डोंगराचे स्वप्न

दिंनाक: 03 Apr 2019 13:58:09


 

एक डोंगर स्वप्न पाही

सागराच्या भेटीचे!

पहिले पाऊल खडकामधून

जिद्दीच्या थेंबांचे!

थेंब थेंब वाहत राही

अवघड वाट शोधताना

कधी काटे... कधी दरी...

कधी दमे... चालताना

थांबत नसे तरीही तो

वेग येता स्वप्नाला

कळत नसे ओहोळ होऊन

भेटलो कधी नदीला

नदीलाही नवल वाटे

‘इथे आलास तू कसा?’

‘स्वप्न पाहता सागराचे

धावत आलो हवा तसा’

नदीसंगे धावत राही

विरघळलेला काळा पत्थर;

उगवलेली शेते पाहून,

भिजून रुजून येई अंतर!

होता होता एका क्षणी

स्वप्न त्याचे खरे होई

खडकामधून झेपावलेले

वेडे स्वप्न सागर होई!

डोंगर सांगे ज्याला त्याला

जगात अशक्य काहीच नाही;

धावणाऱ्या स्वप्नांसाठी

अडथळाही पंख होई!

- प्रवीण दवणे