महाराष्ट्र कवींची महाराष्ट्र गीते
दिंनाक: 30 Apr 2019 18:25:36 |
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात इंग्रजांशी चाललेल्या लढ्यात अनेक देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या पराक्रमाला कवींच्या तेजस्वी शब्दांची जोड मिळाली. १८५७च्या लढ्यातला सेनापति अजीमुल्लाखानपासून स्वा. सावरकर, सेनापति बापट, पं. रामप्रसाद बिस्मिल असे अनेक देशभक्त स्वत: कवी होते.
“रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले” असे लिहिणारे गोविंद दरेकर हे शरीराने अपंग असले तरी मनाने कणखर होते. त्यांच्या शब्दांतून मनाचा तो कणखरपणा व्यक्त झाला आणि “राष्ट्रकवी गोविंद” या नावाने कवी गोविंद ओळखले जाऊ लागले. शिवरायांची स्तुती गाणारे कवी भूषणाचे शब्द, मातृभूमीचे स्तवन गाणारे बंकिमचंद्रांचे “वंदे मातरम” हे शब्द, अशी अनेक उदाहरणे आपल्याला उज्ज्वल इतिहासात दिसतील.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. हळूहळू भाषावार प्रांतरचना झाली. वळवंटापासून बर्फाच्छादित प्रदेशापर्यंत खूप मोठी भौगोलिक विविधता असलेल्या या देशात संस्कृतिक परांपरही वेगवेगळ्या आहेत. जशी भाषा, तसा वेश, तशी संस्कृती अशा या भारताच्या मध्याच्या जवळ असणारा महाराष्ट्र सर्वार्थाने भारताचे गौरवस्थान ठरला आहे. संत नामदेवांनी महाराष्ट्रधर्म पंजाबमध्ये नेला. रामदासांनी काशीपासून बद्रीनाथपर्यंत मारूतींची स्थापना केली.
औरंगजेबाची सत्तेची धुंदी उतरवणारे छत्रपती शिवराय याच मराठी मातीतले. सतत परकीय आक्रमणांनी गांजलेल्या उत्तर भारतात दिल्लीच्या गाडीवर मराठ्यांचा झेंडा फडकावत शत्रूला अफगाण सीमेपर्यंत पळवून लावत अटकेवर भगवा फडकावला, तो याच महाराष्ट्रातल्या पेशव्यांनी.
परकीयांनी पेशवे, शिंदे, होळकर यांच्या तलवारीचा धसका घेतला. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना होताना १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्रची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरांपासून आजच्या काळापर्यंत अनेक मराठी कवींनी आपापल्या शब्दांमध्ये या महाराष्ट्रची थोरवी वर्णन केली आहे.
“माझा मराठीची बोल कवतिके” असे, म्हणणारे ज्ञानेश्वर, या महाराष्ट्रभूमीला “आनंदवनभुवनी” म्हणणारे समर्थ रामदास अशा संतांनी आपल्या मराठीबद्दल व महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त केले. गेल्या १०० वर्षांतील बालकवी, केशवसुत, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, ग.दि. माडगूळकर, शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे अशा सर्वांनी थोर संतकवींचा वारसा पुढे नेला. महाराष्ट्राचे वर्णन करताना त्यांच्या शब्दांना धार आली, तर कधी पंढरीच्या चंद्रभागेच्या, इंद्रायणीच्या, गोदावरीच्या आठवणीने त्यांची मने भक्तिभावाने उचंबळून आली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा || राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ||
असे राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांनी वर्णन केले आहे. तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लिहितात –
गगनभेदी गिरीविण अण, नच जिथे उणे | आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे | अटकेवरी जेथिल तुरगि जल पिणे | तेथ अडे काय जलाशय – नांदविणे ? पौरुषास अटक गमे जेथे दु:सहा ||१|| बहुत असोत सुंदर संपन्न की महा | प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||धृ||
भारताचा मानबिंदू हिमालय असला तरी आमचा सह्याद्रि त्यापेक्षा कमी नाही. हिमालयाच थरकाप उडवणार्या उंचीप्रमाणे आमचा हरिश्चंद्रगडाचा कोकणकडाही तेवढाच बेलाग आहे. कवी बापट लिहितात –
भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा तुमच्या आमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला ख्रिस्त, बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
अशा या कवींमध्ये मराठी कवयित्रीसुद्धा मागे नाहीत. कवयित्रि पद्मा घोळे म्हणतात –
आम्ही महाराष्ट्रकन्या, मायमराठी अमूची स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची मुक्ता, जना जागविति भोळ्या भक्तीने पहाटे जिजा, लक्ष्मी, शिकविति आम्हा स्वातंत्र्याची गीते आम्ही महाराष्ट्रकन्या, नका जाऊ कोणी वाटे || हिरव्या कोकणात आहे गुप्त तलवारीचे पाते म्हणा कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी करू हातांची ढाल बाळ बांधूंनिया पाठी ||
अशी ही महाराष्ट्राची भूमी....जशी वीरांची तशीच संतांची. जसा मराठ्यांचा शौर्याचा भगवा झेंडा, तसाच पंढरीच्या वारकर्यांची भगवी पताकाच. तुकोबा म्हणतात –
“मऊ मेणाहूनही कठीन वज्रासही भेदू ऐसे अशी आम्हा मराठी माणसे”. ज्ञानेदेवांची “अमृतवाणी”, तुकोबांची “अभंगगाथा”, तुकोबांची “वज्रवाणी”, मोरोपंतांच्या नादमधूर “आर्या”, होनाजिबाळा, सगनभाऊ रामजोशी यांच्या “लावण्या”, प्रभाकरांसारख्या शाहीरचे मराठी “पोवडे” यांसारख्या कवींनी आपल्या महाराष्ट्राला कायम जागरूक ठेवले. अभंग गाताना तल्लीन होणारी मने शाहीरच्या डफावरच्या थापेने थाररून उठत. अशा या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या कवींनी आपापल्या शब्दांत महाराष्ट्रची महती गायली.
कवी विंदा करंदीकर म्हणतात –
स्वतंत्रतेचा मंत्र ज्यांना गर्भामध्ये मिळे तेच मराठी आम्ही, आम्ही सह्याद्रीचे सुळे स्वराज्यातुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे
अशा हा शौर्याचा, भक्तीचा वारसा आपल्या सर्वांना देणारा महाराष्ट्र तुम्ही मुले या उद्याच्या महाराष्ट्रचे नवनिर्माते ठरणार आहात. ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आधाराने तुम्हीच या महाराष्ट्राला भारताच्या गौरवस्थानी नेऊन ठेवणार आहात. कधी सोपानदेव चौधरी लिहितात –
उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा हवा नव्या अंकुरसवे फुटाव्या तोडलेल्या शाखा, आणखी भराने व्हावी उज्ज्वल इतिहासाची पाने जावोत खोल मुळे लक्ष लक्ष बहरावा असा महाराष्ट्र वृक्ष या बहराला तेज चढावे मराठी मातीमधले ! याचे बी-बियाणे आहे तेजाचे असा हा याचा विकास भारताला प्रकाश व्हावा उद्याचा नवा महाराष्ट्र ऐसा व्हावा !
अशा थोर कवींच्या मनातला, महाराष्ट्र मुलांनो तुम्हाला उभा करायचाय. महाराष्ट्राला मिळालेला हा तेजस्वी वारसा तुम्हाला चालवायचाय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सैन्यदलात जनरल थोरात, एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर, जनरल अरुणकुमार वैद्य अशांनी सैन्यदलात शौर्य दाखवत महाराष्ट्रचे नाव उज्ज्वल केले. देशाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणार्या चीन आक्रमणाच्या वेळी महाराष्ट्रचा सह्यकडा दिल्लीच्या मदतीला गेला. म्हणूनच सेनापती बापट म्हणतात –
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले l मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले ll खरा वैरी पराधीनतेचा l महाराष्ट्र आधार या भारताचा ll १ ll महाराष्ट्र तेजस्विता नाही मेली l महाराष्ट्र तेजस्विता ही निजेली l महाराष्ट्र तेजस्विता जगावाया l चला या चला बंधुंनो ! या चला या ll २ ll
- मिलिंद सबनीस