जॉनचा गुढीपाडवा

दिंनाक: 05 Apr 2019 18:28:11


 

जॉनला सकाळी जाग आली ती मोठमोठ्या ढोल-ताशांच्या आवाजाने. ‘कसला हा आवाज? आणि एवढ्या सकाळी? नेहमी तर या वेळेला घरातून पूजा-आरतीचे किंवा गप्पांचे आवाज ऐकू येतात. पण आज काय झालंय? अरे, हा आवाज मोठाच होत चाललाय.’ जॉन डोळे चोळत बेडवरून उतरला आणि खिडकीतून वाकून बघायला लागला? लांबवर त्याला हवेत नाचणारे झेंडे दिसत होते. मग फुलांची उधळण दिसली, त्यानंतर तर त्याच्या तोंडाचा मोठा ‘आ’ वासला. कारण डोक्यावर फेटे बांधून, नऊवारी साड्या नेसून मोठमोठ्या बाईक्स चालवत असलेल्या बायका त्याला दिसल्या. जॉन धावत खालच्या मजल्यावर आला आणि माहीला विचारायला लागला, ‘व्हॉट इज धीस? कसला आवाज आहे हा? मोर्चा येतोय का आपल्या घरावर? इज एनिथिंग राँग?’ जॉन घाबरलेला दिसत होता. तेवढ्यात माहीची आई आली. तिने जॉन आणि माहीच्या पुढ्यात ब्रेकफास्ट म्हणून मस्त गरमगरम पोहे ठेवले. ‘हे काय आता? व्हेअर इज माय सिरिअल्स?’ जॉन आता पुरता गांगरला होता. ‘हो... हो... सांगते.’, म्हणत माही आणि तिची आई हसत सुटल्या.

जॉन मूळचा अमेरिकेत राहणारा, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये तो तीन महिन्यांकरिता भारतात आला होता आणि कुठे हॉस्टेलमध्ये न उतरता तो माहीच्या घरी पेईंगगेस्ट म्हणून उतरला होता. एव्हाना दोन महिन्यांत माही आणि त्यांची मस्त गट्टी झाली होती. जॉन मनातल्या मनात नकळत तुलना करत होता. अमेरिकेला असताना जॉनची सकाळ व्हायची ती मोठ्या अलार्मने. स्वत:च उठायचे, स्वत:च आवरायचे, फ्रीजमधून दूध काढून घ्यायचे, ठरलेल्या जागेवरून सिरिअल्स काढायचे आणि ब्रेकफास्ट करून आवरून शाळेत जायचे. हा त्याचा दिनक्रम. पण भारतात आल्यापासून त्याला समजले होते की, इथली प्रत्येक सकाळ वेगळी होते. कधी देवाच्या आरतीने जाग यायची, तर कधी माहीची आई जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवून उठवायची. गरमगरम ब्रेकफास्टही हातात मिळायचा. हे सगळे जॉनकरता नवीन होते आणि त्याला हळूहळू हे आवडायला लागले होते. एव्हाना त्याला भारतीय शिक्षण, भारतीय संस्कृती याबद्दल बरीच आवड निर्माण झाली होती. माहीचे मित्र-मैत्रिणी त्याचेही चांगले मित्र बनले होते. भारतात आल्यानंतर गुढीपाडवा हा जॉनचा पहिलाच सण होता आणि या गुढीपाडव्याची शोभायात्रा माहीच्या घरासमोरून जात होती. त्याचा तो मोठा आवाज येत होता.

‘चलऽऽऽ लवकर संपव ना तुझा ब्रेकफास्ट. आपल्याला गुढी उभारायची आहे.’, माही जॉनला घाई करत होती. ‘‘गुडी? व्हॉट इज गुडी?’, असे जॉनने म्हटल्यावर माहीला पटकन हसायलाच आले. ‘गुडी नाही रे, गुढी. चल दाखवते तुला.’, असे म्हणून तिने जॉनला बाहेर नेले, तेव्हा ठिकठिकाणी त्याला गुढ्या उभारलेल्या दिसल्या. ‘या कॉपर बाऊल्सना स्टीक्सवर का लटकवलं आहे आणि त्याच्या बाजूला कलरफूल क्लोथ का लावलं आहे?’ गुढीचे हे वर्णन ऐकून माहीने डोक्यावर हात मारला आणि ती आतल्या खोलीत पळाली. ‘आई, मी जॉनला निकीकडे घेऊन जातेय गं, तिथे आम्ही एकत्र गुढी उभारणार आहोत.’, म्हणत माहीने जॉनला लवकर तयार व्हायला सांगितले. जॉन, माही, आर्यन, रोहीत, श्रीजा, राजा सगळे जण निकीच्या घरी निघाले. जॉन नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट्स घेऊन निघाला होता. मला भूक लागली आहे, असे म्हणून जॉनने बिस्कीट्स खाण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व जण हसू लागले. ‘जॉन, निकीकडे जेवायचे आहे, पोटात थोडी जागा ठेव बरं का!’ राजने हसतहसत जॉनला सांगितले. गप्पा मारतामारता सर्व जण निकीच्या दारात आले. श्रीजाने दारावरची बेल वाजवली. निकीच्या दारावर एक छान तोरण लावले होते. घरापुढील अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढली होती.

निकीने दार उघडले, तेव्हा सगळे जण तिच्याकडे बघतच राहिले. कारण तिने नेहमीची जीन्स, टॉप न घालता आज वेगळाच ड्रेस घातला होता. ‘निकी, तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!’ सगळ्यांनी एका सुरात तिला शुभेच्छा दिल्या. एवढ्यात जॉन पुढे होऊन निकीच्या डे्रसला हात लावू लगला. ‘इट्स सो डिफरंट...’, जॉनने असे म्हटल्यावर सगळे जण हसले. ‘या ड्रेसला परकर-पोलके म्हणतात’, निकीने त्याला सांगितले. सगळ्यांना आपला ड्रेस आवडला आहे, याचा तिला आनंद झाला होता. त्या दरम्यान जॉनचे लक्ष दाराजवळ उभारलेल्या गुढीकडे आणि अंगणातील रांगोळीकडे गेले. उड्या मारून तो त्याभोवतीच्या गाठ्यांची माळ काढण्याच्या प्रयत्नात होता. ‘तिला गुढी म्हणतात’, निकीच्या आईने गुढीकडे बघत सांगितले. सगळे जण गुढीभोवती असणारी फुलांची माळ, पाने, कलश व नवीन कापडे या कडे उत्सुकतेने पाहत होते. निकीची आई जॉनने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत होती. ‘गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस.’, आईने सांगितले. ‘म्हणजे एक जानेवारीसारखा?’, जॉनने चटकन विचारले. ‘हो, अगदी बरोबर’, निकी म्हणाली. ‘आमच्या वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते.’, आईने पुढे सांगितले. ‘आम्ही आज सकाळी लवकर उठलो, तयार झालो.’, निकी सांगू लागली. ‘आईने अंगणात जे रंगीत चित्र काढलं आहे ना, त्याला रांगोळी म्हणतात.’ हे सांगितल्यावर जॉनने उत्सुकतेने पाहायला सुरुवात केली.

तेवढ्यात निकीच्या शेजारच्या घरात राहणारी मैत्रीण आली. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांनी मग श्रीखंड आणि पुरीवर ताव मारला. हे वेगळ्याच फ्लेवरचे योगर्ट आणि फुगलेला टॉर्टिया जॉनला आवडला. हाताने जेवायला जॉनला गंमत वाटत होती. निकी आणि माही त्याला पुरी कशी धरायची आणि श्रीखंड लावून कशी खायची ते दाखवत होती. जेवताजेवता जॉनने बोटाने नुसते श्रीखंड खायलाच सुरुवात केली आणि त्याच्या गालावर बर्‍याच ठिकाणी श्रीखंड लागले. ते पाहून सगळ्यांना आणखीनच गंमत वाटली. मग त्या टेबलवर त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या आणि जॉनला गुढीपाडव्याबद्दल बरेच काही समजले. जॉनसाठी हा पहिला-वहिला इंडियन फेस्टिवल होता. अमेरिकेला परत गेल्यावर अमेरिकेतील शाळेतल्या सर्व मित्र-मैत्रीणींना या गुढीपाडव्याबद्दल आणि महाराष्ट्रीय न्यू इयरचे स्वागत कसे असते, हे सांगण्यासाठी तो खूपच उत्सुक होता. जॉनसाठी हा गुढीपाडवा एक अविस्मरणीय अनुभव ठरला होता.

- स्मृती आंबेरकर

9820840456