खंड्या

दिंनाक: 17 May 2019 15:13:55


 

अन्वयची वार्षिक परीक्षा संपली. आता खूप मज्जा! मे महिन्याची सुट्टी लागली. या वेळी अन्वय कोकणात मामाकडे जाणार होताच. पण अजून वेळ होता. आई-बाबांची रजेची व्यवस्था झाल्यावर त्याला जाता येणार होतं. तोपर्यंत अन्वयच्या मामाची मुलगी ओवी त्यांच्याकडे येणार होती. आता आई-बाबा त्यांना पाळणाघरात न सोडता त्या मुलांवरच घराची जबाबदारी सोपवून जाणार होते. शेजारचे आजी-आजोबा लक्ष ठेवणार होते.
अन्वय आणि ओवी दोघंही सातवीत होते. त्यांना आता घर सांभाळायचं म्हणून अगदी मोठं झाल्यासारखं वाटत होतं. ओवी म्हणाली, “आत्या, तू काळजी नको करू, मी अन्वयला सांभाळीन.” त्यावर अन्वय चिडून म्हणाला,“वा गं वा! आली मोठी सांभाळणारी! मलाच तुझी काळजी घ्यावी लागणार आहे!” अन्वयची आई म्हणाली,“अरे भांडू नका फक्त एकमेकांशी, तेवढं केलं तरी पुरे!”
घरात गोष्टीची पुस्तकं, कॅरम, पत्ते, सापशिडी सगळं काही होतं. शेजारची मुलं आल्यावर मस्त खेळ रंगायचा. मग दुपारी शेजारचे आजी-आजोबा त्यांना पोळी-भाजी खाण्याची आठवण करायचे. आजी त्यांना पन्हं द्यायच्या. मग थोडा वेळ टी.व्ही.वर कार्टून्स बघायची आणि टाईमपास करायचा. अन्वय गॅलरीत रोज पक्ष्यांना पोळीचे तुकडे ठेवायचा आणि पसरट भांड्यात पाणी पण ठेवायचा. त्याच्याकडे खारुताई, बुलबुल, कावळा, सनबर्ड, साळुंकी असे पक्षी आणि प्राणी यायचे. पण कधीकधी मस्त मातकट रंगाचा थोडा कावळ्यासारखा दिसणारा भारद्वाजसुद्धा यायचा. मग अन्वयचं फोटो सेशन सुरू व्हायचं. आलेल्या पक्ष्यांचे फोटो काढणं, एडिट करणं हे सगळं तो करायचा.
ओवीलाही पक्षी आवडायचे, तीपण त्याला मदत करू लागली.
एक दिवस दुपारी एक निळ्या मातकट अशा मिश्र रंगाचा खंड्या गॅलरीत आला. सहसा खंड्या असा माणसांजवळ येत नाही. अन्वयने नीट पाहिलं, तर त्या खंड्याचा एक पाय मोडला होता. तो एकाच पायावर बसला होता आणि त्याची हालचालही मंदावली होती. ओवीला हाक मारून त्याने तिला पण बघायला सांगितलं. ती म्हणाली, “अरे, अन्वय याच्या पायात दोरा अडकलाय, बघ नीट.”
अन्वयने दुर्बीण आणली. त्याला आता स्पष्ट दिसत होतं. पायाच्या नख्यांमध्ये दोरा चांगलाच अडकला होता. मुलं जवळ गेली तरी खंड्या जागचा हलत नव्हता. अन्वय बडबड करत करत हळूच त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,“आपण करू हा काहीतरी थांब, तुला आपण मोकळं करू या, घाबरू नको रे निळूभाऊ!” ओवीला ते खंड्याचे निळूभाऊ हे नाव ऐकून मज्जा वाटली आणि ती हसत बसली.
अन्वयकडे एका पक्षीमित्र काकांचा नंबर होता. ते शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायचे. मग अन्वयने खंड्याला घरात आणलं, एका फडक्यावर ठेवलं. शेजारच्या आजोबांना विचारून त्याने त्या पक्षीमित्र काकांना फोन लावला. तोपर्यंत ओवीने खंड्याला पाणी पाजलं. त्याचा पाय खूपच दुखत असावा. कारण तो काहीच हालचाल करत नव्हता.
आजोबांनी पक्षीमित्र काकांना छोटी कात्री दिली. त्यांनी पाहिलं, तर पतंगाच्या मांज्याचा दोरा खंड्याच्या पायात चांगलाच अडकला होता. हळूहळू त्यांनी तो सोडवला. खंड्याचा पाय मोकळा झाल्यावर त्याने थोडं उडून पाहिलं मग अन्वयने आणि ओवीने त्या काकांचे आभार मानले. काकांनी फोटो काढून घेतले. त्या खंड्याचे, त्याच्या पायाचे, अन्वय, ओवी, आजोबा यांचे पण! मग अन्वयने हळूच खंड्याला गॅलरीत नेलं आणि झोपाळ्यावर ठेवलं. मग तो आणि ओवी लांबून बघू लागले. खंड्याने हळूहळू पंख हलवले. थोडा फडफडाट केला आणि थोडा उंच गॅलरीच्या ग्रिलवर जाऊन बसला. मग तिथून जवळच्या झाडाच्या खालच्या फांदीवर, खूप वेळ तिथे बसल्यावर खंड्या मग उंच आकाशात उडून गेला. आणि लांबच्या पिंपळावर जाऊन बसला. इकडे आई-बाबा आल्यावर अन्वय आणि ओवीने सगळं वर्णन रसभरीत करून सांगितलं. आई-बाबांनी मुलांना शाबासकी दिली. दुसर्‍या दिवशी पेपरला पक्षीमित्र काकांनी दिलेला खंड्याचा आणि अन्वय - ओवीचा फोटो छापून आला. मे महिन्याच्या सुट्टीची सुरुवात छान झाली.

- चारुता प्रभुदेसाई