माईसाहेब

दिंनाक: 03 Apr 2019 16:15:25


 

आजच्यासारखे दिव्यांच्या झगमगाटासारख्या असणाऱ्या नात्यांचे ते दिवस नव्हते. नाती नंदादीपासारखी होती! मी सांगतोय हा काल ७५-८० वर्षांपूर्वीचा. आम्ही त्या वेळी पर्वतीच्या वाड्यात राहायला आलो नव्हतो; तर शुक्रवारपेठेतील चिंचेच्या तालमीजवळ असलेल्या शिर्क्यांच्या वाड्यात राहत होतो. आम्हा भावंडांचा जन्म त्याचं शिर्केवाड्यातला!

आमच्या घरी आमचे तीर्थरूप, त्यांना आम्ही ‘मामासाहेब’ म्हणत असू – आईसाहेब, माझ्याहून थोरल्या तीन भगिनी, एक बंधू, मग मी आणि धाकटे बंधू असे आमचे आठ जणांचे कुटुंब होते. आमच्या घरी नातेवाईक आणि मामासाहेबांची मित्रमंडळी यांचे सतत जाणे-येणे असे. घर सदैव भरलेले असे. 

परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की माझ्या दोन वडील भगिनींचे फारच लवकर म्हणजे अकालीच निधन झाले. मला त्यांचा फार सहवास लाभला नाही. तिसऱ्या भगिनी इंदुताई उर्फ माईसाहेब यांचा मात्र काही काळ सहवास लाभला. त्या माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या होत्या.

माईसाहेबांच्या स्वभावाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य मला सांगावसं वाटतं ते म्हणजे त्या अतिशय प्रेमळ होत्या. इतक्या की, त्यांच्या त्या प्रेमळपणावरच माझं प्रेम होतं. तरीदेखील माझ्या बालवयानुसार मी त्यांना त्रास द्यायचो. कारण, मी अत्यंत खोडकर स्वभावाचा होतो. फार खोड्या करायचो आणि समोर सहन करणारे माणूस असले की त्या खोड्यांना आणखीनच रंग चढायचा! मला जेवायला घालण्यासाठी, माझे कपडे बदलण्यासाठी त्या खूप वेळ माझ्या मागे मागे फिरत असायच्या आणि मी त्यांना इकडे तिकडे फार पळायला लावायचो. त्या वेळी त्या एकदम म्हणायच्या, “खबरदार...” मला तो शब्द तेवढा आठवतो; पण म्हणून त्यांनी त्रागा केल्याचे, रागावल्याचे मला आठवत नाही.

त्यांनी कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केल्याचंही स्मरणात नाही. पण त्यांची एक अत्यंत तीव्र इच्छा होती, स्वप्नच होतं म्हणू या.. स्वप्न अशासाठी की तो काळच तसा होता, ज्या काळात स्त्रियांनी सायकलवर बसणे, सायकल चालवणे निषिद्ध मानले जायचे. त्या काळातलं त्यांचं ते स्वप्न होतं सायकल चालविण्याचं! मात्र काही केल्या ते सत्यात उतरलं नव्हतं.

अशातच एक दिवस माझी मुंज ठरली. माईसाहेबांना वाटलं, आता मुंजीच्या निमित्तानं नवी सायकल घरी येईल. मग आपण ती चालवू. परंतु सायकल घरी आली तरी सायकलवर बसायचं त्यांचं स्वप्न जमिनीवरच राहिलं.

त्यांना एक दुखणं जडलं सायटिकाचं – ते अगदी जीवघेणच म्हणाना. कारण ते सहन होत नसल्यानं त्यांना रडू यायचं आणि त्यांचा तो त्रास पाहून मी सुद्धा रडायचो. काय केलं म्हणजे त्यांचा त्रास कमी होईल हे मला त्या वयात सुचायचंच नाही. मग जे शक्य असेल ते करायचो. आम्ही राहत होतो तो भाग माडीवर होता. बाकी संडास, बाथरूम खालच्या मजल्यावर अंगणात होते. तिथे त्यांना मी हात धरून घेऊन जात असे. पण म्हणून त्यांचं दुखणं थोडंच कमी होणार? ते आपलं चालूच असायचं! त्यांच्या वेदना पाहून मी कळवळून जायचो!

त्यांचा विवाह होऊन त्या सासरी गेल्या. इंदिरा मोरेश्वरराव पुरंदरे हे नाव बदलून सौ. इंदिरा विठ्ठल ठकार असे झाले. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे नावाचे गाव आजही आहे. तिथल्या ठकारांच्या वाड्यात त्यांचे सासर होते. तिकडे जाण्यासाठी पुण्याहून खडकवासल्यापर्यंत बसनं जावं लागे आणि त्यानंतर एक-दीड मैल पायी चालत जावं लागे. मला अनेकदा मनात वाटे, माईसाहेबांना सायकल चालवायला मिळाली असती तर तशाच त्या सायकलवरून डोणज्याला गेल्या असत्या!

माझं लेखन, माझी व्याख्यानं वाचण्या-ऐकण्याआधीच माईसाहेब काळाचं बोट धरून निघून गेल्या...!

बालपणासारखे रम्य दिवस आयुष्यात परत कधीही येत नाहीत. नात्यातला तो निरागसपणा वाढत्या वयाबरोबर सुकत गेला तरी आता मोठं झाल्यावर त्या वेळच्या आठवणींचा ओलावा एखाद्या थेंबाच्या रुपानं मनात पाझरत राहतो...!  

- शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

 शब्दांकन – डॉ. चित्रलेखा पुरंदरे