फुगा फोडी

दिंनाक: 17 May 2019 11:35:16


 

साहित्य : १० फुगे.
खेळायची तयारी : हा खेळ किमान दोन आणि जास्तीत जास्त कितीही जणांत खेळता येईल. हा खेळ अन्वय आणि सारा खेळत आहेत, असं समजू या. दोघांना ५-५ फुगे द्या.
चला खेळू या :
प्रथम सारा एक फुगा फुगवेल व अन्वयला देईल. अन्वयने फुगा हातात घेताच सारा सावकाशपणे १, २, ३, ४ असे २८ पर्यंत अंक म्हणेल. साराचे २८ अंक म्हणून होण्याआधी अन्वयने तो फुगा फोडायचा आहे. पण फुगा फोडण्यासाठी हाताचा उपयोग करायचा नाही. फुग्यावर जोरात बसून, पायाखाली दाबून किंवा फुग्यावर नाचून तो फुगा फोडायचा आहे. यानंतर अन्वय फुगा फुगवेल व साराला देईल. साराने फुगा हातात घेताच अन्वय पण १ ते २८ पर्यंत अंक म्हणेल.
अन्वयचे २८ अंक म्हणून होण्याआधीच सारा त्या फुग्यावर जोरात बसून, पायाखाली दाबून किंवा फुग्यावर नाचून तो फुगा फोडेल. हा खेळ मजेशीर वाटला तरी तो सोपा नाही. एका बैठकीत फुगा फोडणं हे या खेळातलं आव्हान आहे.
नियम :
२८ अंक म्हणून व्हायच्या आत फुगा फुटला, तरच फुगा फोडणार्‍याला १ गुण.
जमिनीवर ठेवलेला फुगा उडाल्यास फुग्यासोबत जागा बदलून चालेल, पण फुग्याला हात मात्र लावायचा नाही.
कोण जिंकेल :
पहिल्या फेरीत प्रत्येकाला ४ चान्स. आणि दुसर्‍या फेरीत प्रत्येकाला ३ चान्स. जो जास्तीत जास्त फुगे फोडेल तो जिंकला.
आणखी थोडी गंमत :
‘फुगे फोडी’ खेळ म्हणजे आरडा ओरडी करत फोडाफोडी. तुम्हाला डब्बल धमाका करायचा असेल, तर आधी फुगे पाण्यात भिजवा मग फुगवा. आता भिजलेल्या फुग्यावर नाचा किंवा धपकन बसा, फुगेराव पळतच सुटतात. या ओल्या फुगेरावांना लाथा मारल्या, तर ते उड्या मारतात. आता फुगेरावांना पकडायला काढा उठाबशा.