जर्बेरा

दिंनाक: 22 Apr 2019 15:57:19


 

आजकाल जर्बेरा फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. जर्बेरा हे ठेंगणे, बहुवर्षीय फुलझाड आहे. मैदानी, फडी अशा भिन्न प्रदेशात ते वाढू शकते. याची उंची ३० - ४५ से.मी. इतकी असते. तर विस्तार सुमारे १५ से.मी. असते. फूल १२-१५ से.मी. व्यासाचे एकेरी, दुहेरी प्रकारचे असते. पर्णरहित दांड्यावर फूल येते. पाकळ्या अरुंद, पातळ असतात फुलांचे रंग पांढरा, क्रीम, लिंबासारखा पिवळा, नारिंगी, विटकरी, लाल, गुलाबी, मरून इ. निरनिराळ्या छटांचे असतात. ह्याची दोन्ही प्रकारची लांब दांड्याची फुले फुलदाणीसाठी वापरतात. ती दीर्घकाळ टिकतात म्हणूनच लागवडीचे प्रमाण मोठे असते.

 जर्बेरा झाड कुंडीत, बागेत लावता येतात. लागवड बियांपासून किंवा फुटव्याची विभागणी करून करतात. जूनमध्ये बी पेल्यावर रोपे दीड महिन्याची झाल्यावर त्यांचे स्थलांतर बागेत करतात. कुंडीत लागवड करायची झाल्यास १५-२० से.मी. व्यासाच्या कुंडीत एकच बी लावावे. म्हणजे स्थलांतर नकोच. सुरवातीला जमीन हलकी चालते. पण स्थलांतरनंतर सुपीक पाण्याचा निचरा करणारी जमीन हवी असते. कुंडीत पहिल्यापासून चांगली सुपीक माती असावी. त्याने झाडाच्या वाढीला फायदा होतो. सूर्य प्रकाश तर महत्वाचाच. फुले, फळे, भाजी उत्पादन देणाऱ्या सर्वच झाडांना सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते, हे लक्षात ठेवावे. हिवाळ्यात व वसंतऋतुत फुले येतात. भरपूर फुलांसाठी झाडांना पानांचे खत द्यावे. हे लक्षात घ्यावे. सेंद्रिय खतामुळे झाडांना पाणी कमी लागते. व मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते. झाडांना एकदा रात्री किंवा संध्याकाळी पाणी घालावे.   

- मीनल पटवर्धन