दोस्तांनो उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे मस्त धमाल करत असाल ना? मित्रांसोबत अन् घरच्यांबरोबर भेळ, पाणीपुरी, आईसक्रीम, पिस्ता, नुडल्स, गड, किल्ले, अभयारण्य, जंगल सफारी अशा प्रकारचे ‘हटके’ बेतही आखले असतील! कधी कधी घराजवळच्या बागेत, मैदानात, डोंगरावर, नदी, नाल्याजवळ शहरापासून थोडं लांब सायकलवरून तुम्ही मित्र एकत्र जात असाल ना? तुम्ही जेव्हा आजूबाजूला पाहाल तेव्हा लक्षात येईल की अरे, इथे हवा मोकळी आहे, थंडगार आहे, झाडांमुळे सावली आहे, त्यावर पक्षी आहेत वगैरे वगैरे. डोंगरावर, जंगलात बागेतल्या सारखी झाडं मुद्दाम लावलेली नसतात. त्यांची वाढण्याची पद्धतही वेगळीच वाटते. तरीसुद्धा सगळी अगदी गुण्यागोविंदानं एकत्र राहात असतात. ही झाडं कोण लावतं? त्यांना पाणी, खत कसं मिळतं, कोण त्यांची निगा राखतं? त्यांना फुलं, फळं कशा प्रकारची येतात? फुलातला मध खायला कोणते पक्षी, किडे, मकोडे, लहान प्राणी येतात याचा कधी विचार केलाय का? कोणत्या झाडांवर कोणते पक्षी कशाप्रकारे घरटी बांधतात, ती साकारताना पक्ष्यांची चालेली धडपड, आपल्या घरट्यावर सततचा ‘पहारा’ लांबूनही कसा ठेवतात, हे पाहायला म्हणजेच निसर्ग वाचायला शिका, तुम्ही खूप ‘श्रीमंत’ व्हाल! निसर्गातली बरीच ‘गुपित’ तुम्हाला कळतील. आपल्या आजूबाजूच्या, जंगलातला, अभायरण्यातला, देयरायांमधला, टेकडीवरचा ‘निसर्ग’ म्हणजे तिथली झाडं, झुडपं, वेली, वृक्ष, प्राणी, पक्षी, किडे, मकोडे, डोळ्यांना सहजी न दिसणारे, मातीत अन् पालापाचोळ्यात लपलेले लहान जिवजंतू, तिथली हवा, पाणी, वारा आणि या सर्वांचे परस्परांशी असलेले चांगले-वाईट संबंध म्हणजेच त्या त्या भागातलं पर्यावरण! सृष्टीतला प्रत्येक सजीव (मग ते झाडही असो!) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पती सृष्टीवरच अवलंबून असतो. या वनस्पती सृष्टीत विलक्षण विविधता आहे. ही विविधता जन्माला येते ती एका चिमुकल्या बीजातून! हे बीज स्वत:ला मातीत गाडून घेत.ं अन् वनस्पती सृष्टीला जन्म देतं! या बीजांतही केवढी मोठी विविधता आहे, बीजांचं फळांमध्ये राहणं जितकं वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण तितकंच पक्व झाल्यानंतर फळांपासून अलग होऊन वेगवेगळ्या माध्यमातून दुसर्‍या जागी जाणं. अन् योग्य ठिकाण मिळाल्यास तिथेच रुजणं हेही वैशिष्ट्यपूर्ण! फळांचे, बियांचे आकार, बियांमधला ‘अंकुर’ जपण्यासाठी निसर्गत:च फळांमध्ये बियांची केलेली वैविध्यपूर्ण ‘जपणूक’ पाहिली तर वनस्पतींची ही ‘अबोल’ कल्पकता किती ‘बोलकी’ आहे याचं प्रत्यंतर येईल.

काही गवतांच्या बिया, दगडपाला, रानजाई, कापूस, कण्हेर, काटेसावर, सिबा यांच्या बिया ‘पॅराशूट’सारख्या हवेत तरंगत असतात. कापसाच्या पुंजक्यात एक बी लपलेली असते तर काहींमध्ये ‘बी’च्या एका किंवा दोन्ही बाजूला दोर्‍यासारखे किंवा कापसासारखे तंतू चिकटलेले असतात. काटेसावरीचं उकललेलं फळ बघा. आत गोलाकार कप्पे म्हणजे एका बाजूचे उघड्या झालेल्या जणू छोट्या विहिरी! त्यात कापूस ठासून भरलेला असतो. बिया त्यात लपेटलेल्या! एका वेळेला एक किंवा दोनच बिया पक्व होतात. त्या पक्व झाल्या की कापसाबरोबर फळातनं बाहेर पडतात, तीच तुम्ही पकडता ती ‘म्हातारी’ पिवळ्या फुलांचा टबुबिया, जांभळ्या रंगाचा जॅकॅरंडा, नारंगी फुलांचा ‘स्पॅथोडीया’ पूर्ण फुलला की पाहणं म्हणजे पर्वणींच! त्यांच्या फळातल्या बिया पातळ पंखांत अडकलेल्या! टबुबियाची फळं असंख्य शेंगेसारखी, खालून उकलतात, दोन छकलं होतात. मध्यभागी एका दांड्यावर पंख असलेल्या असंख्य बिया एकमेकांवर चिकटून बसलेल्या असतात. जॅकॅरॅन्डाच्या बिया अन् पंख खूप नाजूक असतात. स्पॅथेडियाची फळं म्हणजे लांबट, कडक बोटांसारखी! पक्व फळं उकलली की छोटी होडीच! त्यात शिस्तीत बाकड्यावर बाकडं टाकून बसलेल्या पंखाच्या बिया! त्यांची शिस्त इतकी कडक की प्रत्येक फळातला ‘अंकूर’ ठरावीक दिशेला अन् एका वेळेस एका रांगेतल्या, ठरावीक बिया बाहेर पडणार जणू छोटे पंख असलेली छोटी विमानच!

तपकिरी, पातळ पापुद्य्रात पहुडलेली, बदामाच्या चवीच्या, वावळ्याची बी तुम्ही खात असाल ना? खूप उंच वाढणार्‍या महाँगनीच्या फळाचं कवच लाकडासारखं कडक असतं. फळ उकलताना कमळाच्या पाकळ्यांसारखं उकलतं! मध्यभागात शंकूच्या आकाराचा कठीण स्तंभ असतो त्यावर खाचा असतात, त्यात अनेक एकावर एक बसलेल्या पातळ पापुद्य्राच्या बिया असतात. याशिवाय तीन पंख असलेली ‘भिंगरी’ (मधुमालतीची फळं), ऐन, कॉम्बे्रटम्, अर्जुन यांच्या बियांना पण पंख असतात. गुलमोहर, पांगारा यांची फळं आणि त्यातल्या बियांची ठेवण पाहाण्यासारखी असते. पांगाराच्या बियांना ‘चटक्यांच्या बिया’ म्हणतात. अमलतास, कांचन, ग्लेरिसिडीया, शिरीष, गारबी अशा अनेक झाडांना शेंगा येतात, पण त्यांची उकलण्याची पद्धत वेगळी असते. काहींमधले कप्पे मोठे आणि बिया लहान यांमुळे खुळखुळ्यासारख्या वाजतात. अबोली, कोहांटीची फळं पिकली की पाण्यात टाकायची, त्यांनी पाणी भरपूर प्यायले की फटाक्यासारखा आवाज येऊन फुटतात आणि बिया पाण्यात विखुरतात. पळस, अंजन, शिसम यांच्या शेंगा सहसा उकलत नाहीत.

दोस्तांनो, उन्हाळ्यात तयार होणार्‍या काही फळांची, बियांची तुम्हाला माहिती दिलीय. पण तुम्हाला यापेक्षाही खूप वैविध्य असलेली फळं, बिया निसर्गात मिळतील. त्या गोळा करा. सावलीत वाळवा. वनस्पतिशास्त्रज्ञांकडून त्यांच्या नावाची ओळख करून घ्या. पिशवीत माती भरून त्यात बिया रुजत घाला, तर कडुलिंबाच्या निंबोण्या गोळा केल्यात की लगेच मातीत पेरून टाका. तुमची शाळा जूनमध्ये सुरु होईल. तेव्हा बर्‍याच प्रकारच्या बियांची रोपं तयार झाली असतील. शाळेत, सोसायटीत, मोकळ्या जागेत तुम्हाला लावता येईल. आपल्या आजूबाजूचा परिसर थोड्याच दिवसात हिरवागार दिसायला लागेल.

- डॉ. कांचनगंगा गंधे