शिवप्रभूंचे आरमार हे प्राणपणाने लढणारे आरमार म्हणून जगप्रसिद्ध होते. जहाज बुडत असले तरी एकही तांडेल सारंग त्या जहाजातून उडी मारून पळ काढत नसे. हाच वारसा हिंदुस्थानी नौसैनिकांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात खरा करून ८ डिसेंबर १९७१ या भीषण रात्री १५० हिंदुस्थानी नौसैनिकांनी जलसमाधी घेतली. पण युद्धनौकातून पळ काढला नाही.

अरबी समुद्र फेसाळला होता. सागर लहरींचे तांडव आसमंतात घुमत होते. हिंदुस्थानी नौसैनिकांची पंधरा फ्रिगेड स्कॉडून झुंज देत होती. घमासान युद्धाला तोंड फुटले. शत्रूही इरेला पेटला होता. गनिमाची पाच जहाजे, एक पाणबुडी रसातळाला गेली होती. हिंदुस्थानी सैन्य एक-एक मिनिटाला ५०-५० मैल कूच करत ढाक्याच्या सीमेवर पोहोचले होते. बंगालचा उपसागर फत्ते झाला होता.

अरबी समुद्रातील कामगिरी फत्ते करताना अचानक घात झाला. शत्रूने हिंदुस्थानी नौसेनेच्या एका युद्धनौकेनचा ‘मॅग्रो’ तथा शूशूक या पाकिस्तानी पाणबुडीने माग काढत वर्मी घाव घातला. जहाजाचा कप्तान आपल्या केबीनमध्ये गेला. परीट घडीचा पोशाख घालून ब्रिजवर आला. कार्यकारी अधिकार्‍यास कॅप्टने आदेश दिला. ‘अबंडन शिप’. ‘जीव वाचवा, उड्या मारा, देव तुमचे भले करो.’ एक्झुकेटिव्ह ऑफिसरने विचारले, ‘सर व्हॉट अबाऊट यू? कॅप्टनचे उत्तर, ‘मी समुद्राच्या अंतरंगात जलसमाधी घेणार. मी जहाजाचा कप्तान असून हिंदू लढवय्या आहे. गनिमाला पाठ दाखवून येणारा कप्तान, छे... छे... नाही!’

अशा तर्‍हेने त्या दिवशी आयएनएस खुकरी या हिंदुस्थानी नौसेनेच्या जवळपास १५० वीर मावळ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण केले. त्यात भोसले होते, शिंदे होते बिचित्रसिंग होते. परशु डोग्रा होते. कुदलीपसिंग होते. पण खरे सर्व कान्होजी आग्य्रांच्या मावळ्यांचे वारसदार होते. मृत्यूवर विजय मिळवणारे व हिंदुस्थानी नौसेनेच्या इतिहासाच्या पानावर आपले नाव सुवर्णाक्षरात नोंदवणारे मावळे होते. त्या कप्तानाचे नाव कॅप्टन एम.एन. मुल्ला. मरणोपरांत त्यांना महावीरचक्राने अलंकृत करण्यात आले.

- कॅप्ट. विनायक अभ्यंकर