त्यांना जरी ठाऊक नसलं तरी ते पुढे ‘निअॅंडर्थल’ मानव म्हणून ओळखले जाणार होते. म्हणजे त्यांचे अस्थिरुपी अवशेष. ते ज्या नदीच्या काठी एका खडकावर बसले होते तिचं भविष्यातलं नाव होतं ‘निअॅंडर’. अर्थात या गोष्टीचं त्यांना काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांची भाषा बरीच वेगळी होती. तीत हुंकार, जीभ टाळूवर आपटून काढलेले आवाज, शीळ इत्यादी ध्वनी निर्मिती महत्त्वाची ठरत होती. पण या सगळ्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात काय घडलं ते बघू या.

‘कृत्रिमरीत्या आग ? तू निर्माण करतेस ? म्हणजे काय ?’ आधीच भव्य असलेल्या आठ्याळ कपाळावरच्या आठ्या आणखी वाढवत ‘ओह्’ म्हणाला. त्यानं त्याच्या शेजारी स्वतःचीच केसाळ छाती खाजवत बसलेल्या ‘हूं’कडं बघितलं. हा त्याचा मित्र ‘हूं’ जरा वेडसरच होता. वेगवेगळे दगड गोळा कर, शेवाळं वाढव असे त्याचे उद्योग चालत. त्यांच्या टोळीतला सर्वात निरुपयोगी सदस्य म्हणून तो प्रसिद्ध होता. आत्ता सुद्धा त्यानं त्या खडकाच्या तातल्या त्यात सपाट भागावर वाळक्या काटक्या, वाळकं शेवाळं अशा गोष्टींचा ढीग रचलेला होता. त्याच्या भोवती खडकाचे तुकडे उभे करून आडोसा निर्माण केला होता.

ते बसले होते, तिथून जी पायवाट जात होती ती सरळ त्यांच्या गुहेकडं जात होती. त्या गुहेकडं पाठ करून ‘हूं’ बसला होता. तो मुद्दामच तसा बसला होता की काय ? ही शंका ‘ओह्’च्या मनात येऊन गेली होती. पण इ त्यानं काढून टाकली. याचं कारण ‘हूं’ काय करतोय ते तो टक लावून पाहत होता. ‘ओह्’च्या खांद्यावरचा सोटा त्यानं आता जमिनीवर टेकला. ‘हूं’नं त्याच्या सोट्याला एका बाजूला विश्रांती दिली होती. टोळी प्रमुखानं हे बघितलं तर ‘हूं’चं काही खरं नव्हतं.

झाडावर वीज पडते, तेव्हा काय होतं ? तसंच हे, पण इवलसं ! बोटांची चिमुट करून ‘हूं’ म्हणाला. तो आता दोन वाळलेल्या काटक्या जोरजोरात एकमेकींवर घासत होता. त्या काटक्यांच्या खाली शेवाळं होतं. काटक्या घासताना तो हळूवारपणे शीळ घालीत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य पसरतंय, असं ‘ओह्’ला वाटू लागलं.

‘हे असं केलं ना की वीज पडायची वाट बघावी लागणार नाही, बरं !’ मध्येच तो म्हणाला. पण त्यानं काटक्या घासायचा उद्योग थांबवला नव्हता. ‘ तू येडचाप आहेस!’ ‘ओह्’नं शेरेबाजी केली. थोडं थांब; मग बघ होतं ते. नंतर मला काय म्हणायचं ते म्हण.’ तेवढ्यात त्या वाळलेल्या शैवालातून धुराची रेषा उमटली. ‘हूं’नं त्यावर फुंकर घालताच तिथं एक इवलीशी का होईना, पण ज्वाळेची शेंडी दिसू लागली. ‘हूं’नं त्यात छोट्याछोट्या काटक्या टाकायला सुरुवात केली. मग मोठ्या. आता तिथं चक्क शेकोटीच तयार झाली. खरीखुरी. वणव्यातनं आणलेल्या जळक्या लाकडाच्या शेकोटीत आणि हिच्यात तसा फारसा फरक नव्हता. ‘हूं’ आता समाधानानं हसत होता. ‘ओह्’ किंचाळत एकदम उडी मारून उभा राहिला. तो दचकला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड विस्मय पसरला होता. त्याचबरोबर तो घाबरलाही असावा. त्यानं सोटा उगारला होता आणि काय करावं, हे न कळल्यानं परत खालीही घेतला होता. ‘ म्हण आता मी ‘येडपट’ आहे. म्हणून!’ ‘हूं’ म्हणाला. ‘ओह्’ चांगलाच हादरला होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य तर होतंच पण त्यात भीतीयुक्त आदरही मिसळला होता. ‘गडगडाटी वादळाची शपथ! अरे आग धोकादायक असते. आगीशी खेळायचं नसतं. लक्षात नाही तुझ्या, किती मार खाल्याय आपण ते? अरे, या आगीमुळं डोंगरमाथे उजाड होऊ शकतात. कसं कळत नाही तुला?’ ‘ जोपर्यंत ती या दगडांच्या सापळ्यात आहे ना, तोपर्यंत ती बिनधोक आहे. ती वापरता कशी येईल, हे बघायला हवं. तिचा हवा तसा उपयोग करून घेता आला तर काय मजा येईल ! केव्हाही भाजलेलं मांस मिळेल. वणव्याशिवाय. पुन्हा पेटलेलं लाकूड पावसात विझलं की कुडकुडत बसावं लागतं, तेही टळेल. मजाच मजा.’

‘ओह’ यावर काहीच बोलला नाही.

‘आंघोळीसाठी आपण उन्हाळी झरे शोधत हिंडतो, तेही कदाचित टळेल.’

‘हूं’चं स्वप्नरंजन थांबायला तयार नव्हतं.हे गुहेत न्यायचं आणि...

‘काय ? तू हे गुहेत नेणार ? धुरानं सगळे मरून जाऊ आपण ! ‘ओह’ किंचाळला. ‘तू सगळ्या टोळीचा घात करणार, एक दिवस. मी ’अहों’ना सांगतोच. सगळा वेडेपणा नुसता !’

‘पी गरम करायला ही कातडी चालणार नाहीत म्हणा. नवं काहीतरी शोधायला हवं !’ ‘हूं’ म्हणाला. नवं तंत्रज्ञान जन्माला आलं तर त्याला पूरक असं वातावरण आणि इतर काही साधनं निर्माण व्हावी लागतात याची ‘हूं’ला कल्पना नव्हती.

दरम्यान तिथं एकदम काही टोळीकर अवतरले. त्यांचं नेतृत्व ‘हुर्रर्र!’ करत होता. ‘हुर्रर्र!’ टोळीचा उपप्रमुख होता. ‘काय झालं?’ असं त्यानं विचारलं.

‘कोण ओरडलं?’ त्याच्या सुरावरून तो चिडलेले वाटत होता. काहीतरी संकट आपल्या टोळीच्या सदस्यांवर कोसळलं असणार, या कल्पनेनं तो धावत सुटला होता. त्यांच्यादृष्टीने हे दोघं आरामात उभे होते. मग त्याच्या नाकातधूर शिरला. म्हणजे कुठेतरी आग लागली असणार, हे त्याच्या लक्षात आलं. पण ते लक्षात यायच्या पूर्वी ? त्याच्या सहज प्रवृत्तीनं त्याच्या तार्किक मेंदूवर मात केली होती. ‘आग, आग ! पळा, पळा !’ असं ओरडत तो पळत सुटला होतं. त्यामागं मग बाकीचे टोळीवाले पळत सुटले. मग गुहेतल्या बायका मुलांचीही पळापळ सुरु झाली. ‘हूं’ त्याच्या निर्मितीकडे समाधानानं बघत होता. तर ‘ओह’ तिथंच थोड्या अंतरावर उभा होता, पण चांगलाच धास्तावलेला होता. थोड्या वेळात तो कल्ला थांबला. बायकापोरांना घेऊन टोळीकर गुहेकडं परतू लागले.

‘हुर्रर्र’च्या मागमाग ते परतत होते. जंगलात कुठंच आग नव्हती. पशुपक्षी शांतच होते. आपल्याला आधीच लक्षात यायला हवं होतं ; असं टोळीच्या उपप्रमुखाला वाटत असावं. समोर ‘ओह’ शांत उभा असलेला पाहून तो तिकडं वळला. तिथं ‘हूं’ पण होता. त्यांच्या समोर दगडांचा एक आडोसा होता. त्यातून हळूहळू धुरांच्या जटा हवेत पसरत होत्या. समोर ‘ओह’ खाली मान घालून उभं राहण्यापूर्वी ‘हुर्रर्र’नं त्याची निराशा, त्याचं वैफल्य, त्याचा वैताग झटकायला या दोघांवर राग काढला.

‘हे काय चाललंय ? कुठही आजुबाजूला वादळाची चिन्हं नाहीत मग इथं अग्नी कसा ?’

‘हूं’नं निर्माण केलाय तो.’ ‘ओह’नं उत्तर दिलं.

‘निर्माण केला ? तुला अक्कल आहे का ?’ त्या उपनेत्यांनं विचारलं.

‘माझ्यासमोरच निर्माण केला. मी बघितलाय.’ ‘ओह ठामपणे म्हणाला.’

‘पण का ?’

‘त्याला अक्कल कुठाय ? सगळेच त्याला पछाडलेला म्हणतात. कुठंल तरी भूत त्याच्या हृदयात शिरलंय !’ ‘ओह’नं स्पष्टीकरण दिलं. ‘त्याला तो अग्नी गुहेत घेऊन जायचंय, असंही म्हणाला तो.’

‘गुहेत ?’ ‘हुर्रर्र’ किंचाळलाच. तुला खरंच कुणीतरी पछाडलं असणार ? जंगलात एकटा फिरत जाऊ नकोस म्हणून कितीतरी वेळा सांगितलं. दृष्ट शक्ती तुमचा ताबा घ्यायला सतत उत्सुक असतात. कधी कळणार तुला ? गुहेत हे नेलं तारे सगळी टोळी बरबाद होईल. आहेस कुठं ?’

‘गुहेत याच्यावर झोपायलाच हवं, असं मी म्हणालोय का ? एका कोपऱ्यात ठेवायचा. पाण्यासारखा. पुरात, पावसात गुहेत पाणी शिरतं. पाण्यात आपण वाहून जाऊ शकतो. तरी गुहेत पाणी ठेवतोच ना आपण ? तसंच हे. जेव्हा गरज पडली तेव्हा वापरायचं.’

‘कसली गरज ? कुणाला हवाय तो, कशाला ?’ ‘हुर्रर्र’ला रागामुळं नीट बोलताही येत नव्हतं. प्राणी त्याला घाबरतात. आपल्या शत्रू टोळ्याही आगीला घाबरतात. हिवाळ्यामध्ये अस्वलं आपल्या गुहांत परततात. त्यांना भिववता येईल.’

तोपर्यंत तिथं बरीच गर्दी जमली होती. गर्दीतून एक आवाज आला, ‘धुराचं काय ? धुरात हवा नाकात घेता येत नाही.’

वाद चालूच राहिला.

‘सगळ्या टोळीवाल्यांना, इतर माणसांना धूरच धूर होईल. त्याचा सगळ्यांना त्रास होईल, त्याचं काय ?’

प्रत्येकानं अशा तऱ्हेने अडचणीचा पाढा वाचायला सुरुवात केली.

‘आग दूर ठेवा, आग गुहेत नकोच नको.’

‘हूं’ला आता कुणी बोलूच देत नव्हतं. त्याला हाकलून द्यायचा कि जिवे मारायचा, अशी चर्चा हळूहळू वाढली. ‘ओह’नं त्याच्या मित्राला बाजूला घेतलं, ‘मुर्खा, अजून तुला काय चाललंय हे लक्षात येत नाही ? वेळीच पळ काढ. यांची वादावादी थांबली कि तुझा जीव गेलाच असं समज.’ ‘हूं’ला ते पटलं. गर्दीचं लक्ष नाही असं बघून तो सटकला. पायवाटेवरून पळतपळत टेकडीआड नाहीसा झाला.

‘हूं’ जंगलात जीव वाचवत जगत होता. त्याच्या जवळच्या अग्नीमुळं त्याला बरीच सुरक्षितता लाभली होती. दिवसा बरंच वाळकं गवत गोळा करून ते एकत्र बांधून पेटवत असे आणि रात्री आपल्याजवळ शेकोटी पेटवत असे. त्यामुळे प्राणी त्याच्याजवळ येत नव्हते. त्यांच्यासारखा माणसांच्या इतर टोळ्यांना तो धोकादायक वाटू लागला होता. तो दिसताच ‘आगवाला’ असं ओरडत पळून जात. अखेरीस जवळची पर्वतरांग ओलांडून पलिकडे जावं, असं त्यानं ठरवलं.

तो प्रयत्नपूर्वक मोठ्या कष्टानं त्या पर्वत शिखरांना ओलांडून पलीकडच्या भूभागात गेला. तिथं एक वेगळ्याच प्रकारची जमात वावरत होती. थोडी नाजूक होती. त्यांचं कपाळही जरा वेगळंच होतं. भुवयाही पातळ होत्या. पुढं ही जमात होमो सेपियन्स म्हणून पृथ्वीवर राज्य करणार होती. या जमातीची काही शहाणी माणस एक दिवस त्याला आडवी आली. त्याच्या हातातल्या काकड्याकडं ती कुतूहलानं बघत होती.

‘हे काय आहे ?’ त्यातल्या एकानं विचारलं.

‘ही कुठंही वाहून नेता येईल अशी आग आहे. मी ती निर्माण केलीये.’

‘कशी ?’

‘ते गुपित आहे.’

‘ठीक आहे, पण अशी आग निर्माण केल्यानं फायदा होणार की तोटा ?’

‘तोटा नक्कीच नाही. फायद्याचं स्वरूप निश्चित नाही.’

‘पण फायदा होईल असं तुला वाटत असणार ना ? पण टू आमच्यासारखा दिसत नाहीस, कुठनं आलास ?’

‘पलीकडून’. त्या पर्वत रांगांकडे हात दाखवून ‘हूं’ म्हणाला. त्या माणसानं काहीशी अविश्‍वासानं आणि काहीशा आश्‍चर्यानं ‘हूं’कडे बघितलं. मग वळून आपल्या टोळीवाल्यांशी तो काहीतरी बोलला. दुपारभर त्यांच्यात बरीच चर्चा झाली. मग ‘हूं’ आणि ‘फ्रू’ एकत्र बसले. ‘फ्रू’कडे एक लाकडाचा गोल होता. तो ‘हूं’ नं तपासला त्यानं मग ‘फ्रू’ला काही गोष्टी सांगितल्या. मग ‘हूं’ला टोळीचं सन्माननीय सदस्यत्व आणि बायको करण्याचा हक्क द्यायचं ठरलं. शिवाय शिकारीत सहभागी न होता अन्नातला वाटाही मिळणार होता. पुढं ‘हूं’ त्या शहाण्या माणसांच्या टोळीत मरेपर्यंत सुखानं राहात होता. त्याला पर्वतापलीकडच्या आपल्या टोळीची आठवण येत असे. पण त्यांन परत तिकडं जायचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकला होता. त्याच्या मुलांना तो नव्यानव्या युक्त्या  शिकवी. एक दिवस तो सुखानं निजधामास गेला.

तो ‘हूं’ निघून गेला. त्यानंतरचा हिवाळा तसा खूपच चांगला लांबला. नंतर खूप कालावधीनंतर त्याचा कुणीतरी हिशोब केला. त्यावेळी तो हिवाळा 25 हजार वर्षे टिकला, असं म्हटलं गेलं; पण त्या गोष्टी भविष्यकाळातल्या. तो हिवाळा अखेरीस संपला. हिमनद्या मागं सरकल्या. भूभाग पून्हा हिरवा दिसू लागला. त्यावेळी पृथ्वीवर फक्त एकच मानव जात शिल्लक राहिली होती. ‘हूं’  जिथं जन्मला आणि जिथं त्यांन अग्नीनिर्मितीचं तंत्रज्ञान शोधून काढलं. त्या भागात आता त्याचे मूळ पूर्वज उरलेच नव्हते. तो ज्यांच्या टोळीत मेला त्या प्रकारच्या माणसांनीच पृथ्वी व्यापायला सुरुवात केली होती.

त्या प्रकारच्या एका मानवी टोळीतले ते दोन मित्र. एका नाल्यासाठी शिकार शोधायला आहे होते. गुर्रऽऽफुर्रऽऽ अशी त्यांची नावं होती, पण त्यांना कुणी नावानं हाक मारत नसे. झमझम जोडी म्हणूनच ते सर्वांना ठाऊक होते. ते टोळीचे नियम बरेचदा पाळत नसत. त्यामुळं त्यांना हे नाव मिळालं होतं. समोरचा पत्थर बघून ते थांबले. त्या पाषाणावर काही खुणा कोरल्या होत्या.

‘के काय आहे बघ!’ गुर्रऽऽ फुर्रऽऽला म्हणाला.

‘ते सगळ्या खडकांवर असंत. आपल्या आजी गोष्ट सांगायची बघ आपल्यापेक्षा वेगळी माणसंही होती. त्यांच्या खाणाखुणा आहेत त्या. सगळीकडं अगदी एक सारख्याच.’

‘त्याचा कुणी अर्थ का लावत नाही?’ गुर्रऽऽनं विचारलं.

‘लावलाय ना! पांढरा शुभ्र दाढी नं त्याचा अर्थ लावलाय. सगळ्या खुणा एकच संदेश देतात.

र्‘‘हूं’ घरी परत ये. तुझं म्हणणं सांग. तुझी गरज आहे.’ 

‘ते खरं पण तो घरी परत जाऊन काय करणार?

‘आपल्याला ते कसं कळणार? खूप जुन्या गोष्टी आहेत त्या.’

मग ते दोघं तिथून उठून शिकारीच्या शोधार्थ पुन्हा चालू लागले.

- निरंजन घाटे