अनेक वर्षे जुना असलेला पूल ‘नवा पूल’ म्हणून ओळखला जातो आणि ‘अत्र्यांच्या’ पुतळ्याशेजारी ‘सावरकर भवन’ उभे राहू शकते हे फक्त पुण्यातच होऊ शकते. खरेच ‘पुणे तिथे काय उणे’ असे जे म्हटले जाते ते योग्यच आहे. कारण कोणत्याही अंगाने विचार केला, तरी पुणे श्रेष्ठच आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा या क्षेत्रांबरोबरच अगदी राजकारणातसुद्धा पुणे शहर आघाडीवरच आहे.

उत्खननात व संशोधनात सापडलेल्या प्राचीन काळातील ताम्रपटांवरून असे समजते की, पुण्याचे नाव आधी पूर्णक होते. मग त्यावरून अपभ्रंश होता होता पूर्णकचे पुण्णक, मग पुनवडी असे करतकरत आजचे ‘पुणे’ हे नाव रूढ झाले. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, त्यांच्या बाल; परंतु पराक्रमी लीला पाहून रोमांचित झालेल्या, शत्रूच्या आक्रमणाने चिरडून गेलेल्या; पण गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुनवडी गावात मातोश्री जिजाबाईंनी कसबा गणपतीला नमन करून, सोन्याचा नांगर फिरवण्याचे धाडस दाखवले. स्वराज्याचे तोरण बांधायचे मनसुबे शिवबांनी लालमहालातच रचले आणि तोरणा जिंकून जी यशाची वाटचाल सुरू केली, तेव्हापासून आजपर्यंत पुणे शहराने कधी मागे वळून पाहिलेच नाही. ‘सदैव पाऊल पुढे, करा वाटचाल यशाकडे’, या उक्तीप्रमाणे माझ्या पुणे शहराची यशोकमान उंचावतच आहे. पुनर्जीवीत लालमहाल, पर्वती, विश्रामबागवाडा, ओंकारेश्‍वर घाट, आगाखान पॅलेस, शिंदे छत्री यांसारख्या अनेक वास्तू आजही इतिहासाची आठवण करून देतात.

आपले पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अगदी पारंपरिक शेतीसारख्या विषयापासून ते सध्याच्या संगणक युगातील नवनवीन क्षेत्रांतील विषयांचे शिक्षण पुण्यात मिळते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे तर खूप जुने आणि नावाजलेले विद्यापीठ आहे. अनेक मान्यवर भारतीयांनी येथून शिक्षण घेतले आहे. भारताच्या कानाकोपर्‍यातूनच नाही; तर परदेशातूनही विद्यार्थी हे ज्ञानार्थी होण्यासाठी पुण्यात येतात. त्यांच्यासाठी पुण्यात अनेक शिक्षणसंस्था आणि वसतिगृहेही आहेत. ‘आकाशाशी जडले नाते’ हे पुस्तक लिहिणारे सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर यांनी ‘आयुका’ ही संस्था पुण्यातच सुरू केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, भारती विद्यापीठ इत्यादी अनेक शिक्षणसंस्था पुण्यात शिक्षणाच्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करत आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास करण्याचा पाठपुरावाही पुण्यात होतो. महाराष्ट्रीय मंडळ, सन्मित्र संघ, यांसारख्या अनेक ठिकाणी; तसेच शाळा-कॉलेजांतूनही सर्व प्रकारच्या खेळांचे शिक्षण दिले जाते. अगदी छोट्या-मोठ्या स्पर्धांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धांचे आयोेजनही पुण्यात होते. त्यासाठी नेहरू स्टेडियम, अण्णासाहेब मगर स्टेडियम, छत्रपती शिवाजी क्रीडासंकुल इत्यादी ठिकाणे सज्ज आहेतच.

पुण्याची रसिकता हा एक मानदंड आहे. चांगल्यास येथे उदंड प्रेम आहे. कलाकारांना आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी बालगंधर्व, टिळकस्मारक, भरत नाट्य, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या नावांची रंगमंदिरेही पुण्यात आहेत, तसेच अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी संस्थाही पुण्यातच आहे. ‘सवाई गंधर्व’सारखा संगीत महोत्सवही पुण्यातच होतो; म्हणूनच पुणे हे प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.

असे म्हणतात की, विनोद, फिशपाँड, हसण्याचीच काय; पण रडण्याचीही स्पर्धा फक्त पुण्यातच होऊ शकते. कारण नावीन्य म्हणजे पुणे. जुन्याची कास धरून नाविन्याची आस धरते ते पुणे. या नाविन्याच्या आसक्तीतूनच औद्योगिक क्षेत्रातील वाटचाल यशस्वी होत आहे. अनेक छोटे-मोठे औद्योगिक प्रकल्प पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, हडपसर येथे कार्यरत आहेत; तर हिंजवडी व अन्य काही ठिकाणी आय.टी. क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

कोणी कोणी म्हणतात की, पुण्याची तर्‍हाच विक्षिप्त आहे. गणपती, मारुतीलाच काय; पण पेठानांही विचित्र नावे पुण्यात आहेत. जिलब्या मारुती, डुल्या मारुती, हत्ती गणपती, लाकडी गणपती, नाना पेठ, रास्ता पेठ, अशी ही नावे. अहो पण, या विविधतेतूनच पुणेकरांनी आपले अस्तित्व जपले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता गणेशोत्सव पाहायलासुद्धा पुण्यातच येते. या दहा दिवसांत संपूर्ण विश्‍वच पुण्यात सामावल्यासारखे वाटते, कारण आयफेल टॉवर आणि स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा हे विवेकानंद स्मारकाबरोबर एकाच मांडवात उभे असतात.

कसबापेठेपासून सुरू झालेल्या माझ्या पुण्याचा विस्तार आज सर्वच दृष्टीने सर्वदूर झाला आहे. अनेक आसपासच्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. कारण -

‘पुण्याची हवा म्हणजे प्रकारच नवा

पुण्याचं पाणी पुण्याची वाणी

याचीही एक वेगळीच कहाणी’

ही कहाणी आहे साठा उत्तराची; पण ती पाचा उत्तरी लिहिली आहे. अनेक थोर कलावंत, खेळाडू, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, व्यावसायिक तयार करणार्‍या माझ्या पुणे शहराला माझा प्रेमाचा प्रणाम!

- भाग्यश्री भरत हजारे

सहशिक्षिका,

 एच.ए. स्कूल