आपण बाहेरगावी प्रवास करताना पाण्याच्या बाटल्या विकत घेतो व पाणी संपल्यानंतर त्या फेकून देतो. अशा बाटल्यांचा वापर आपण छोटी छोटी रोपे लावण्यासाठी करू शकतो.
साहित्य
प्लॅस्टिकची रिकामी बाटली, पंचिंग मशीन  (किंवा बाटलीला व्यवस्थिता भोक पाडता येईल अशी वस्तू), बाटली टांगण्यासाठी सुतळी किंवा नॉयलॉन दोरा, कटर, कातरी, फेव्हिकॉल वापरात नसलेले कागद, तिकिटे, दुकानाची बिले (जे कागद आपण रद्दीमध्ये टाकू शकत नाही असे वापरल्यास उत्तम) माती, रोपे/बियाणे.
 
कृती :
बाटलीचा अर्धा किंवा तीन तृतीयांश भाग कटरने व्यवस्थित कापून घ्या. बाटलीच्या तळाशी ३-४ लहान लहान छिद्रे पाडून घ्या, त्यामुळे मातीमधील ज्यादा पाणी निघून जाईल. कापलेल्या भागापासून १-१.५ सें.मी. खाली सुतळी बांधण्यासाठी सर्व बाजूंनी समान अंतरावर भोके पाडा. टाकाऊ कागदांचे तुकडे करून फेव्हिकॉलने बाटलीच्या बाहेरील बाजूने चिकटवा. या कागदाला आवडता रंग देऊन सजावटीसाठी पिस्त्याची टरफले, डाळी, रंगीत बटणे इत्यादीचा वापर करून सजवू शकता. हा पॉट वापरण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामध्ये आवश्यक तेवढी माती घालून त्यात छोटी रोपे लावा. भोकातून सुतळी ओवून  बरोबर मध्यभागी दुसर्‍या सुतळीने टांगून ठेवा.