पायरी

दिंनाक: 13 Apr 2019 18:06:35


 

‘अरे अरे कळसा हसू नको पाहू

पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ’

आमच्या लहानपणी आम्हाला ही कविता होती. उन्मत्त झालेला कळस दिमाखाने, ऐटित पायरीला तुच्छ समजतो. व आकाशात डौलाने मिरवत असतो. परंतु या पायरीसारखाच तो दगडाचा बनलेला आहे आणि या पायरीच्या आधारावरच तो आज उभा आहे हे तो विसरतो.

व्यवहारामध्ये ‘पायरीचा’ वापर आपण अनेक अर्थाने करत असतो. अगदी बालपणापासून ते वृद्धत्व येईपर्यंतच्या या सर्व जीवनाच्या पायर्‍याच आहेत. तसेच समाजातील श्रीमंत-गरीब हा भेदभाव या पायर्‍यावरून ठरतो. ‘गरिबाने आपली पायरी सोडून वागू नये’, असे म्हटले जाते. या ‘पायरी’ शब्दाचा आपण तुच्छता, ऐट, टप्पा या अर्थी वापर करतो.

मुलीचे वडील आपल्या मुलीच्या लग्नासाठी वरपक्षाच्या पायर्‍या झिजवतात, तर गरीब कर्ज मिळवण्यासाठी धनिकाच्या पायर्‍या झिजवतो प्रत्येकाचा पायरी झिजवण्याचा हेतू भिन्न असतो.

‘पायरी झिजवणे’ हा वाक्प्रचार आपल्या देशात फार जुन्या काळापासून माहिती आहे.

लहान मूल जरी एखादी पायरी चढले तरी आईला खूप आश्चर्य, कुतूहल आणि आनंद होतो. जणू काही आयुष्याच्या श्रेष्ठ शिखराप्रत पोहोचण्याची ही सुरुवात असते. जीवनाच्या या पायर्‍या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. कारण एखाद्या पायरीवरून जरी पाय घसरला तरी पुढील चढण्याची उमेद खच्ची होते आणि जर त्याला सावरले तर तो पुढील जीवनाच्या पायर्‍या यशस्वीरीत्या चढू शकतो. सर्वांत वरची पायरी म्हणजे त्या व्यक्तीच्या यशाचे सर्वोच्च शिखर असते. परंतु हे सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर काही काळ रेंगाळावे लागतेच, पण हे रेंगाळणे अर्थपूर्ण हवे.

काही वेळा ‘पायरी’ हा शब्द योग्यता या अर्थानेही वापरतात. आपल्या योग्यतेनुसार ज्याने-त्याने राहावे हे जरी असले तरी ‘या’ पायरीवरच राहावे, असे नाही तर पुढच्या पायर्‍यांवर चढायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही वेळ गुण, दर्जा, वरची श्रेणी या अर्थाने ती व्यक्ती एखाद्या उच्च पदावर आहे असेही समजले जाते.

शालेय जीवनात ‘पायरी’ या शब्दाला महत्त्वाचे स्थान आहे. कारण शालेय जीवन  हीदेखील आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी समजली जाते.

आजच्या लिफ्टच्या युगात झटपट वर जाणे विनासायास घडते आणि वीज बंद असली की, धाडकन जमिनीवरही आदळणे आलेच. आणि मग पायर्‍या चढताना होणारा त्रास हा जाणवतोच. माझ्यामते एकदम उच्चस्थानापर्यंत पोहोचण्यापेक्षा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख अनुभवत, थोडेसे आयुष्याच्या प्रत्येक पयारीवर रेंगाळत पुढे जाण्याची मजा काही औरच असते.

काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, देवळात जाण्यासाठी पायर्‍या असतात. काही पायर्‍यांवर नावे असतात. ‘तुकारामाची पायरी’, ‘सोपानाची पायरी’ आणि अशा अध्यात्मिक पायर्‍या चढतच आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. खर्‍या आत्मज्ञानाची आपल्याला ओळख होते. या प्रत्येक पायरीवर या संतांनी घेतलेले ज्ञान, त्यांचे अध्यात्मिक ज्ञान, त्यांचे अनुभव हे समजावून घेऊनच आपण परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे असा तर या मागचा हेतू नसेल? म्हणूनच असे म्हटले नसेल ना की,

‘पायरीशी जाता आम्ही होऊ सारे दंग’

जणू काही या प्रत्येक पायरीशी तुम्ही एकरूप व्हा. एकनिष्ठ राहा हे अनुभव तुम्ही घ्या म्हणजे मोक्षाप्रत जाल. हे तर त्यामागचे सांगणे नसेल?

कळसाचे दर्शन घेतले तरी देवदर्शन झाल्यासारखे आहे. हे जरी खरे असले तरी माझ्या मते या पायर्‍यांचे अध्यात्मवादी तेजच जणू या कळसावर चढले आहे म्हणून तो डौलानी मिरवत आहे. म्हणूनच सांगावंसं वाटत की,

‘पायरीविना कळस कसा राहील उभा, माझ्या लिखाणाचा हाच की हो गाभा’

     - प्राजक्ता प्रमोद वैद्य (सहशिक्षिका)

आनंदीबाई कर्वेप्राथमिक शाळा, कर्वेनगर