२३ मार्च दुपारचे तीन वाजले होते. लाहोरच्या तुरुंगाच्या बाहेर शेकडो लोक जमले होते. तुरुंगाचे दार उघडले आणि बाहेर आलेला शिपाई सांगू लागला. “ भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांच्या आईंवडिलांना व भावा-बहिणींनाच फक्त त्यांची भेट घेता येईल. ” हे ऐकताच भगतसिंगांचे वडील किशनसिंग म्हणाले, “ जर भगतसिंगांचे वृद्ध आजी-आजोबा, काका-काकू या सर्वच लोकांना भेटता येत नसेल, तर आम्हीही त्यांना भेटणार नाही. ” या गडबडीमध्ये राजगुरूंच्या आई पार्वतीबाई आणि बहिण यमुताई भाटवडेकर, सुखादेवांची आई तुरुंगाच्या दरवाजाकडे जाऊ लागल्या. आणि त्यांच्या लक्षात आले, भगतसिंगांच्या कुटुंबीयांपैकी कोणीच पुढे येत नाही. राजगुरुंची बहिण यमुताई यांनी किशनसिंगांना विचारले, तेव्हा किशनसिंगांनी न भेटण्याचे कारण सांगितले. ते ऐकताच तुरुंगाच्या दरवाज्यात पाऊल टाकणाऱ्या पार्वतीबाई एकदम थांबल्या आणि म्हणाल्या, “ जर तुम्ही आपल्या मुलाला भेटत नाही, तर मीही आपल्या मुलाला भेटायला जाणार नाही. माझा मुलगा जितका मला प्रिय आहे, तितकाच तुमचाही तुम्हाला आहे. ”

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांचेही सख्खे नातेवाईक अखेर मागे फिरले. इंग्रजांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्वतःच्या वीर मुलांशी त्यांची अखेरची भेटही होऊ शकली नाही.

भगतसिंगांच्या वृद्ध आजी-आजोबांशी भगतसिंगांची भेट होऊ शकत नाही, असे दिसल्यावर स्वतःच्या मुलाचीही अखेरची भेट न घेणाऱ्या पार्वतीबाई राजगुरू या खरोखरच वीरमाताच म्हणायला पाहिजे.

सायमन कमिशनच्या विरोधात मोर्च्याचे नेतृत्व करणाऱ्या लाल लजपतराय यांच्यासारख्या देशातील ज्येष्ठ स्वातंत्र्ययोध्यावर लाठीमार करणाऱ्या स्कॉट या इंग्रज अधिकाऱ्याला मारण्याचा भगतसिंग, राजगुरु आणि चंद्रशेखर आझादांनी प्रयत्न केला. स्कॉटऐवजी त्याचा सहकारी साँडर्स मारला गेला. त्यानंतर काही दिवसातच दिल्लीच्या असेंब्लीमध्ये पब्लिक सेफ्टी बीलमांडले जात होते. अचानक सभागृहाच्या मधल्या मोकळ्या जागेत बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब टाकणारे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे सभागृहाच्या वरच्या गॅलरीमध्ये पकडले गेले. बॉम्ब तयार करणाऱ्या इमारतीवर छापा टाकून सुखदेव यांनाही पकडले गेले आणि वेष बदलून पुण्यात आलेल्या राजगुरुंनाही फितुरीमुळे पकडण्यात आले. या तिघाही क्रांतिकारकांच्या पाठोपाठ त्यांचे अनेक साथीदार पकडले गेले. या सर्व क्रांतिकारकांच्या गुरुस्थानी असणारे चंद्रशेखर आझाद मात्र इंग्रजांना शेवटपर्यंत सापडले नाही. २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांबरोबर झालेला चकमकीत आझाद शहीद झाले.

याच सुमारास भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली. लाहोरच्या तुरुंगात दि. २४ मार्च १९३१ या दिवशी फाशी देण्याचे निश्चित झाले होते. या निर्णयामुळे संपूर्ण देशभर वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. आदल्या दिवशी – म्हणजे २३ मार्च या दिवशी तुरुंगाच्या बाहेर लोक जमू लागले. नातेवाईकांशी त्यांची अखेरची भेटही झाली नाही. बाहेरचे हे सर्व वातावरण पाहून अत्यंत गुप्तपणे फाशीच्या आदल्या दिवशी आली, म्हणजे २३ मार्चलाच संध्याकाळी ७ वा. ३३ मिनिटांनी या तिघांनाही फाशी देण्यात आली. फाशी देण्यापूर्वी भगतसिंग इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाले, “ मॅजिस्ट्रेट साहेब, आपण भाग्यवान आहात, कारण हिंदी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्यूलाही किती आनंदाने सामोरे जातात, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. वंदे मातरम् ! इन्किलाब जिंदाबाद ! ”

फाशीनंतर थोड्याच वेळात तुरुंगाच्या मागच्या बाजूची भिंत पाडून अत्यंत गुप्तपणे एका पोलीस ट्रकमधून लाहोरपासून ७० किलोमीटर अंतरावरील सतलज नदीच्या किनाऱ्याजवळ फिरोजपुर येथे त्यांचे मृतदेह नेण्यात आले. तेथे सरकारनेच गुप्तपणे अंत्यसंस्कार केले. तरीही फाशीची बातमी बाहेर कळलीच. खवलेला जनसमुदाय लाहोरहून फिरोजपूरला गेला आणि पहाटेच्या वेळी तेथील रक्षाच त्यांना पहावयास मिळाली. २४ मार्चला लाहोरमध्ये कडकडीत हरताळ पाळला गेला. सकाळी मोठी शोकसभा पाळली गेली. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले.

अत्यंत लहान वयात घरादारपासून, कुटुंबीयांपासून दूर राहून क्रांतीलढ्याला समर्पित झालेली अशी ही महान पुष्पे ! पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये सतलज नदीच्या तीरावर त्यांची स्मृतिस्थाने आजही त्यांची आठवण जागवत आहेत...

संदर्भ – वि.श्री.जोशी यांचे ‘वडवानल’ हे पुस्तक.

- मिलिंद प्रभाकर सबनीस.