घरोघरी देव

दिंनाक: 16 May 2019 14:24:00


 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात देवळांमध्ये, ज्योतिषांकडे गर्दी वाढलेली दिसते. प्रत्येक क्षेत्रात, नोकरीत दिवसेंदिवस वाढणार्‍या ताण-तणावांपासून सुटका करून घेण्याची ही माणसांची धडपड असते. देवळांमध्ये जाणे कधीही चांगलेच. देवाप्रती मनोमन भक्तीभाव ठेवला, श्रद्धा ठेवली; तर माणसाची पावले आपोआपच देवळाकडे वळतात आणि तमुक वस्तू अर्पण करीन, मला परीक्षेत चांगले मार्क्स पाडलेस, तर मी मुझ्या चरणी एखादी वस्तू अपर्ण करीन, असेही म्हणणारे भक्त या जगात आहेत. खरेतर अशा वेळी देवाची आठवण येणे; म्हणजे देवाला वेठीस धरण्यसारखे आहे. तसेच, त्याला काही अर्पण करणे, म्हणजे देवालाच लाच देतो की काय असे वाटल्याशिवाय राहात नाही. भक्तिभाव हा कधीही चांगला. पण तो फक्त देवाच्याच प्रती का? दगडाचा तो देव आणि हाडामासाच्या माणासाचे काय? देव म्हणजे तरी काय हो? देव म्हणजे फक्त चांगला, ही संकल्पनाच माणसांमध्ये रूढ झाली आहे. पण, माणूसही चांगला असू शकतो, हे मात्र कोणीच लक्षातच घेत नाही. शेवटी देव आणि दानव या दोन परस्परविरोधी वृत्तीच आहेत. देव हा फक्त चांगलंच करतो आणि दानव हा वाईट गोष्टीच करतो, असाच समज सर्वमान्य आहे. पण, माणसांतही काही चांगले गुण असताताच. या माणसांपुढे, त्यांच्या गुणांपुढे आपण नतमस्तक का होत नाही? तो देव नाही म्हणूनच ना!

 आज समाजामध्ये अशी असंख्य माणसे आहेत की, जी खरंच फक्त समाजासाठी, दुसर्‍यासाठी काय चांगलं करू शकतो; याचाच विचार ते करताना दिसतात. अशा माणासांचा समाजात सन्मानही होतो. पण देवाप्रती जी श्रद्धा असते, जी भक्ती असते ती अशा चांगल्या लोकांप्रती कोणी ठेवू शकेल, असे वाटत नाही. समाज या चांगल्या माणसांपुढे नतमस्तक का होत नाही? कारण, त्यांचे आचार-विचार, त्यांची वृत्ती तर देवाचीच आहे. पण फक्त ते देव नाहीत, तर माणूस आहेत एवढाच फरक आहे.

आजच्या काळातील तरुण पिढीही आपल्या आई-वडिलांना नीट वागवत नाही. आपल्या आई-वडिलांची त्यांना अडचण वाटू लागते. असे लोक कितीही देवळात जात असले, कितीही उपास-तापास करते असले, देवाच्या नावाने दुसरे काही करत असतील, तरी त्याला किंमत शून्य आहे. कारण, नसलेल्या देवासाठी एवढे तुम्ही करू शकता, तर मग तुमचे आईवडील; ज्यांनी तुमच्यासाठी इतकी वर्षे खस्ता काढल्या त्यांचे काय? त्यांच्याशी तुम्ही का नाही नीट वागू शकत? देवाप्रती दाखवता तीच श्रद्धा जर आपण त्यांचे ठायी दाखवली, तर घरात बसल्याबसल्या देवळात गेल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. फक्त आई-वडीलच नाही, तर अशा अनेक व्यक्ती आपल्याला या ना त्या प्रकारे मदत करत असतात. आपल्या अडचणीच्या वेळी धावून आलेल्या व्यक्तीबद्दलदेखील आपण ‘अगदी देवासारखा भेटलास बघ!’, असे नुसते शाब्दिक म्हणतो. पण हे फक्त तेवढ्यापुरतेच असते. आजकाल पैशामुळे तर सख्ख्या भावांचेही पटत नाही. एखाद्या इस्टेटीवरून, वारस हक्कांवरूनही भावाभावांमध्ये, वडील आणि मुलांमध्ये भांडणे, मारामार्‍या होतात. एकंदर समाजामध्येही चोर्‍या-मार्‍या, खून या गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू लागल्या आहेत. समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे माणूस माणसासारखे न वागता राक्षस होऊ लागले आहेत. ही खरेतर समाजाची अधोगतीकडेच वाटचाल सुरू झालेली आहे.

आज जी सज्जन, चांगली माणसे म्हणून या पृथ्वीतलावर आहेत, त्यांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी आहे. पूर्वीही अशी वेळ आली की, देव पृथ्वीवर अवतार घ्यायचे, असे म्हणतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही सगळी देवपदाला पोहोचलेली संतमंडळी. ही भावंडेही पूर्वी सामान्य माणसेच होती. त्यांनाही समाजातील दानवांचा त्रास झालाच. पण त्यांनी आपल्या अंगातले देवपण कधीही सोडले नाही. सदैव समाजाला चांगलेच देण्याचे काम या भावडांनी केले. त्यांच्यातील या देवपणापुढे, त्यांच्या या चांगल्या वृत्तीपुढे अखेर समाज नतमस्तक झाला आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून त्यांना छळले, तीच सर्व मंडळी त्यांचे शिष्य झाली. म्हणूनच तर म्हणतात की, देव हा सगळीकडे आहे. देव प्रत्येक मनुष्यप्राण्यात आहे. तो सर्व चराचर सृष्टीतही आहे. देवळातला देव हा मूर्त स्वरूपात दिसतो. तर प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये देव हा सुप्त गुणांमध्ये असतो; पण ही देवासारखी वृत्ती अगदी मोजक्या लोकांचीच दिसू शकते. बाकी सर्व समाज हा दानवी वृत्तीला बळी पडत चालला आहे. त्यामुळेच या समाजाची अधोगती होत चालली आहे. देवाप्रती जशी श्रद्धा ठेवतो, देवाची जशी भक्ती करतो; तशी भक्ती जर जिवंत माणसांची केली, तर नक्कीच माणसा-माणसांमध्ये प्रेम निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. जसा देव प्रसन्न होतो; तसा माणूसही एकमेकांवर प्रसन्न होऊनही त्यातून एक उत्तम समाज निर्माण होईल. जेव्हा सर्व मानवी समाजामध्ये देवासारखे सुप्त गुण वाढीला लागतील, त्यांच्यातील सुप्त गुण जागे होतील; तेव्हाच त्यांच्यातील दानवी वृत्ती नाहीशी होऊन सगळीकडेच चांगुलपणा वाढीला लागेल आणि मग या पृथ्वीतलाचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक घरात जर असे देव निर्माण झाले, तर मग देवळात जायची गरजच भासणार नाही. प्रत्येक घर हे देऊळच आहे, असेच वाटू लागेल. पण खरेच, असा दिवस कधी येईल का? मनाच्या देवळाच्या गाभार्‍यातील घंटा कधी वाजेल का?

- सुधीर शरद दाते