गोष्टी मुलांच्या

दिंनाक: 15 Apr 2019 17:09:39


 

मुलं मोठ्या माणसांहून अधिक संवेदनशील असतात. पंचेंद्रियांनी घेता येतील तेवढे अनुभव ती स्वच्छ, मोकळ्या मनाने घेत असतात. त्यात बरेचसे अनुभव ती पहिल्यांदाच घेत असतात. अशा अनुभवांतून कितीतरी गोष्टी त्यांना नव्यानेच कळतात. त्यातूनच त्यांच्या मनात नवनवीन संकल्पना तयार होत जातात आणि त्यातूनच त्यांचं रंगीबेरंगी अनुभवविश्‍व तयार होत असतं, जे खरं तर खूपच रंजक असतं!

मोठी माणसं मात्र ‘मुलांना काय कळतंय एवढ्या लहान वयात?’ अशा (गैर)समजातच वावरत असतात. परिणामी मुलांची मनं अव्यक्तच राहातात. मुलांची नेमकी हीच शोकांतिका ‘फुगा’ आणि ‘न ऐकलेली गोष्ट’ या दोन्ही कथा आपल्यासमोर मांडतात! म्हणूनच या दोन्ही कथा कुठल्याही वयोगटाला भावतील अशाच आहेत; मुलांना त्या अगदी ‘आपल्या’ वाटतील, तर मोठ्यांना विचार करायला लावतील आणि मुलांशी मैत्री करायला भाग पाडतील, परस्पर संवादाची गंगा वाहती करायला मदत करतील, हे नक्की!

पुस्तकांचा आकार, मांडणी, भाषा, मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंतच्या प्रत्येक पानावरील चित्रं आणि त्यातली रंगसंगती यातलं काहीच साचेबद्ध नाही; तर ते एकदम हटके आहे! म्हणूनच पाहिल्या पाहिल्या ही पुस्तकं कुतूहल जागवतात आणि हातात घेतल्या घेतल्या हाताला जाणवणारा पानांचा गुळगुळीत स्पर्श वाचकाला सुखावतो. दोन्ही पुस्तकांची वेगळ्याच वळणांची शीर्षकं आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं मुखपृष्ठापासूनच वाचकाच्या मनाचा ताबा घ्यायला सुरुवात करतात. आणि ही कथा ‘वाचायलाच हवी’ असं वाटायला लावून वाचकाला पुस्तक उघडायलाच लावतात.

बर्‍याचदा मुलांसाठीच्या गोष्टी या झाडा-पानांच्या, पशु-पक्ष्यांच्या असतात. इथे मुलांच्याच गोष्टी मुलांना सांगण्याची लेखिका स्वाती राजे यांची कल्पनाच आगळी वेगळी ठरते. या गोष्टी सांगताना वापरलेली भाषाही मुलांच्या भावविश्‍वाशी जवळीक साधणारी आहे. ‘‘आई दुधात बोर्नव्हिटाचा चमचा बुडवायची. पण चंदाला ते दोन घोटांनंतर कडू लागायचं. कधीकधी आंबट. कधीकधी नुसतंच ‘क ऽ सं ऽ त ऽ री’.’’ किंवा ‘‘वाईट वाटल्यासारखं होता होता मुलानं दोन मिन्टं आपले डोळे मिटले. छातीवर हात ठेवून जरा चोळत त्यानं एक मोठ्ठा श्‍वास घेतला. आता त्याच्या हातात नवा फुगा.’’ अशी साधी सोपी मुलांना सहज उमजणारी भाषा! कमीत कमी शब्द असणारी छोटी छोटी वाक्यं अर्थ मात्र खूप मोठ्ठा सांगतात, अगदी मुलांच्या मनासारखंच!

मुलांना अक्षरांच्या आधी रंग, चित्र आकर्षित करतात. त्यातून अर्धीअधिक गोष्ट कळली की ‘नक्की काय घडलंय’ हे समजून घेण्यासाठी मुलं आपोआपच शब्दांकडेे वळतात, हे जाणूनच या पुस्तकाची रचना केल्याचं जाणवतं. दोन्ही पुस्तकांचं प्रत्येक पान म्हणजे एक एक स्वतंत्र पेंटिग वाटावं असं! अशा त्या पेंटिग्जच्या आधाराने येणारे मोजकेच; पण नेमके शब्द गोष्टीचं मर्म सांगतात.

‘फुगा’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हातात फुगा धरलेला मुलगा दिसतो, जो काहीसा खिन्न आहे, मात्र ‘न ऐकलेली गोष्ट’च्या मुखपृष्ठावरील झाडाला मिठी मारलेली मुलगी ही प्रसन्न दिसते! असं जरी असलं तरी दोन्ही ठिकाणी त्या लहानग्यांचं कोवळ्या वयातलं एकटेपण मात्र प्रकर्षाने जाणवतं! मुलांचं अंतरंग उलगडवणार्‍या या गोष्टी वाचताना मुलांच्या सच्च्या भावविश्‍वात डोकावता येतं.

 कुतूहलांनी भरलेल्या लहानग्यांच्या मनात सांगण्यासारखं खूप काही असतं; ते ऐकणारा मैत्रीचा, विश्‍वासाचा कान त्यांना हवा असतो. ‘काही काही गोष्टी कधी कुणाला सांगताच येत नाहीत!’ हा फुगा या गोष्टीचा शेवट असंच काहीसं सूचित करतो; तर ‘न ऐकलेली गोष्ट’ मध्ये आपल्या एकटेपणावर आपणच मार्ग काढणारी, आपल्या मनातल्या गोष्टीची उत्तम निगराणी करण्याची कला गवसलेली चंदा लहानग्यांबरोबरच भौतिक जगात अडकलेल्या मोठ्यांनाही आपल्यातलं हिरवेपण, ताजेपण जपायला शिकवते!

- चित्रा नातू-वझे