अ‍ॅस्टर

दिंनाक: 02 Apr 2019 14:16:11

 


अ‍ॅस्टर हे हंगामी फुलपीक आहे. त्यामध्ये रंग-विविधता आढळते. याची फुले पांढरी, लाल, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची असतात. ही फुले देवपूजेसाठी, फुलदाणीत, हारात वापरली जातात. त्यांच्या जातीही अनेक आहेत. बगीच्यात किंवा कुंड्यांमध्ये अ‍ॅस्टर ची लागवड केली जाते. बियाणांद्वारे पेरणी केल्यावर ७ ते ८ दिवसात त्यांची उगवण सुरु होते. त्यासाठी २० ते ३० डिग्री सें. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. त्या बियाणास विश्रांतीची वेळ नसते. त्यामुळे बियाणे फुलांतून काढल्यावर लगेच पेरले तरी ते उगवते. रस्त्यालगतही यांची लागवड केली जाते. मुंबईत जास्त थंडी वा उन्हाळा नसल्याने अ‍ॅस्टर सहजी लावता येतात. हे मुख्यत्वे थंड हवामानाचे पीक. पण तिन्ही हंगामात यांची लागवड केली जाते. जास्त दर्जेदार फुले मिळवण्यासाठी पेरणी सप्टेंबर/ऑक्टोबर या महिन्यांत करावी. ती निरनिराळ्या जमिनीत करतात. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते. निकस, हलक्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते. चार महिन्यांनी फुले येतात. तेव्हा देठाशिवाय शक्यतो ती काढू नयेत. काढल्यास त्या देठाचे तुकडे करून त्याच कुंडीत टाकल्याने पुनर्वापर होतो. तो उपयुक्त ठरतो.

लागवड करताना एकाच ठिकाणी ती न करता जागा बदल, फेरपालट करावे लागतात. एकदम कडक ऊन, जोराचा पाऊस व कडक थंडीचे हवामान अ‍ॅस्टरला मानवत नाही. चार आठवड्यानंतर रोपे स्थलांतरित करावी. एका २५ सें.मी. व्यासाच्या कुंडीत एकच रोप लावावे. पाच-सहा पाने वर आल्यावर त्यांना नत्र, स्फुरद, पलाश योग्य प्रमाणात घालावी. मेथी, भाजी, पाने व देठ बारीक चिरून घातल्याने नत्र चांगले मिळते. स्फुरदसाठी पपई व केळीची साले थोडी बारीक करून घातल्याने उपयोगी पडतात. कोबी, फ्लॉवर यांची पाने बारीक चिरून घातल्याने कळ्या गळून पडणे, त्यांची फुले न होणे हे दोष जातात. शिवाय हे सर्व विघटनशील घटक असल्याने झाडाच्या तंतू मुळांना चांगली मिळतात. कुंडीत ती वर घातल्याने तणही उगवत नाहीत. पाण्यासाठीही योग्य नियंत्रण हवे.

अ‍ॅस्टरच्या पिकाची वर्गवारी ही झाडाची वाढीची सवय, फुलांचा आकार, पाकळ्यांची संख्या, पाकळ्यांची ठेवण यानुसार केली जाते. त्याचे उंच वाढणारे (७० ते ९० सें.मी.), मध्यम उंची (४० ते ६० सें.मी.) व बुटके (२० ते ४० से.मी.) याप्रमाणे प्रकार पडतात.

बंगलोरच्या फलोत्पादन संशोधन संस्थेने १. कामिनी २. शशांक ३. पोर्णिमा ४. व्हायलेट कुशन या जाती विकसित केल्या आहेत. गणेशखिंड फळसंशोधन केंद्राने १. पिंक २. पर्पल ३. व्हाईट व परदेशी जाती – १. पिनॅचिओ २. स्टार डस्ट ३. सुपर प्रिन्सेस ४. जायंट ऑफ कॅलीफोर्निया ह्या जाती विकसित केल्या आहेत. 

- मीनल पटवर्धन