कष्टात चालले होते, पण आपल्या माणसांसाठी काहीतरी केल्याचा आनंदही मिळत होता.
त्यातच योग्य वेळी लग्न व्हावे, म्हणून घरची मंडळी आग्रह करू लागली. मग साधना फाये नावाच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. ‘वैभव’च्या जन्मानंतर विजय फळणीकर यांचे घर वैभवशाली होणार, अशी सगळ्यांना खात्री वाटू लागली. आता मात्र शाश्‍वत नोकरी हवी, असे विजय यांना वाटू लागले. खटपट चालू असतानाच ‘पुणे बालचित्रवाणी’मध्य त्यांना नोकरी लागली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग आले. आर्थिक विवंचना तर सतत भेडसावतच होती, तरीही आकाशवाणीची नोकरी सांभाळून उर्वरित वेळेतील स्वत:च्या जाहिराती बनवण्याच्या व्यवसायामुळे त्यांचे दिवस बदलले, आर्थिक स्थैर्य आले. त्यांच्या कष्टांचे आणि जिद्दीचेच हे फळ होते.
मात्र, २००१ साली वैभव या एकुलत्या एका मुलाच्या असाध्य आजारपणाचे निदान झाले आणि विजय यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे औषधपाणी, डॉक्टर, रुग्णालयाच्या वार्‍या आणि नोव्हेंबर २००१ मध्ये वैभवच्या झालेल्या मृत्यूमुळे पदरी पडलेले अपयश. सगळेच अनाकलनीय होते. विजय आणि साधना - वैभवच्या आईवडिलांनी आत्महत्या करायचा निर्णय त्यांनी घेतला. पण, नेमके त्याच वेळी वैभवच्या मृत्यूमुळे विम्याचे पैसे आले. त्याच पैशांतून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय झाला. फिनिक्स पक्षासारखी भरारी घेत विजय यांना नवीन आकाश खुणावू लागले.
वैभवच्या आठवणी कायम जवळ राहाव्यात आणि त्यातून समाजासाठी काहीतरी करावे, या विचारातून त्यांनी ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली आणि २००२ पासून सुसज्ज रुग्णवाहिका विकत घेऊन काम सुरू केले. दिवसभर नोकरी आणि रात्री रुग्णवाहिका चालवणे, त्यात मन रमवणे हाच एक मार्ग होता. वैभवचे बाल्य जपता यावे, त्याच्या आठवणींचा विसर पडावा, म्हणून अनाथाश्रम सुरू करावा, असे वाटू लागले. पदरची पुंजी खर्च करून, वारजे (पुणे) येथे दोन गुंठ्यांवर ‘आपलं घर’ उभे राहिले. अनेकांचे मदतीचे हात लाभले. या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी, विजय यांच्या आयुष्याला वळण देणारे काळे गुरुजी प्रेमाने आले. संस्था वाढत गेली. मुलांची संख्या वाढल्यामुळे वारज्याच्या जागेत मुलांना अडचण होऊ लागली. म्हणून सिंहगडाच्या पायथ्याशी अजून एक अनाथाश्रम आणि त्याचबरोबर वृद्धाश्रम सुरू झाले. आजीआजोबांना नातवंडांचे प्रेम मिळावे आणि नातवंडांना आजीआजोबांचे, हाच यामागचा मुख्य उद्देश होता.
अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ग्रामीण भागातील तरुणांसाठी निरनिराळ्या व्यवसायांचे नि:शुल्क प्रशिक्षण देणारे केंद्र, गोरगरिबांसाठी सुसज्ज रुग्णालय आणि त्याचबरोबर गावोगावी फिरणारी रुग्णवाहिका असे पाच उपक्रम सध्या ‘आपलं घर’द्वारे सुरू आहेत.
चांगल्या कामाला नेहमीच मदतीचे हात पुढे येतात. कष्ट, जिद्द, कामातील सातत्य, प्रामाणिकपणा आणि आपण करतो त्या कामाबद्दलची तळमळ यांमुळेच ‘आपलं घर’मध्ये विश्‍वासाची, प्रेमाची ऊब आहे. विजय काकांच्या रूपाने अनेक मुलामुलींच्या पंखाना ‘आपलं घरं’ बळ देणार आहे, आईबाबा नसलेल्या अनेक मुलामुलींच्या पाठीवर खंबीर हात ठेवून ‘फक्त लढ’ म्हणणार आहे.
मुलांनो, दिवाळीच्या, मे महिन्याच्या सुट्टीत ‘आपलं घर’मध्ये जरूर जा. विजय काकांचे ‘पराजय नव्हे, विजय’ हे पुस्तक जरूर वाचा. ‘आपलं घर’मध्ये जाऊन विजयकाकांना भेटा. तिथे राहणार्‍या आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळा, गप्पा मारा, त्यांना गोष्टी सांगा. असा एक ‘आगळावेगळा’ सुट्टीचा दिवस तुम्हाला खूप आनंद आणि समाधान देऊन जाईल, हे नक्की. 

 

- मुग्धा वाड