छप्पर फाडून धन

दिंनाक: 04 Apr 2019 16:40:41

 


काही चोर चोरी करण्यासाठी एका गावात जातात. एक मोठे घर पाहून तेथे दबा धरून बसतात. त्या घराचा मालक एक सज्जन गृहस्थ असतो. सर्वांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव असतो. त्याचं कोणाशीच वाकडं नसतं. देवावर त्याची श्रद्धा असते. ईश्वराची उपासना या भावनेने तो आपले काम करीत असे.

दुपारी तो नदीवर स्नानासाठी गेलेला असतो. नदीला पूर आलेला असतो आणि पुरात एक पेटी वाहात आलेली असते. ती पेटी नेमकी तो ज्या ठिकाणी अंघोळ करीत असतो त्याच ठिकाणी येते. पेटी जवळ घेऊन तो शेतकरी ती पेटी उघडतो. त्यात सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान दागिने असतात. “ हे काही आपले धन नाही, ज्याचे असेल तो शोधत येईलच. ”, असा विचार करून नदीकाठच्या एका मोठ्या झाडाखाली ती पेटी तो ठेऊन देतो आणि घरी जातो.

जेव्हा चोर रात्री आले होते तेव्हा पती-पत्नी अंगणातच गप्पा मारीत बसले होते. शेतकऱ्याने सकाळचा दागिन्याचा किस्सा आपल्या बायकोस सांगितला.

बायकोने त्याला विचारले, “ दागिन्यांची पेटी तुम्ही कोठे ठेवली आहे ? ”  शेतकरी सांगतो, “ नदीकाठी पडकं महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या अंगणात एक मोठे झाड आहे. तिथे मी पेटी ठेवली आहे. ”

चोर हे सारे संभाषण ऐकत असतात. ते विचार करतात, “ गावात कशाला चोरी करायची, पकडले जाण्याचा धोका असतो. त्यापेक्षा आयतं मिळणारं धनं घेऊन जाऊ या. ”

असा विचार करून ते लगबगीने नदीवर जातात. पडक्या मंदिराजवळ जाऊन मोठ्या झाडाखालची पेटी शोधून काढतात. पेटीचं झाकण अर्धवट उघडं असतं. त्यांना आधी वाटतं की, त्यांच्या अगोदरच कोणीतरी पेटीवर डल्ला मारला आहे का ? म्हणून ते अधीरतेने पेटी उघडतात.

उघड्या झाकणातून त्या पेटीत एक नाग जाऊन बसलेला असतो. तो मोठ्याने फूत्कार टाकतो. सारे चोर घाबरतात. आणि विचार करतात की, हे काम बहुधा त्या शेतकऱ्याचेच असावे. आपल्याला त्याने पाहिलेले असावे आणि आपल्याला मारण्यासाठीच त्याने हा बनाव घडवून आणलेला असावा. या पेटीत बहुधा साप-विंचूच असावेत. मध्यरात्री ही पेटी त्या शेतकऱ्याच्या घरात उपडी करून त्यालाच मारून टाकला पाहिजे, असा विचार ते करतात.

मध्यरात्री ते घराच्या छपरावर चढतात आणि घराची कौले काढून सगळी पेटी घरात उपडी करतात. अगोदर साप पडतो, त्याच्यावर सर्व दागिने, सोनं पडतं. सगळ्यात शेवटी पेटी पडते. या सगळ्या भारानं नाग मारतो. पेटी खाली टाकून चोर पळून जातात.

आवाजाने पती-पत्नी जागे होतात आणि पाहतात तर काय ? घराचे छप्पर काढले आहे. या छपरातून सोने-नाण्यांचा वर्षाव झाला आहे.

परमेश्वराने एखाद्याला द्यायचे ठरविले, की तो या ना त्या मार्गाने छप्पर फाडून देतो.

-    रमेश पतंगे