मुलांनो, तुम्ही बाजारात अनेक फळे पाहिली असतील. हं, बरोबर आंबा, पेरू, चिकू, संत्र, द्राक्ष, मोसंबी, केळी आणि या उन्हाळी ऋतूतील जांभूळ, कलिंगड, टरबूज, फणस, अंजीर, वगैरे. आपल्याकडे बाजारात ऋतूमानाप्रमाणे फळं येत असतात आणि ती खाल्ली जावी असही म्हटलं जातं.

फळांच्या सालींपासून, बियांपासून आपल्याला कोणती नवनिर्मिती करता येईल / केली जाते, ते पाहू. प्रथम म्हणजे यापासून छानसं उत्तम सेंद्रिय खत तयार करता येतं. ते मी करते हं ! पपई, कलिंगड, हिरव्या सालींची मोठी केळी यांची साल घेऊन त्यांचे छोटे तुकडे करून कुंडीत / डब्यात पसरायचे आणि त्यावर माती टाकायची म्हणजे त्यावर माशा, चिलटं येणार नाहीत, घाण वासही येणार नाही. याच्या रतिबानंतर १ महिन्यानंतर हे खत आपल्याच झाडांना / सोसायटीतल्या झाडांना खूप उपयोगी पडेल. झाडं जोमाने वाढतील. पर्यायाने पर्यावरण रक्षण होईल, नाही का ? आणि झाडं लावायला फळांच्या या बिया उपयोगी असतात, ते तुम्हाला माहीतच आहे ना ?

  • आंबा : हा तर फळांचा राजा ना – याची सालं गाई, म्हशी खातातच. कोयीच्या आतल्या छोट्या पांढरट भागापासून कोकोसारखी पावडर बनवतात. खत ही बनतं, हे आपण वर पाहिलंच.
  • नारळ : याला श्रीफळ म्हणतात हं ! हा कल्पवृक्ष, हे तुम्ही शिकला असालच. त्याच्या चोडापासून खत होतंच, पण त्यापासून सुंभ, दोरखंड (हे बोटींवर उपयोगी हं !), पायपुसणी\, तसंच कॉईर बनवलं जातं. बिछाने बनवण्यासाठी ते उपयोगी असतं. केरळात कॉईर बोर्ड स्थापन झालं आहे. विविध वस्तू तेथे बनवल्या जातात. करवंटीपासून तेल व शोभेच्या वस्तू बनवतात.
  • कोकम : कोकणात याला रातांबा म्हणतात. याची सालं वाळवून आमसुलं बनवतात. रसापासून आगळ बनवतात. आणि याच्या बियांपासून मेणासारखं तेल तयार करतात. ते सौंदर्य प्रसाधनात वापरलं जातं. परदेशात त्याला खूप मागणी आहे. पायांच्या भेगा दूर करायला याचा उपयोग होतो.
  • संत्र : याच्या सालींचे छोटे छोटे तुकडे करून (याला टूटी-फ्रुटी म्हणतात.) साखरेच्या पाकात घोळवून, वाळवून ते केक, आईस्क्रीममध्ये वापरलं जातं. तसंच, ते तुकडे नुसते वाळवून, दळून शिकेकाईत घालतात किंवा चेहऱ्याला त्याचा लेप देतात. कलिंगड, काकडी, भोपळा, टरबूज यांच्या बिया भाजून त्यापासून मुखशुद्धी बनवतात. डाळिंब, जांभूळ, सीताफळ, द्राक्ष यांच्या बियांचा उपयोग आयुर्वेदात खूप होतो बरं ! काजू-बीच्या टरफलांपासून तेल (वंगण) काढतात. बोटींचं पाण्यापासून संरक्षण व्हावं, म्हणून बोटींना लावण्यासाठी या तेलाचा उपयोग करतात. फणसाच्या बियांपासून (अठळ्यांपासून) झाडंही, रोपंही तयार होतात आणि त्या उकडून त्यांची भाजीही करतात. गुरं त्या साली खातात अनिओ त्यांचं खतही होतं. आणि हो, साधं लिंबू...याच्या साली वाळवून, दळून, ती पावडर सौंदर्य प्रसाधनात, साबणात वापरतात. लिंबोणीच्या बियांपासून तेल काढतात. आपल्याकडे शेतकरी खत बनवण्यासाठी, तसेच कीटकनाशक म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.
  • केळं : गरिबांचं पोटभरू फळ. केळ्याच्या हिरव्या सालींच्या आतल्या पांढऱ्या भागापासून बिस्किटं बनवतात, ती बहुगुणी, मधुमेहींनाही उपयोगी. एका शाळकरी मुलीने याच्या शोधासाठी प्रयोग करून त्यात विविध फेरबदल करत खूप परिश्रम घेतले आणि ती बालवैज्ञानिक बनली, तिने परितोषिक मिळवलं.

यावरून प्रत्येक ताज्या साली-बियांपासून मानव काही ना काही बनवून पर्यावरणाच रक्षण करत असतो, नाही ?

तुम्ही यात काय करू शकतो ? तर छोट्या पिशवीत माती घालून, त्यात दोन बिया घालून ती कशी वाढतात ते निरीक्षण करा. माती ओली होईल एवढं थोडंसं पाणी घाला. नोंद ठेवा. दोन-चार पण कधी, कशी वाढत आहेत, त्याचे वेगवेगळे रंग, आकार, काळ याची नोंद करा. पुढे स्व-अध्ययन करताना याचा खूप उपयोग होईल. निसर्गाजवळ जाताना खूप मजा वाटेल. घरच्या घरी बिनाखर्चाने खत बनवा, त्यासाठी मी मार्गदर्शन नक्की करीन.

- मीनल पटवर्धन