चिमण्यांची संख्या कमी झाली आहे, त्या दिसतच नाहीत असे मध्यंतरी बरेचदा ऐकू येई. ते आम्हालाही थोडे जाणवलेच. नाहीतर सकाळी कधी ५.३०-६ वाजतायत तोच कावळ्यांची कावकाव, चिमण्यांची चिवचिव चालू होई, त्यामुळेच आम्हाला जाग येई. गजराची गरजच लागत नसे.

चिमण्यांना बोलवण्यासाठी विचारांती आम्हाला एक उपाय सुचला. आम्ही तेलाच्या प्लॅस्टिकच्या दोन कि. डब्याला छोटा दरवाजा केला. तो खिडकीच्या जाळीमध्ये ठेवला. बाजूला मातीच्या छोट्या मडक्यात पाणीही ठेवले आणि त्या येतात का ? याची वाट पाहू लागली. सोबत थोडे तांदूळही ठेवले. पण आमच्या प्रयत्नांना यश काही आले नाही. निराशा न होता अगदी उघड्यावरच त्यांना पोळीचा चुरा, कधी भात असे लाकडी फळीवर कुंडीच्या बाजूला ठेवत होतो. भाकरी मात्र त्या अजिबात खात नाहीत हं ! मग त्या तेथे येतात का, याचा स्वयंपाकघराच्या खिडकीतून वेध घेत होतो. दोन-चार दिवसातच चिमण्या आल्याने, प्रयोग यशस्वी झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला.

खिडकीच्या जाळीमध्ये आमची बरीच झाडे आहेत. समोरच्या आंब्याच्या, पेल्टोफोरमच्या झाडावर चिमण्या चिवचिवत, भिरभिरत असतात. पण त्या कोपऱ्यात आपल्याला काही खायला मिळेल, याचा त्यांना शेवटी कसा काय सुगावा लागलाच. हळूहळू एक-दोन-चार अशा करीत येथे येऊ लागल्या. त्या वेळी त्यांचे भुर्रकन येणे, ते खाणे मिळवण्यासाठीचे एकमेकींशी लटके भांडण, पंख फडफडवत चिवचिव करणे, इकडे-तिकडे फिरणे हे सर्व आम्ही कौतुकाने पाहत बसायचो. आता तर त्यांची संख्या दहा-बारा होऊ लागली आहे. काही वेळेला आम्ही चहा घ्यायच्या आधीच त्यांना पोळी चुरा देतो.

इवलेसे त्यांचे पोट नाश्त्याने भरले कि थोडा वेळ त्या येत नाहीत. हे पाहून खारुताई हळूच आपली हजेरी लावते. पाठीवर तीन पट्टे असलेली आई खारुताई हळूच आपली हजेरी लावते. पाठीवर तीन पट्टे असलेली आई खारुताई आपल्या पिलाला ही जागा दाखवून देते. इकडे-तिकडे पाहत चिमण्यांनी टाकलेला खाऊ गुपचूप फस्त करतात. आमच्या सोसायटीतही खूप झाडे आहेत. करंज, फणस, जांभूळ, नारळ, पेरू, आंबा, गुलमोहर, पेल्टोफोरम, कडुलिंब, बकुळ, चाफा, रातराणी, जास्वंद, अनंत वगैरे. पैकी आमच्या घरासमोरील पेल्टोफोरमच्या झाडावर शुकराजही येतात बरं ! कधी नारळीच्या झावळीवर तर कधी केबल वायरवर ते मधूनच विठू विठू करीत ऐटीत बसलेले असतात. ते पेल्टाची पिवळी फुले व कोवळ्या शेंगा पायात धरून आरामात खात असतात ! चिमण्यांना आमच्याकडे काय खाऊ मिळतो हे पाहायला हे तीन-चार शुकराज आमच्या खिडकीच्या जाळीवर येऊन न्याहाळत बसले होते. अगदी गेल्या आठ-पंधरा दिवसातलीच ही गोष्ट आहे आणि दूरवर हे सर्व पाहत बसलेली पिवळी चोचवाली साळुंकी त्यांच्या पाठोपाठ येऊन गेलो की ! दुसऱ्या खोलीतून त्यांना जवळून पाहण्यासाठी हळूच आम्ही गेलो, पण त्यांना सुगावा लागताच ते पटकन उडूनही गेले. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी दोनतीन मिरच्या टांगल्या, पण पठ्ठे आलेच नाहीत.

गेल्या आठवड्यात तर जाळीवर एक पोपट येऊन छान बसला होता. आणि एके दिवशी तर सकाळी आठच्या सुमारास पुन्हा एक पोपट खाऊसाठी तेथेच आला. बहुतेक त्यांना आमची सवय लागलेली दिसतेय. पोपटांसाठी आता आम्ही कणीस टांगून ठेवले आहे. पाहू या, ते येतात का. मग तुम्ही असा प्रयोग करून पाहणार ना ?

- मीनल पटवर्धन