गरगरे कुटुंबीय

दिंनाक: 27 Apr 2019 16:30:20


 

सिलींग फॅन : खरं म्हणजे, या गरगरे कुटुंबातला मी सिनियर सिटिझन. पण...

एक्झॉस्ट फॅन : आता काय झालं आजोबा?

सिलींग फॅन : ए, तुला दोन ब्लेड जास्ती आहेत म्हणून उगाच चोंबडेपणा करू नकोस. टेबलावर बसलेल्या माझ्या धाकट्या भावाशी मी बोलतोय.

सिलींग फॅन : अरे, काय झालं काय? आज सकाळपासून गप्पच आहेस?

टेबल फॅन : धमाल पाऊस कोसळतोय तरी मी यांची मान मोडून सेवा करायची. रात्रभर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मान फिरवून मानेचा काटा पार ढिला झालाय. डोकं पण सणकून तापलंय. तुमची कशी आहे तब्येत?

सिलींग फॅन : माझी तब्येत ठणठणीत आहे. पण या घरातला तो ऐफॅ-गेफॅ काय समजतो काय स्वत:ला?

टेबल फॅन : काय झालं?

सिलींग फॅन : तो दीडदमडीचा एक्झॉस्ट फॅन, संडास नाहीतर बाथरुममधे लावतात त्याला! पण संधी मिळताच तो मलाच टोकत असतो. त्याला काही लहान मोठं समजत नाही! ‘उचललं ब्लेड आणि लावलं फ्रेमला!’

टेबल फॅन : कमाल आहे! त्याचं वायर सकट जरी वजन केलं तरी ते तुमच्या एका ब्लेडइतकं पण होणार नाही. त्याला दोन ब्लेड जास्ती आहेत म्हणून तो करतो का हो मिजास?

सिलींग फॅन : काल त्याला स्वच्छ करून माझ्याच वार्‍याखाली ठेवलं होतं. माझ्याच वार्‍याच्या तालावर फिरत तो मला विचारतो कसा, ‘अहो, चेंगट आजोबा जरा जोरात फिरा ना. थकलात काय?’

टेबल फॅन : अहो ‘त्याचा मेंदू केवढा आणि तुमचा केवढा?’ इतकं तरी त्याला कळलं पाहिजे ना? नुसती ब्लेड वाढली म्हणजे काही अक्कल नाही येत.

सिलींग फॅन : खरंय तुमचं. पण तुला एक गोष्ट कळली का? हा एक्झॉस्ट फॅन आयुष्यभर एकाच गतीने फिरतो.

टेबल फॅन : अहो इतकंच काय, हा तर घरातल्या माणसांकडे पाठ फिरवून फिरतो. सदा न कदा याचं लक्षं बाहेर. आपण मान मोडून घरातली हवा फिरवायची, गार करायची आणि याने ताठ मानेने ती घराबाहेर फुंकून टाकायची.

सिलींग फॅन : म्हणून तर आपल्याला हॉलमध्ये, बेडरूमध्ये किंवा किचनमध्ये ठेवतात आणि याला बाथरुमध्ये.

टेबल फॅन : अहो, बाहेरून थकून, दमून आलेली माणसं घरी आली की प्रथम तुमची किंवा माझी चौकशी करतात. तुमच्याकडून ‘वारेमाप’ आशीर्वाद घेतात किंवा माझ्याकडून शाबासकी. त्या वेळी त्या एफॅ-गेफॅकडे कुणी ढुंकूनसुद्धा पाहात नाही!

सिलींग फॅन : अरे, तुला अजून खरी गंमत कळलीच नाहीए. हा नेहमीच एका गतीने फिरतो, त्यामुळे याला आपल्यासारखं नाद आणि ताल यात काही गती नाही.

टेबल फॅन : खरं की काय? का बरं?

एक्झॉस्ट फॅन : मी सांगतो.

सिलींग फॅन : आँ !

एक्झॉस्ट फॅन : आजोबा, तुमचं म्हणणं एकदम खरं आहे. तुमच्यासारखा किंवा या टेफॅन भाऊंसारखा रेग्युलेटर माझ्याकडे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या स्पीडची मजाच मला कळत नाही. म्हणून मला वेगळं नका समजू हो! मी तुमच्याच गरगरे कुटुंबातलं शेंडेफळ आहे! हो ना?

आणि चमत्कार झाला..

तीनही पंखे एकाच नादात, एकाच तालात, एकाच गतीने  गरगरू लागले!

- राजीव तांबे