नवनवीन गोष्टी शिकण्याची मानवी मेंदूची क्षमता खूपच मोठी आहे. ती मेंदूतील चेतापेशींच्या व चेतातंतुंच्या लवचीकतेमुळे असते. आपण ही लवचीकता जेवढी जपू, तेवढी ती वाढत जाते. आणि मेंदू नवनवीन गोष्टी शिकणे व त्या लक्षात ठेवणे हे काम सहजतेने करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रम मात्र नक्कीच करावे लागतात.

आपल्या मेंदूतील मन हे भाग कसे काम करत असतो ते आपण पहिले. लिम्बिक कॉर्टेक्स वगैरे भाग मन म्हणून कसे काम करतात ते पहिले. ते मन सशक्त करण्यासाठी त्याला कसे ‘ट्रेन’ करायचे, ते आपण पहिले. त्याविषयी टिप्स आतापर्यंत दिल्या. आता मनाशीच संबंधित मेंदूच्या वेगळ्या कार्याकडे थोडे वळू या. ते कार्य म्हणजे स्मरणशक्ती.

एखादी गोष्ट (ऐकलेली, पाहिलेली) मेंदूमध्ये साठवली जाणे व योग्य वेळी ती परत सांगता/लिहिता येणे, याला आठवण्याची शक्ती किंवा स्मरणशक्ती असे म्हणतात.

आपण पाहिलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टी आपल्या मेंदूत ठराविक ठिकाणी उमटतात (registrar होतात). उदा. ऑक्सिपिटल कॉर्टेक्समध्ये वाचलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टी, तर टेम्पोरल कॉर्टेक्समध्ये ऐकलेल्या गोष्टी रजिस्टर होतात. अर्थात त्यासाठी मेंदू पूर्ण एकाग्र असणे आवश्यक असते. त्यासाठी मेंदूतील रेटीक्युलर अॅक्टिवेटिंग सिस्टिमचे काम महत्त्वाचे असते. ही संस्था जर व्यवस्थित कार्य करत असेल तर एकाग्रता वाढते व रजिस्ट्रेशन चांगल्या प्रकारे होते. या कामात हायपोथॅलॅमस वगैरे भागांचीही मदत होते.

रजिस्टर झालेला हा भाग त्यानंतर लघुकालीन स्मरणकेंद्रात (short term memory मध्ये) जातो. त्यानंतर परत परत प्रक्टिस केल्यावर, चिंतन केल्यावर त्यातील भाग दीर्घकालीन स्मरणात जातो.

परवाच एक आई तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली होती. “माझ्या मुलाला परीक्षेत काही लिहीताच येत नाही. घरी तीच उत्तरे बरोबर सांगतो किंवा लिहितोसुद्धा, पण परीक्षेत आठवत नाही.”

अनेक मुलांना ही भीती असते की, परीक्षेत पेपर लिहिताना मला एवढा सगळा अभ्यास आठवेल की नाही ? मग हिच भीती वाढत जाऊन काही वेळा खरी ठरते.

म्हणजेच, आपली स्मरणशक्ती चांगली असेल तर ही समस्या येणार नाही. आपला मेंदू म्हणजे काही संगणक / कॉम्प्यूटर नाही की एखादी चिप / सॉफ्टवेअर घालून ती वाढवता येईल. आपल्या मेंदूने संगणकाचा शोध लावला आहे, तर मेंदू हा संगणकापेक्षा जास्त वरच्या स्तरावरचा आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवणे हे सॉफ्टवेअर घालण्याएवढे सोपे काम नाही. किंवा संगणकात नुसते ‘save’चे बटण दाबून एखादी माहिती ‘Memory’त घालता येते, तसा सोपा हा प्रकार नाही. आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जसे आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात, तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.

चांगली स्मरणशक्ती ही तुमच्या सुदृढ मनावर व मेंदूच्या एकाग्रतेवर, तरलतेवर अवलंबून असते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टींवर परिश्रम घ्यावे लागतात.  

इंग्रजीत एक म्हण आहे, You can’t teach old dog new tricks. पण आमच्या मेंदूच्या बाबतीत ही म्हण अजिबात लागू नाही. वेगवेगळ्या गोष्टी समायोजित करण्याची आपल्या मेंदूची शक्ती अफाट आहे. अगदी वृद्ध वयातदेखील लोक मोबाईल, संगणक शिकू शकतात ते याचमुळे. त्याला ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ किंवा ‘मेंदूची लवचिकता’ असे म्हणता येईल.

योग्य अशा उत्तेजनामुळे चेतापेशीच्या व चेतातंतुच्या पातळीवर मेंदूत नवीन जोडण्या होऊ शकतात आणि म्हणून शिकून शिकून, प्रयत्न करून तुम्ही स्मरणशक्ती वाढवू शकता.

त्यासाठी आपण खालील मुद्दे विचारात घेणार आहोत, जे पुढच्या लेखात विस्ताराने येतील.

स्मरणशक्ती वाढवण्याचे थोडक्यात उपाय याप्रमाणे –

 • झोप व व्यायाम न टाळणे.
 • वेळेचे योग्य नियोजन करणे ; जेणेकरून मित्र, मजा, मनोरंजन यासाठी वेळ राहील.
 • मनाला, मेंदूला ताणमुक्त ठेवणे.
 • मेंदूची लवचिकता वाढवणाऱ्या आहारावर भर देणे.
 • मेंदूला स्मरणाचे काही व्यायाम देणे.
 • स्मरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आत्मसात करणे.
 • आपली अध्ययन क्षमता वाढवणे.

आपण पहिले की मेंदूला आपण नवीन पद्धती शिकवू शकतो. किंबहुना, नवनवीन गोष्टी शिकण्याची मानवी मेंदूची क्षमता खूपच मोठी आहे. ती मेंदूतील चेतापेशींच्या व चेतातंतुंच्या लवचीकतेमुळे असते. ही लवचीकता जेवढी जपू, तेवढी ती वाढत जाते. आणि मेंदू नवनवीन गोष्टी शिकणे व त्या लक्षात ठेवणे हे काम सहजतेने करू शकतो. त्यासाठी आपल्याला श्रम मात्र नक्कीच करावे लागतात. पुढे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, त्या पण आत्मसात केल्या व आचरणात आणल्या तर स्मरणशक्ती नक्की वाढू शकते.

 • त्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप व व्यायाम या दोन्ही गोष्टी टाळू नका.

झोपही टाळू नका आणि व्यायामही टाळू नका. या दोन टोकाच्या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य गाठता आला पाहिजे.

शारीरिक व्यायामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा तर वाढतोच, शिवाय मेंदूतील रेटिक्युलर अॅक्टिव्हेटिंग सिस्टीम उद्वीपित होते. त्याचबरोबर मेंदूत एन्डॉर्फीन नावाची संप्रेरके स्त्रवतात, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

तुमची झोप अपूर्ण झाली तर तुमची कल्पनाशक्ती, कार्यक्षमता, विवेकपूर्ण विचार करण्याची क्षमता कमी होते. दिवसभरात सहा ते सात तासांची झोप घेतल्यास मेंदू अधिक ताजातवाना राहतो व कार्यक्षम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप आवश्यक आहे. म्हणून म्हणतात,

Improve your Memory by sleeping on it.

 

 • मौजमजा, मनोरंजन, मित्रांबरोबर ‘टाईमपास’ या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळे खेळ खेळणे, मित्रांबरोबर फिरणे, गप्पा मारणे, हसणे, खिदळणे किंवा एखादा सुंदर सिनेमा-नाटक पाहणे या मनोरंजनालासुद्धा महत्त्व आहे. या ‘रिलॅक्सेशन’मुळे मेंदू ताजातवाना राहतो व कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
 • उत्कृष्ट नातेसंबंधही अध्ययनाची एकूण क्षमता वाढवण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे मेंदूला एक प्रकारचे उद्वीपन मिळत असते. अर्थपूर्ण नातेसंबंध, दृढ नातेसंबंध सुदृढ मदतीचे हात देण्यास उपयोगी ठरतात. त्यामुळे केवळ भावनिक आरोग्याच नव्हे, तर मेंदूचे एकूण आरोग्य चांगले राहते. हार्वर्ड स्कूलच्या एका संशोधनाने सिद्ध केले आहे कि माणूस जेवढा सामाजिकदृष्ट्या कार्यशील, तेवढी त्याची स्मरणशक्ती जास्त चांगली राहते.
 • Laughter is the best medicine.
 • इतर भावनिक प्रतीसादांपेक्षा हास्याचा प्रतिसाद संपूर्ण मेंदुभर पसरतो. विनोद ऐकणे, विनोदी चिलाईन्स टाकणे/विचार करणे हे मेंदूच्या अध्ययनक्षमतेसाठी, कल्पनाशक्तीसाठी आवश्यक असते.

 

त्यासाठी खालील गोष्टी कराव्या :

 • स्वतःला हसावे : स्वतःचे विनोदी, हास्यास्पद किस्से इतरांना सांगावे किंवा कधी जेव्हा आपण स्वतःला नको इतक्या गंभीरपणे घेतले आहे असे किस्से ऐकवावे.
 • हास्याचा मागोवा घेऊन त्यात सामील होणे : आपल्याला आजूबाजूला कोणी हस्ते आहे, असे दिसले तर त्यांच्यात सामील व्हावे. त्यांच्या विनोदात सहभागी व्हावे.
 • विनोद हा संसर्गजन्य आहे. त्यामुळे विनोद करणाऱ्या, जमणाऱ्या अशा व्यक्तींचा सहवास सहसा चुकवू नये.
 • स्वःचे हस्तानाचे, घरातल्यांचे मजा करतानाचे फोटो पाहावेत. त्या आठवणीत रममाण व्हावे. विनोदी आठवणी काढून खिदळावे. अशा अनेक आठवणी आपल्याला हास्यात बुडवतात.
 • छोट्या मुलांबरोबर खेळावे.

 

या सर्वांतून सत्वपूर्ण हास्याचा रस स्त्रवला जातो, जो संपूर्ण मेंदूला उद्विपित करतो व त्यामुळे कार्यक्षमता वाढवतो, पर्यायाने स्मरणशक्ती !

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी झोप, व्यायाम, मनोरंजन यासाठी (योग्य तेवढा) वेळ देणे हे किती व कसे आवश्यक आहे ते आपण पहिले. ‘हास्यरस’ हे स्मरणशक्ती वाढवण्याचे उत्तम टॉनिक आहे, हेसुद्धा आपण मागील भागात पहिले. आता इतर काही महत्त्वाच्या पायऱ्यांची/ आवश्यक गोष्टींची माहीती आपण करून घेऊ.

 • ‘तणाव नियोजन’ किंवा ‘टेन्शन मॅनेजमेंट’ हीसुद्धा स्मरणशक्ती वाढवण्याच्या उपयातील एक महत्त्वाची पायरी आहे. कारण टेन्शन म्हणजे जे मनात असते, शरीरावर दिसते, नात्यातून बोलते, कामातून कळते. म्हणजेच मनावर/मेंदूवर टेन्शन असेल तर अभ्यास करण्याच्या इच्छेवर, एकाग्रतेवर पर्यायाने स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो.

त्यासाठी टेन्शन कमी करण्यासाठी ‘विवेकी’ किंवा ‘सकारात्मक’ दृष्टीकोन कसा ठेवायचा, हे आणि मागे काही लेखांमधून पाहिलेच आहे. तेव्हा आपण हेदेखील बघितले कि योगाभ्यास/योगमार्गाचा अवलंब केल्यास ताणाचे नियोजन करण्यास त्याचा उपयोग होतो. कारण भगवान श्रीकृष्णांनी ‘कर्मसंन्यास योगात’ म्हटले आहे कि आपल्या प्राकृत भावनांचे उद्वीपन नियंत्रित केल्यास जो शिकतो तो खरा योगी, खरा सुखी मनुष्य ! म्हणजेच योगमार्ग हा आपल्याला आपल्या नकारात्मक भावना, विचार नियंत्रित करण्यास मदत करतो.

योगामुळे किंवा कुठल्याही Meditation मुळे मेंदूतील Prefrontal Cortex (प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) ची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते, जिथे स्मरणशक्तीचे केंद्र असते. तसेच योगामुळे मेंदूतील पेशींची एकमेकांशी जोडणी अधिक कार्यक्षम होते. एकाग्रता वाढण्यात व स्मरणशक्ती वाढण्यात या सर्वांचा परिणाम होत असतो.

 • मेंदूची कार्यक्षमता वाढवणारा आहार हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी फळे, सर्व प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, ‘आरोग्यदायी’ स्निग्ध पदार्थ हे उपयोगी ठरतात.

यात प्रामुख्याने ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ हे मेंदूसाठी फारच उपयुक्त ठरतात. मासे हा या पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. माशांमधून ही फॅटी अॅसिड्स जास्त प्रमाणात शरीरात जातात, जी मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात. कॉडलीव्हर ऑईल किंवा शार्कलिव्हर ऑईल या Fish oil supplements मधून शाकाहारी लोक हा पदार्थ घेऊ शकतात. त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया, सोयाबीन, बदाम, फ्लॅक्सिड ऑईल यामधूनही Omega-३ मिळू शकते.

त्याचबरोबर सॅच्युरेटेड फॅट्स (Saturated fats) चे जेवणातील प्रमाण कमी करणे अत्यावश्यक आहे. रेड मी, दूध, लोणी, चीज, आईसक्रिम यांचे सेवन कमी केले तर मेंदूची कार्यक्षमता वाढते.

फळे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये सर्वात जास्त अॅन्टिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पालक, मेथी, ब्रोकोली, लेट्युस, फळांमध्ये आंबा, द्राक्षे, बेदाणे,काळ्या मनुका, कलिंगड यांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

त्याचबरोबर गहू, गव्हाची पोळी, ब्रेड (गव्हाचा), ओट्स, कडधान्ये यांमुळे मेंदूची कार्यक्षमता खूपच वाढायला मदत होते.

 • आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मेंदूचे व्यायाम, स्मरणशक्तीच्या वेगळ्या क्लृप्त्या शिकणे.

वेगळी भाषा शिकणे, वेगळे वाद्य वाजवायला, गाणे म्हणायला शिकणे, एखादा खेळ शिकणे, कोडी, सुडोकू सोडवणे हे सगळे मेंदूचे व्यायाम आहेत.

७-८ वर्षांपर्यंत मेंदू पूर्ण विकसित झालेला असतो. नवी माहिती आत्मसात करण्याची त्याची क्षमता वाढलेली असते. त्यामुळे असे ‘बौद्धिक व्यायाम’ केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते.

 

Memory Devices किंवा स्मरणाच्या वेगळ्या क्लृप्त्या/युक्त्या असे त्यास म्हणता येईल.

 • प्रतिमा डोळ्यासमोर उभी करणे – एखाद्या व्यक्तीविषयी लक्षात ठेवताना, जागेविषयी लक्षात ठेवताना तिची त्रिमित प्रतिमा (३-D image) लक्षात ठेवली तर बाकी आठवणे सोपे जाते. उदा. साबरमती आश्रम लक्षात ठेवताना त्यात महात्मा गांधी, चरखा, शेळ्या, बाजूची नदी अशी सगळी प्रतिमा लक्षात ठेवली तर सर्व इतिहास लक्षात राहू शकतो.
 • अर्थपूर्ण वाक्य तयार करणे – एखाद्या उत्तराचे मुद्दे लक्षात ठेवताना त्यातले पहिले अक्षर घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करून ते लक्षात ठेवले तर उत्तर लक्षात रहाते. उदा. एखाद्या उत्तराचे मुद्दे E,G,B,D,F अशा अक्षरांपासून असतील तर वाक्य Every Good Boy Does Fine.
 • पहिली अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवणे व लक्षात ठेवणे- मोठी सरोवरे लक्षात ठेवण्यासाठी HOMES म्हणजे Huron, Ontario, Michigan, Erie, Superior.
 • चालीत/गेयतेत लक्षात ठेवणे – ३० दिवस असणारे महिने लक्षात ठेवण्यासाठी Thirty days has September, April, June and November असे चालीत लक्षात ठेवू शकतो.
 • Chunking – मोठी माहिती छोट्या छोट्या भागात विभागून लक्षात ठेवणे. ९९५०४५१९१६ हा क्रमांक ९९-५०४-५१९-१६ असा Chunks मधून लक्षात ठेवू शकतो.

स्मरणशक्ती वाढवण्यास असे विविध उपाय उपयुक्त ठरतात. म्हणून एकाग्रतेने ऐका, वाचा, मनन करा, चिंतन करा म्हणजे लक्षात राहील.

 

डॉ. अद्वैत पाध्ये. (मानसोपचारतज्ज्ञ)