खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट! एकदा काय झालं, केरळमधल्या किलिमन्नूर या ठिकाणी राजा आणि प्रधान यांचं आपल्या लव्याजम्यासह आगमन झालं. केरळमधल्या पारंपरिक वेशभूषेप्रमाणे सगळ्यांनीच पांढरीशुभ्र वां परिधान केली होती. गळ्यात सुवर्णालंकार होते. त्यांचं स्वागत करायला मग एकच लगबग उडाली. पायर्‍या चढून आत प्रवेश करताच डाव्या भिंतीवर दोन हत्ती एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतानाचं एक चित्रं राजेसाहेबांना दिसलं आणि त्यांनी विचारलं, हे चित्र कोणी काढलंय?’ ते चित्र काढलं होतं एका लहानग्या ५-६ वर्षांच्या मुलानं. त्याचे वडील घाबरले. त्यांना काय उत्तर द्यावं ते सुचेना. अशा वेळी भिंतीआड लपलेला तो मुलगा धीटपणे राजासमोर आला आणि नम्र आवाजात म्हणाला, ‘राजेसाहेब, मीच ते चित्र काढलंय. माझी चूक झाली. अशी चूक मी पुन्हा नाही करणार.’ राजा कौतुकानं हसला आणि त्याला जवळ घेत म्हणाला, ‘अरे चूक कसली, तू तर अगदी योग्य तेच काम केलं आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय.’ त्या दोन हत्तीचं चित्र काढणार्‍या त्या पिटुकल्या मुलाचं नाव होतं रवी वर्मा! हाच रवी वर्मा पुढे जगभर राजा रवी वर्मा या नावानं जगप्रसिद्ध झाला.

रवी वर्माचा जन्म २९ एप्रिल १८४८ या दिवशी झाला. वडील अतिशय बुद्धिमान, तर आई उत्तम कवयित्री होती. रवी वर्माला एक भाऊ आणि एक बहीण होते. तिघं मिळून दिवसभर हुंदडत, पाण्यातलं हत्तीचं खेळणं न्याहाळत; तर कधी गावातले पारंपरिक सण साजरे होतानाचे रंगलेले नाट्यप्रयोगही बघत. लहानपणापासून आई-वडिलांकडून ऐकलेल्या पौराणिक कथांचा खूप मोठा प्रभाव रवी वर्मावर पडला होता. त्याचं मन या गोष्टींमध्येच अडकलेलं असे. मग या ऐकलेल्या गोष्टींचं चित्र त्याच्या डोळ्यांमध्ये उमटे आणि ते उमटलेलं चित्र चितारण्यासाठी भिंत असो वा जमीन, तो ती चित्रं काढण्यासाठी आतुर होऊन जाई. त्याच्या या कामात त्याचा भाऊदेखील त्याला मदत करत असे. रवी वर्माचं हे चित्रवेड त्याच्या मामाच्या लक्षात आलं आणि त्यानं त्याच्यातल्या या कलेला प्रोत्साहनच दिलं.

त्रावणकोरच्या राजदरबारात रवी वर्माला सन्मानित करण्यात आलं. त्याच्यातल्या चित्रकाराला राजानं प्रोत्साहित केलं. तसंच बडोद्याचे राजे माधवराव, सयाजीराव गायकवाड यांची आणि राजघराण्यातल्या अनेक सदस्यांची चित्रं रवी वर्मानं काढली. राजा-महाराजांच्या प्रोत्साहनामुळे रवी वर्माला संपूर्ण भारत फिरता आला आणि प्रत्येक ठिकाणची संस्कृती, लोक, कला जवळून बघता आली. ठिकठिकाणची मंदिरं आणि त्यावर कोरलेल्या मूर्ती बघून तो चकित झाला. त्या मूर्तींमागचे पौराणिक संदर्भ, त्या कथा त्याच्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या आणि मग यातूनच रवी वर्माच्या कुंचल्यातून साकारली अनेक पौराणिक कथांवरली असामान्य, अलौकिक चित्रं! आपल्या देशाची संस्कृती जगभर कळावी यासाठी त्यानं या पौराणिक कथांमधल्या पात्रांना आपल्या चित्रांमधून मूर्त स्वरूप दिलं. खरं सांगायचं झालं तर रवी वर्मानं आपले देव-देवता कसे होते किंवा आहेत हे आपल्या चित्रांमधून सर्वसामान्य माणसाला दाखवलं आणि रवी वर्म्याची चित्रं इतकी लोकप्रिय झाली की त्यानं काढलेली विद्येची देवी सरस्वती असो की ऐश्वर्याची देवी लक्ष्मी - या चित्ररूपी देवतांना लोक पूजू लागले, भजू लागले. रवी वर्मा आता राजा रवी वर्मा म्हणून ओळखला जाऊ लागला.

ही चित्रं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली कशी? तीही एक गंमतच आहे. रवी वर्मा हा नुसताच कलाकार नव्हता, तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचंही आकर्षण होतं. त्याला जेव्हा छपाईच्या तंत्राबद्दल कळलं, तेव्हा त्यानं १८९४ साली जर्मनीतून हे छपाईयंत्र मागवलं आणि प्रेस सुरू केली. त्यानं आपली चित्रं हजारो/लाखो प्रतींनी छापली आणि त्यामुळेच ती घराघरांत पोहोचू शकली. त्याच्या चित्रांमधून मानवी स्वभावाचे विविध पैलू आणि भावना सहजपणे उलगडल्या जात असत.

याबद्दल एक कथा अशी सांगितली जाते, की एकदा एक गरीब दलित स्त्री रवी वर्म्याकडे आली आणि त्याला म्हणाली, माझ्याबरोबर चला. रवी वर्मा तिच्यापाठोपाठ तिच्या वस्तीत गेला. त्यानं जे दृश्य पाहिलं त्यानं तो चकित झाला. त्यानं काढलेल्या देवतेच्या चित्राला भिंतीवर लावून आख्खी वस्ती त्या देवतेची पूजा करत होती आणि आनंदानं अश्रू ढाळत होती. ती स्त्री रवी वर्म्याला म्हणाली, ‘‘आम्हा गरिबांना मंदिरात प्रवेशच नसल्यानं आम्हाला देव कसा असतो हे माहीतच नव्हतं. देवाचं दर्शनही आम्हाला मिळू शकत नव्हतं. अशा वेळी तुम्ही देवासारखे आमच्या आयुष्यात आलात आणि खर्‍या देवाला मंदिराबाहेर काढून तुम्ही आमच्या स्वाधीन केलं.’’ तिच्या या उत्तरानं रवी वर्मा भारावून गेला.

याच अफाट लोकप्रियता मिळालेल्या राजा रवी वर्माला त्या काळातल्या धार्मिक वृत्तीच्या मानसिकतेलाही सामोरं जावं लागलं. कलेची दृष्टी नसलेल्या लोकांनी त्याला न्यायालयात खेचलं आणि त्याच्यावर ‘देवदेवतांची अश्लील चित्रं काढली, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, आमचा मंदिरातला देव रस्त्यावर आणला’ अशा रीतीचे आरोप केले. हा खटला खूपच गाजला. पण या आरोपातून राजा रवी वर्मा यांची निर्दोष मुक्तता झाली.

राजा रवी वर्माला आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक संबोधलं जातं. देशातच नव्हे तर परदेशातही त्याच्या चित्रांना नावाजलं गेलं. भारतीय संस्कृतीचं दर्शन जगाला घडावं हा रवी वर्माचा हेतू साध्य झाला होता. १९०४ साली भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यानं रवी वर्माला ‘केसर-ए-हिंद’ या पदवीनं सन्मानित केलं. मध्य प्रदेशातल्या वडोदरा इथल्या लक्ष्मीविलास पॅलेसमधल्या संग्रहालयात राजा रवी वर्माची चित्रं आजही जतन करून ठेवली आहेत. तसंच बडोदा इथंही राजा रवी वर्माच्या चित्रांचं मोठं संग्रहालय आहे.

पुढे १९३३ साली दिल्लीत रवी वर्मांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं, तेव्हा केरळ सरकारनं गौरवादाखल ‘राजा रवी वर्मा पुरस्कार’ सुरू केला. कला आणि संस्कृती या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यास व्यक्तीस हा पुरस्कार दर वर्षी दिला जातो. तसंच केरळमधल्या मावेलिकरा इथं फाईन आर्टचं एक महाविद्यालयदेखील राजा रवी वर्मांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उघडण्यात आलं आहे. पुण्यातही राजा रवी वर्मा कलापीठ चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतं. पुण्यात लोणावळा इथं मळवलीमध्ये त्याचा आजही स्टुडिओवजा छापखाना बघायला मिळतो. २००७ साली रवी वर्माचं एक चित्र ७ कोटी रुपयांना विकलं गेलं.

भारतीय कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना राजा रवी वर्मा यांचं नाव घेतल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. अशा या कलावंताचा - राजा रवी वर्मांचा मृत्यू वयाच्या ५८व्या वर्षी २ ऑक्टोबर १९०६ या दिवशी झाला.

- दीपा देशमुख