मिहीर, त्याची आई व बाबा, त्रिकोणी कुटुंब. बाबा सोफ्टवेअर कंपनीत इंजिनियर तर आई बँकेत. उच्च मध्यमवर्गीय सुखी त्रिकोणी कुटुंब! पण आख्ख्या बिल्डींगमध्ये भांडकुदळ कुटुंब म्हणून ओळखले जाणारे.

त्या दिवशी रात्रीची वेळ. एकदम जोरात किंचाळण्याचा आवाज आला. “मिहीर, आता खरोखरच हद्द झाली. काठीने मारलंस तू मला? केवढं दुखतंय. थांब, आता तुला पण झोडून काढते चांगला, म्हणजे मग समजेल किती लागतं.” मिहीर जोरजोरात रडू लागला. तेवढ्यात त्याचा बाबा संजय तिथे आला. “काय चाललंय तुमचं? काही कळतं की नाही, मी एवढा दमून आलोय? साली रोजची कटकट. वैताग आलाय सगळ्याचा. नुसतं कार्टूनच बघायला विचारत होता, तर द्यायचं ना लावून? तेवढाच डोक्याला आराम. नुसती हिटलरसारखी वागवतेस त्याला! ए मिहीर, काय बोंबलत बसलायस! चाल जा, बघ जा कार्टून!” लगेच रडणं विसरून मिहीर हसत हसत उड्या मारत गेला कार्टून बघायला.

“वा! चांगलं आहे हो संजयराव. इथे मला लागलंय त्याचं काहीच नाही. स्वतःची कटकट महत्वाची. वर मलाच हिटलर म्हणणार. स्वतः कसा वागतोस? रामासारखा? अरे रावण आहेस नुसता. त्या दिवशी जरा माझं म्हणणं पटलं नाही, तर कोणी थोबाडीत मारली माझ्या? मग चिरंजीव हेच कॉपी करतात. कुठल्या मुहूर्तावर तुझ्याशी लग्न केलं, काही कळत नाही.” मितालीचे रडत ओरडत बोलणे चालूच राहिले. संजय नुसताच बघत राहिला. डोके धरून बसून राहिला.

तसं बघितलं तर मिहीर खूप हुशार. पण आई-बाबात सतत असंवाद आणि विसंवाद. त्यामुळे आजकाल अभ्यासाची गाडी रूळ सोडून गडगडू लागली होती. पेरेंट-टीचर्स मिटींगमध्ये मिहीरच्या आईला – मितालीला नुसते घेरून “काय मिहीरची आई, तुमचं लक्ष नाही मिहिरकडे! अभ्यास करतच नाही हल्ली. होमवर्कही अपुरं असतं. वर्गात नुसतं भांडणं व मारामारीकडे लक्ष, खोड्या काढायच्या. अहो, वेळीच लक्ष द्या. नाहीतर काही खरं नाही त्याचं.”         

झालं. मितालीने त्याला अभ्यासाच्या घाण्याला जुंपले. एकदम स्वैर सोडलेला बैल घाण्याला जुंपल्यावर ऐकणार आहे का? मिहिरने केला फोन बाबाला ऑफिसमध्ये. “आई बघ ना रजा घेऊन मला नुसता त्रास देते. सारखा अभ्यास करायला लावते. काही खेळू देत नाही, टीव्ही बघू देत नाही.” संजयने लगेच आईला फोन द्यायला सांगितलं. “काय चाललंय मिताली? ऑफिसमध्ये देखील सुखाने काम करू देत नाहीस. बघू दे ना त्याला टीव्ही! काय कटकट करता गं? मिहिरला पडत्या फळाची आज्ञा मिळाली.

आता आपण रोहनच्या घरी जाऊ या. रोहनचे घरसुद्धा त्रिकोणीचं कुटुंब. आई खाजगी कंपनीत कामाला तर वडील मोठ्या मल्टीनॅशनलमध्ये वरिष्ठ पदावर. पुन्हा उच्च मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. डे स्कूल असल्यामुळे संध्याकाळीच आईची व त्याची भेट व्हायची. मग चहा, दूध पिता पिता आई त्याला ऑफिसच्या व तो आईला शाळेतल्या गमतीजमती सांगायचा. मग थोडे खाऊन फ्रेश झाल्यावर प्रणाली त्याला विचारायची अभ्यासाबद्दल. मग रोहन काय शिकवले ते सांगायचा, दाखवायचा. मग रोज दोघे जण थोडा वेळ उजळणी करायचे किंवा वाचन वगैरे (अभ्यासाचे) करायचे. तोपर्यंत रोहनचा बाबा अजय यायची वेळ व्हायची.

मग वेळ असायचा आरामात गप्पा मारत जेवायचा, थोडासा टीव्ही बघायचा. मग थोडासा काही अभ्यास असेल तर तो करून रोहन झोपून जायचा. त्यामुळे अजय-प्रणालीला सुद्धा एकमेकांसाठी वेळ मिळायचा.

परीक्षा आता जवळ आली होती. सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे प्रणालीने रोहनला म्हटले, “चल आता अभ्यासाला बसू या.” “काय गं आई, थोडा वेळ बघू डे णा.”

“बघ, फक्त पंधरा मिनिटं जास्त. मग मात्र...”

पंधरा मिनिटांनी हाक मारल्यावर, परत रोहनचा हट्ट सुरूच! मग प्रणालीचा पारा थोडा चढला, “काय हे रोहन? काय हा हट्टीपणा? चल म्हटलं ना?” झालं. रोहन थोडा तणतणतच गेला अजयकडे, “बाबा, सांग ना आईला मला टीव्ही बघू द्यायला.”

अजय त्याला म्हणाला, “रोहन मला सांग, तू केव्हा टीव्ही सुरू केलास?”

“नऊ वाजता.”

“मग आईने केव्हा बोलावलं?

“साडेनऊ वाजता. मग मी रिक्वेस्ट केल्यावर पावणेदहाला परत. ए काय रे, बघू दे ना मला...”

“हे बघ रोहन, आईचं ऐक. थोडा वेळ मनोरंजन झालं ना? मग आता थोडा अभ्यास. आई तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. मलासुद्धा तेच योग्य वाटतं. तेव्हा टीव्ही बंद, अभ्यास सुरू!”

मग काय. झाला रोहनचा अभ्यास सुरू. प्रथम थोडा नाराजीत, पण मग विसरून गेला. त्या वर्षी रोहन ए ग्रेड मध्ये पास झाला!

ही झाली मिहीरची व रोहनची गोष्ट. आता आपण ठरवायचे आहे की आपल्याला कोणते पालक बनायला आवडेल!

- डॉ. अद्वैत पाध्ये