स्वप्न

दिंनाक: 05 Apr 2019 18:59:46


 

एकदा काय झाले

स्वप्नी आले आभाळ

हसून मला म्हणाले

चल माझ्यासंगे बाळ

 

खुशीतच म्हणाले

पण मी कसं येऊ?

आभाळ मग म्हणाले

पाठवतो ढगभाऊ

 

त्याने धाडला ढग

मला सोबत म्हणून

आईला न सांगता

बसले त्याला धरून!

 

ढग मला म्हणाला

गा तू गाणी आता

फिरणे संपल्यावर

मग मारू या बाता

 

मऊ मऊ ढगावर

छान छान लोळत

आम्ही किती वेळ

बसलो ना बोलत

पाहिले मी आभाळ

चोहीकडे फिरून

ढग मला म्हणाला

 नको जाऊ सोडून

 

सय आईची आली

झाला अंधार जेव्हा

माघारी परतण्याचा

केला मी विचार तेव्हा

 

ढगातून मारली

उडी खाली थेट

आईची नि माझी

होण्या पुन्हा भेट

 

लगेच मी उठले

झोपेतून दचकून

आईने विचारले

खूप घाबरून

 

पण आठवून गंमत

लागले मी हसू

होतीच अशी ही गंमत

मग शांत कशी बसू?

-    उमेश थाटकर