सुट्टीची ओढ

दिंनाक: 13 Apr 2019 10:47:11

 


आज शाळेचा शेवटचा दिवस असल्याने वर्गात मजा आणि मस्तीच वातवरण होतं. त्यात बाई मुलांना उन्हाळ्याच्या सुटीत काय काय धम्माल, मस्ती करणार हे एक-एकला विचारत होत्या. मुलांच्या भन्नाट कल्पना ऐकून त्यांना हसू ही येत होत आणि आश्चर्यही वाटत होतं.

सनी मात्र एकटाच, सारखाच सुटीच्या आठवणीत रमत होता. बाई, एक एक करून मुलांशी संवाद साधत होत्या. एव्हाना सनी वेगळ्याच दुनियेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं, पण बाई सनीला काहीच न बोलता इतर मुलांशी बोलत राहिल्या. आता सर्वांचे सुटीचे प्लान सांगून झाल्यावर, आता शाळा सुटणार म्हणून मुलांनी एकदाच हुश्श केलं. बाई मात्र सनीकडेच बघत होत्या, सर्व मुलं पण आता त्याच्याकडेच बघू लागली. पण त्याला मात्र चांगलीच तंद्री लागलेली. कदाचित एखादं दिवास्वप्न पाहात असावा. बराच वेळ झाला तरी तो काही भानावर येईना. आता मात्र बाईंनी खाली पडलेला खडूचा छोटा तुकडा घेतला आणि त्याच्या दिशेने फेकला (त्याला लागणार नाही असा). खडू बाकावर पडताच आवाज होऊन सनी भानावर आला आणि कावर्‍या बावर्‍या होऊन इकडे तिकडे बघू लगला. सर्वजण त्याला हसू लागले. बाई फक्त बघत होत्या. तो हिरमुसला, जरा घाबरला. मग बाईंनी सर्वांना शांत बसायला सांगितलं आणि सनीला म्हणाल्या, ‘सनी, सांग बरं आम्ही काय काय गप्पा मारल्या?’ आता सनी जरा टेंशनमध्ये आला. कारण त्याने 2-4 जणांचंच बोलणं ऐकलं होत. मान खाली घालून तो तसाच शांत उभा राहिला. नंतर बाई म्हणाल्या, ‘बरं ते जाऊ दे, पण तुझं स्वप्न तरी झालं का पूर्ण बघून?’

सनी, गालातल्या गालात थोडा हसला...!

मग बाई पुन्हा म्हणाल्या, ‘आम्हाला तरी कळू देत, एवढं काय बघत होतास तू स्वप्नात?’

सनी म्हणाला, ‘बाई, आता सुटी लागणार ना?’

‘ते आम्हाला माहीत आहे’, बाई म्हणाल्या.

‘हो, मग मी पण गावी जाणार.’

‘गावी तर सगळेच जातात’, वर्गातील एक मुलगा म्हणाला आणि सर्वजण हसू लगले.

‘अरे, हसताय काय, त्याला पूर्ण बोलू तरी द्या’, असं म्हणत बाईंनी पुन्हा मुलांना गप्प बसायला सांगितलं.

सनी पुन्हा बोलू लागला, ‘बाई, माझ्या मामाचं गाव खूप छोटंसं आहे. तिथं सर्व सुविधा पण नाहीत अजून. पण तरीदेखील आम्ही जातो. मला उन्हाळ्याची सुटी जास्त आवडते, कारण फक्त याच सुटीत मला तिथं जायला मिळतं. मामाच्या गावांच आकर्षण म्हणजे तिथं रोज सकाळी एक वासुदेव येतो. ज्याला मी फक्त गावीच पाहिलंय आणि हा वासुदेव सकाळी सकाळी फक्त देवाचीच नाही, तर लहान-मोठ्या क्रांतिकारकांची गाणी म्हणतो. त्याचा आवाज असा बुलंद आहे. आता जरी त्याचा विचार केला, तरी ती गाणी माझ्या कानात वाजतात. त्या वासुदेवामुळेच मला शिवाजी महाराज, शंभूराजे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्याविषयीची खूप माहिती समजली.’

‘अरे व्वा!’ बाईंनी आणि सर्व मुलांनी दाद दिली.

सनी पुन्हा बोलू लागला, ‘बाई, या वेळी मी त्या वासुदेवाच्या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणीन, तुम्हा सर्वांना दाखवायला.’

तेव्हा बाई म्हणतात, ‘हो हो, नक्की आण, पण सुटीत जरा वेगवेगळी पुस्तकं पण वाचयला विसरू नका हं...!’

‘हो बाई, नाही विसरणार’, सनी म्हणाला.

इतक्यात घंटा वाजली आणि सर्व मुले जल्लोष करत वर्गाबाहेर पडली...

- ज्योती बागल