अक्षर कसे काढावे

दिंनाक: 24 Apr 2019 17:47:39


 

‘अक्षरे गाळून वाची। का ते घाली पदरिचीं। नीघा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख॥

हा श्‍लोक लिहिलेला कागद घेऊन किरण धावतच आजीजवळ आला आणि म्हणाला, ‘आजी, मला काही यात समजत नाही, काय ते सांगतेस का?

 आजी : बघू, काय लिहिलं आहे? अरे! हे तर दासबोधात आहे. काय अक्षर काढलं आहेस रे? छान..! म्हणजे मला आधी अक्षर कसं काढायचं हेच सांगायला हवं तुला.

किरण : आजी सांग ना!

आजी : पहिल्यांदा तू मला या परिच्छेदातील 5-6 ओळी वाचून दाखव. (तिने एक वर्तमानपत्र त्याला वाचायला दिले. किरण वाचत असताना, आजी लक्ष देऊन ऐकत होती.)

आजी : अरे, त्यातला एक शब्द गाळलास की! लक्ष कुठे आहे तुझं? आणि पुढच्या दोन ओळींत तर स्वत:चाच शब्द घातलायंस. (किरणला ती समजावते.) किरण, असा हिरमुसला होऊ नकोस. असा वाक्यातला शब्दच गाळलास, तर त्या वाक्याचा अर्थ तुला कळेल का? आणि दुसरा शब्द तुझा स्वत:चाच शब्द घातला आहेस, त्याचा तिथे काही संबंधच नव्हता. म्हणून नीट लक्ष देऊन वाचायला हवं. आता मनात ते तू वाचतो आहेस, आता तरी त्याचा अर्थ तुला कळला का?

किरण : हो! समजलं आता, मग मी काय करू?

आजी : अरे, म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, ‘दिसामाजी काही तरी लिहावे...

(तेवढ्यात नीता येेते.)

नीता : मी लिहू आजी?

आजी : हो लिही. पुस्तकातल्या मी सांगते त्या 4-6 ओळी बघून लिहायच्या आणि मग एकमेकांची वही बदलून ते बघून तपासायचं. म्हणजे मग आपलं कुठे चुकलं, ते तुम्हाला लगेचच कळेल, चालेल? मजा येईल बघा.

किरण : आजी हे घे पुस्तक! कोणत्या ओळी लिहू ते सांग. (आजीला पुस्तक देतो.)

आजी : अरे, काय ही पुस्तकांची अवस्था! कव्हर घातलेलं असूनही त्याची नीट निगा राखली नाहीस. बरं, टोकाला पान काय दुमडलं आहेस. कुठे कुठे चित्रही काढली आहेस. नीट जपून वापरायचं हं! घ्या या पाच ओळी लिहायला. नीता तूपण लिही.

नीता : आजी, बघ ना! किरण मला ते दुसरं पुस्तक वाचायला देत नाहिये. सांग ना त्याला.

आजी : अरे किरण, तू ते वाचत नसशील ना, तेव्हा तरी तिला दे. दुसर्‍याला पुस्तक वाचायलाही द्यायचं नाही, असं करू नये.

(तिला समजणार नाही, असे म्हणत किरण खसकन पुस्तक घेतो.)

आजी : अरे, असं वागतात ना, त्यांना रामदास स्वामींनी मूर्ख म्हटलं आहे बरं. आणि हं, लिहाल ते नीट अक्षर काढा, कोंबडीचे पाय नकोत. म्हणजे कसे तरी लहान-मोठ्या अक्षरात काढू नका. अरे स्पष्ट, वळणदार, सुंदर अक्षर असले ना की, तुमचा हुरूप वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल. त्यावरूनच तर तुम्ही किती नीटनेटके आहात ते समजतं.

नीता : आजी, आज वर्गात ना, राजेशला बाई यावरूनच बोलत होत्या.

किरण : तरीही आजी, नीताने बघ कसं घाईत जवळजवळ लिहिलं आहे.

आजी : समर्थांनी अक्षर कसं काढावं सांगताना म्हटलं आहे, ‘शब्दांत योग्य अंतर ठेवून लिहावे, पुसट काढू नये, नाहीतर तो एक मूर्ख ठरेल.’

किरण : आजी, शब्दावर आडवी रेघ हवी ना गं? आणि काना, मात्रा, रफार, वेलांट्या नीट काढलेल्या हव्यात ना! आम्हालापण बाई असं सांगत होत्या. आम्हाला नाही मूर्ख व्हायचं.

 आजी : हो! हो! आणि ते अक्षर लहान-मोठं नको. एकसारखं हवं. आणि हो! लांबटही नको हं. हे सर्व नीट लक्षात घ्या आणि शहाणे चतुर व्हा. मुलांनो, सध्याच्या ग्रंथ युगात छापण्याच्या कलेत विलक्षण प्रगती झाली असली ना, तरीपण सुशिक्षित माणसाचं अक्षर वळणदार, स्पष्ट, सुंदर असावं, या गोष्टीला आजही किंमत आहे बरं!

किरण, नीता :  आजी आज आम्हाला लिहिण्यासंबंधी खूप छान माहिती कळली. आम्ही आता लिहिण्यात नक्कीच सुधारणा करू.

(समजल्याचा आनंदी भाव मुलांच्या चेहर्‍यावर आजीला दिसला.)

- मीनल पटवर्धन