सुट्टी ! ही मुलांच्याच नव्हे, तर तसे बघायला गेले तर मोठ्या माणसांच्याही दैनंदिन जीवनात आनंदाची पर्वणी घेऊन येणारी गोष्ट, असेच तिचे वर्णन करता येईल.

आज सुट्टी, शाळेच्या दिवसातील उन्हाळ्याची, दिवाळीची कुठलीही मोठी सुट्टी म्हटली की त्या आनंदभऱ्या दिवसांच्या आठवणींनी मन भरून येते. परीक्षा संपली आणि सुट्टी सुरु झाली की मग आमच्या सोसायटीतील, आजूबाजूची मुले, आम्ही मस्त तीन-चार जण सकाळी खेळायचो. पण खेळणे संपवताना ठरायचे की दुपारी कोणाच्या घरी जमायचे ते ! मग घरी जाऊन पटकन अंघोळी, जेवणे उरकायची. त्या वेळी जेवणाची एवढी आवड नसायची किंवा लक्ष नसायचे. कारण ते पुढच्या खेळाच्या लक्ष्याकडे लागलेले असायचे. पण आठवतेय की जेवणात कैरीचा पदार्थ नक्की असायचा. कैरीचा चुंदा, कांदा-कैरीचे टकु, आंबा, आमरस अशी चढती भजनी असायची. मग दुपारी कोणाकडे तरी जमून पत्ते, व्यापार, कॅरम असे डाव रंगायचे. मग कोणाच्या तरी आईने हाक मारली की (म्हणजे अनेकदा, एकदा नव्हे!) मग ग्रुपमधली मुले हळूहळू पांगू लागत, पण अर्थात संध्याकाळी खेळण्याच्या इराद्यानेच ! मग लगेच संध्याकाळी पुन्हा दोनतीन तास खेळणे, क्रिकेट, लगोरी, डबाआईसपाईस, कित्ती कित्ती खेळ खेळले तरी मन थकायचे नाही. मध्ये-मध्ये ग्रुप थोडा कमी होऊ लागे, कारण मग कोणी आजीकडे जाऊन राहणे ! मावसभावंडे, आम्ही, माम्या, मावश्या...खूप मजा यायची ! बघता बघता हवा सुटायला सुरुवात होई आणि मनात दु:खाचे, थोडे आनंदाचे मिश्रण असलेले भाव तयार होत. सुट्टी संपणार म्हणून दु:ख, तर आता नवीकोरी वह्या-पुस्तके, दप्तर, युनिफोर्म मिळणार म्हणून आनंद !

उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की अगदी माझ्या पत्नीलासुद्धा आनंदाचे भरते येते. उन्हाळ्यात आजोळी अमरावतीला सर्व मावश्या, मामा, सर्व मावस व मामेभावंडे एकत्र जमणे, खेळणे, गप्पागोष्टी, फिरणे, रात्री गच्चीत झोपणे, मोठ्या भावंडांनी लहान भावंडांना खेळ, पोहणे वगैरे शिकवणे ! या सर्व गोष्टीत अगदी ओसंडून वाहणारी मजा असायची ! अजूनही त्या आठवणी सांगताना तिचे डोळे आनंदाने लकाकतात !

हळूहळू ते दिवस सरले, बदलू लागले. मुलांनी आणखी काही गोष्टी शिकाव्यात यासाठी मग पोहणे, ट्रेकिंग इतर साहसी खेळ, अभिनय यांचे एखादे शिबीर असा प्रकार दिसू लागला. पण अलीकडे काही वर्षांपासून शिबिरांचे पेव फुटल्यासारखे दिसते आहे. शाळेच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी दप्तरातून शिबिरांची पत्रके येतात. त्यातून आपल्या सोयीप्रमाणे शिबिराची निवड करायला बरे ! त्यात आजच्या वर्किंग पॅरेंट्सची मुले डेकेअर सेंटरमध्ये असतात. मग तिथे त्या सेंटरचे चालक अशी शिबिरे (summer camp) आयोजित करतात. वर्तमानपत्रे उघडली की त्यातूनदेखील अशा शिबिरांची अशी पत्रके खाली पडतात. आज बरेच पालक हे वर्किंग असल्यामुळे त्यांचे रुटीन सुरूच असते आणि मुले मात्र रिकामी. मग ती टीव्हीला, कॉम्प्युटरला चिकटणार किंवा मग बाहेर खेळायच्या निमित्ताने वाईट संगतीला तरी लागणार. त्यापेक्षा त्यांना कुठेतरी अडकवलेले बरे ! अशी या पालकांची मानसिकता झालेली आहे. त्यातून मग मुलांना अडकवले जाते. पण त्यातल्या सगळ्याच गोष्टी मुलांच्या आवडीच्या नसतात.

मध्यंतरी आमच्याकडे एक केस आली होती. आठ वर्षाच्या एका मुलीची आई तिला घेऊन आली. तिला सुट्टीत अशाच समर कॅंपला घातले होते. तिथे जाऊन आल्यापासून ती गप्प गप्प असायची. नीट जेवणे, झोपणे कमी झाले होते. एकटीच बसून रहायची. कोणाशीच नीट बोलत नव्हती. तिच्याशी बराच वेळ नीट बोलल्यावर लक्षात आले की तिला या समर कॅंपला जायचेच नव्हते. कारण तिथल्या अॅडव्हेंचर अॅक्टिविटीज तिच्या आवडीच्या नव्हत्या. त्याचेच टेन्शन तिला आले होते. तिच्या आईने सांगितले की कॅंपमध्येही ती तशीच होती. फार कमी मिसळायची. कुठच्याही अॅक्टिविटीजमध्ये तिने भाग घेतला नाही !

म्हणजेच केवळ आपल्या सोयीसाठी मुलांना अडकवणे किती धोक्याचे ठरू शकते. त्या मुलांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो, हेही आपण लक्षात घेणे जरुरीचे आहे. त्यामुळेच अशा शिबिरांना पाठवण्याचा निर्णय घेताना मुलांनाही त्यात सहभागी केले पाहिजे. त्यांची खरोखरच आवड / कल नसेल तर जबरदस्तीने पाठवण्यात अर्थ नाही.

त्याऐवजी पालकांनी मुलांच्या सुट्टीचाही प्लॅन / नियोजन करणे गरजेचे आहे. पालकांनी एकेकाने सुट्टी घेऊन मुलांना वेळ देणे, इतर मुलांना एकेकांनी पाळी घेऊन घरी बोलावणे, त्यांना तसे बैठे खेळ शिकवणे किंवा खाली मैदानी खेळ खेळताना त्यांच्यावर लक्ष ठेवणे, असे नियोजन एखाद्या कॉम्प्लेक्समधील / बिल्डिंगमधील पालक सहमतीने करू शकतात.

तसेच मुलांना प्रेक्षणीय स्थळी नेणे किंवा त्यांच्याबरोबर स्वतः साहसी शिबिरांस जाणे किंवा अशा छोट्या ट्रेकिंगला वगैरे नेणे याप्रमाणे पालकांनी आधीच नियोजन करणे, असे केल्याने यातून मार्ग निघू शकतो.

कॅम्पला पाठवताना त्यांचे मत विचारात घेणे महत्त्वाचे आहे. किंवा त्याची गरज त्याला पटवून देणे आवश्यक आहे. हा संवाद बरेच काही सकारात्मक बदल घडवू शकतो.

दैनंदिन कामे करून आल्यावरदेखील संध्याकाळी सुट्टी असलेल्या आपल्या मुलांशी खेळणे, गप्पा मारणे, गोष्टी सांगणे, सिनेमा दाखवणे वगैरे केल्यास गुणात्मक बदल होऊ शकतो.

शेवटी आपल्या काळाप्रमाणे आपण आजचा काळ बदलू शकत नसलो, तरी आजच्या काळातील मुलांची सुट्टी आपण आनंदाच्या पर्वणीत बदलू शकतो, हे नक्की !

- डॉ. अद्वैत पाध्ये. (मानसोपचार तज्ञ)