अशी रंगली कट्टाकट्टी...

सुट्टी सुरू म्हणजे धम्माल शिबिरे सुरू...यंदाच्या वर्षी शिबिराचा विचार करताना मुलांना समाजभान देण्याच्या विचाराने अनेक कट्ट्यांची संकल्पना सुचली आणि शिक्षणविवेकचे कट्टाकट्टी शिबिर सुरू झाले.
‘शिक्षणविवेक’ आयोजित कट्टाकट्टी शिबिरात पूर्वप्राथमिक विभागातील मुलांनी ८ एप्रिल ते १७ एप्रिल आणि प्राथमिक विभागातील मुलांनी १९ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत ९ कट्ट्याचा अनुभव घेतला. स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र आणि न्या. रानडे बालक मंदिर या दोन ठिकाणी दोन वेगळ्या वयोगटातील मुलांनी 'मोजा मोस्ती आणि धमॉल’ केली.
दररोज एक कट्टा, कट्टयाला साजेशी गाणी आणि खेळ, असे शिबिराचे स्वरूप होते. शिबिराची सुरुवात ‘कुटुंबकट्टया’ने झाली. यामध्ये सर्वांनी कुटुंब सदस्यांविषयी चर्चा केली. रोल प्ले केले, गाणी म्हटली. पूर्वप्राथमिक विभागासाठी स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र येथील शिबिरास उदघाटक म्हणून मा.स.गोळवलकर शाळेतील शिक्षिका वर्षा करंदीकर व प्रज्ञा पोतदार लाभल्या. तर न्या. रानडे बालक मंदिर शाळेतील शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका अमिता दाते यांनी केले. प्राथमिक विभागाच्या शिबिरासाठी साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर व शिल्पकार चरित्रकोशाच्या समाजकारण खंडाच्या संपादक संजीवनी शिंत्रे या उपस्थित होत्या. शिबिरात दुसर्‍या दिवशी ‘मैत्रीकट्ट्या’त मैत्रीची शॉर्टफिल्म झूझ्झल आणि कुक्कुल या माधुरी पुरंदरे यांच्या गोष्टीचे सादरीकरण केले. मित्रांची गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी आणि चिंटू व पिंटूचे गाणे अशी मज्जा मुलांनी मैत्रीकट्ट्यावर केली.
तिसरा दिवस होता तो ‘कला कट्ट्या'चा. या कट्ट्यात मुलांनी चित्रकला थोड्या वेगळ्या पद्धतीने अनुभवली. मुलांनी चक्क नाणी आणि नोटा तयार केल्या. त्यानंतर शिक्षणविवेक मासिकात प्रकाशित झालेले नाकाबंदी आणि रुमालपाणी हे दोन नवीन खेळ खेळले. चौथ्या दिवशी ‘लेखनकट्ट्या’मध्ये आपल्या कुटुंबाविषयी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचे बोधवाक्य आणि बोधचिन्ह मुलांनी तयार केले. कुटुंबावर आधारित असणारे एक गीत ऐकून सर्वांनी नाच देखील केला. चौथ्या दिवशी शिबिरात होता ‘वाचनकट्टा’. नवीन पुस्तके, रंगीत आणि आकर्षक चित्रे, मोठी अक्षरे आणि विशेष म्हणजे मुलांना सहज हाताळता येईल असा पुस्तकांचा आकार असल्यामुळे प्रत्येकाने पुस्तके आवडीने पाहिली. राधाचं घर, यशची गोष्ट, परीची गोष्ट, मगरू,कोंबडू अशा मुलांच्या भावविश्वातील पुस्तके ‘वाचनकट्ट्यात’ मुलांनी पहिली आणि वाचली.
मुलांसाठी सर्वांत नवीन होतो तो ‘बाजारकट्टा’ यात मुलांनी आपल्या आवडीच्या वस्तू आणि भाजी आणली होती. आपल्या आवडीच्या वस्तू घेऊन काही मुले दुकानदार तर काही ग्राहक झाले होते. बाजाराची सुरुवात झाल्या झाल्या अगदी बाजारात ऐकू येणारे सर्व आवाज मुलांकडून येत होते. ‘कलाकट्ट्या’च्या दिवशी मुलांनी तयार केलेले पैसे बाजारात चलनाच्या स्वरूपात होते. खेळानंतर सर्वांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गीत म्हटले. बाजार म्हणजे काय?, आपल्याला बाजाराचा फायदा काय?, बाजारात आपल्याला कोणकोणते आवाज ऐकायला मिळतात? अशा अनेक बाबींवर गप्पा झाल्या. पुढचा कट्टा होता ‘धमालकट्टा’. हा कट्टा म्हणजे केवळ आणि केवळ मुलांसाठी धमाल करण्याचा दिवस होता. खेळ, गाणी, गोष्टी यांची धमाल आणणारा दिवस. सुरुवात खेळाने आणि शेवटही खेळानेच. या दिवशी अनेक खेळ मुलांनी खेळले. सर्व ताईदेखील मुलांसोबत खेळत होत्या. आठवा कट्टा होता ‘गप्पाकट्टा’. या वेळी मुलांना अगदी मोकळेपणाने गप्पा मारण्याची संधी होती. मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारण्याची मुभा दिली गेली. गप्पांच्या सत्रानंतर मुलांनी मार्बल पेपरवर रंगीत नक्षी तयार केली. शिबिराचा नववा दिवस खास ‘खाऊकट्टा’ म्हणून मुलांनी अनुभवला. मुलांनी खाऊकट्ट्यात कडधान्याची पौष्टिक बास्केट आणि कोकम सरबत तयार केले. खाऊकट्ट्यानंतर समारोपाचे सत्र होते. सुरुवातीला पालकांसाठी एका पपेट शोचे आयोजन होते. या सत्रात शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मुलांशी आणि पालकांशी संवाद साधला. शिबिराची आखणी आणि नियोजन करण्यामागचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. कट्टाकट्टी शिबिराविषयी पालकांनीही उत्तम प्रतिक्रिया दिल्या. मुलांना शिबिर तर आवडले पण पालकांसाठीही एखादे शिबिर घ्यावे अशी मागणी पुढे आली. पालकांच्या प्रतिक्रियांमधून शिबिराचा हेतू साध्य झाल्याचे लक्षात येत होते. उपस्थित पालक विद्यार्थ्यांचे आभार मानून पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिबिराचा समारोप करण्यात आला.