ओळख लोककलेची

दिंनाक: 13 Apr 2019 17:19:02


 

राघव, मामाच्या गावाला बर्‍याचं वर्षानंतर आला होता. आधी आला होता तेव्हा तो बराच लहान होता. आता तो सातवीला गेला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कुतुहल वृत्तीने बघण्याची सवयही वाढली होती.

राघवच्या मामाचं गावं तसं शहरापासून थोडसं दूरचं होतं. खेडं म्हटलं तरी चालेल. त्या खेड्यात त्यांचा मोठ्ठा वाडा होता. राघवचे आजोबा तेथील पाटील होते. त्यामुळे त्यांच्या वाड्यावर लोकांची वर्दळही चालूच असे. गावात मोबाईलला रेंजही नव्हती. टी.व्ही. ही सारखा बघून राघवला कंटाळा यायला लागला होता. म्हणून त्याची चालू झालेली कुरकुर पाहून आजोबांनी आपली कामं बाजूला ठेवली. आजोबा म्हणाले,‘‘खेड्यातील लोकांचा दिवस टी.व्ही. आणि मोबाईलशिवाय सुद्धा अगदी बेस जायचा बघं.’’ राघवच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्‍न होते. भुवया उंचवून तो म्हणाला,‘‘काही तरी काय आजोबा?’’ ‘‘अरे का नाही? मी तुला दाखवतो इथली लोकं मोबाईल, टि. व्ही., इंटरनेट शिवाय कशी राहतात ते. उद्या फकस्त पहाटं उठ. जमल ना?’’ आजोबांनी विचारलं राघवने आनंदाने ‘‘हो’’ म्हटले. रात्रभर राघवच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं, ‘आपल्याला आजोबा उद्या काय दाखवणार.?’

पहाटेचा कोंबडा आरवला घरात जात्याची घर-घर चालू झाली. त्या जात्याच्या घर-घर आवाजावर राघवची आई आणि आजी ओव्या म्हणत होत्या. त्या आवाजाने राघवला जागं आली. डोळे चोळत तो स्वयंपाक घरात आला. ‘‘काय करतीये आई सकाळी सकाळी? अजून उजाडलेलं दिसतं नाही’’. राघव आईला म्हणाला. ‘‘जेवायला भाकरी नको का? म्हणून जात्यावर दळण दळते आहे.’’ आईने राघवला सांगितले. ‘‘पण तू गाणं का म्हणतीये? राघवचा पुढचा प्रश्‍न तयार होताच. यावर आजी हसून म्हणाली, ‘‘अरे, याला गाणं नाही ओवी म्हणतात, जात्यावरचे कष्ट जाणवू नये म्हणून बायका ओव्या गातात. ओवी आणि जातं म्हणजे एकाचं नाण्याच्या दोन बाजू बघं.’’

‘‘अरे, राघव उठलास का?’’ आजोबांनी अंगणातून राघवला हाक दिली. राघव आतून पळत बाहेर आला. ‘‘हो आजोबा, उठलो.’’ राघव आजोबांना म्हणाला. बाहेर अंगणात राघवने बघितले तर मामी रांगोळी घालत होती. तेवढ्यात आजी पूजेचे ताट घेऊन आली. ती तुळशीची पूजा करत होती. राघव हे बघून आजोबांना म्हणाला. ‘‘आजोबा, आजी रोज पहाटे तुळशीची पूजा करते का? मामी रोज रांगोळी काढते का?’’ ‘‘हो बेटा, इथली पहाट रोज जात्याची घर-घर, ओवी सडा रांगोळी, तुळशीच्या पूजेने होते.’’ आजोबा राघवला सांगत होते. ‘‘आजोबा, आम्ही रोज सकाळी डोंगराला आग लागली पळापळा असं खेळतं असतो. स्कूल बस सुटेल पळा पळा पळा,’’ राघव म्हणाला. यावर सगळे मनमोकळं हसले.

चिपळ्यांचा आवाज वाड्याच्या दाराच्या दिशेतून येऊ लागला. ‘गावं जागवतं आली वासुदेवाची स्वारी’ असं गाणंही ऐकू येऊ लागलं. ‘‘एवढ्या पहाटे कोण हाक देत आहे, आजोबा’’ राघवच्या चेहर्‍यावर भला मोठा प्रश्‍न उभा होता. ‘‘अरे, वासुदेव आला आहे. यालाच तर भेटण्यासाठी म्हणून लवकर उठ म्हणत होतो’’ असं म्हणत आजोबा वाड्याचा दरवाजा उघडण्यास गेले. आजी राघवला म्हणाली. ‘‘राघव, सूपात गहू दान म्हणून घेऊन जा.’’ राघव ते दान घेऊन दारात पळत गेला. वासूदेवाचे रूप पाहून राघवचे भानच हरपले. आजोबा राघवला म्हणाले,‘‘अरे राघव, त्यांना दान वाढ ना केव्हापासून नुसतं बघतोय.’’ राघव एकदम दचकला आणि त्याने वासुदेवाच्या झोळीत सुपातले गहू टाकले. वासुदेव चिपळ्या वाजवत स्वतः भोवती फिरत पुनः गाऊ लागला, ‘‘दान पावलं ऽऽ दान पावलं ऽऽ’’ आजोबा राघवला सांगू लागले. ‘‘राघवं, हे वासुदेव हजार-बाराशे वर्षापूर्वीपासूनच ‘‘कृष्णभक्त म्हणून तो कृष्णाचा वेष घालतो. गावोगाव भिक्षा मागतो आणि त्यावरचं आपलं घर चालवतो. गावातील बातम्या सगळ्यांना सांगतो म्हणजेच तो तुमच्या वर्तमानपत्र, मोबाईलचे काम करतो. तसेच लोकांना कसं वागायचं तेही सांगतो. समाज सुधारण्याचे काम तो करतो’’.

राघव आजोबांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होता. वासूदेवाची टोपी राघवने घालून हातात टाळ, चिपळ्या घेतल्या आणि ‘‘गाव जागवत आली, वासुदेवाची स्वारी’’ असे गाणं म्हणतं नाचू लागला. ते बघून आजोबांना हसू आवरणं कठीण झालं.

अंघोळी, नाष्टा झाल्यावर आजोबा राघवला म्हणाले, ‘‘चल राघव, तुला आपलं शेत दाखवतो.’’ शेतावर जायचे म्हणजे राघवसाठी आनंदी आनंदच असे. आजोबा राघवला शेतात घेऊन आले. मामा सर्जा-राजा या बैलाच्या जोडीला घेऊन शेत नांगरण्याचं काम करत होता. अचानक आलेली राघवची स्वारी पाहून मामाला आश्‍चर्य वाटले. मामा म्हणाला,‘‘आज राघवची स्वारी इकडे कशी?’’ ‘‘अरे मामा, आजोबा मला गावातला दिवस कसा असतो ते समजावून सांगत आहेत.’’ राघव म्हणाला.

मामाने राघवला नांगरणी कशी करायची ते दाखवलं, बुजगावणं दाखवलं, त्याचा उपयोग सांगितला, गोफेला दगड बांधून पिकावरील पक्षी कसे उडवायचे ते शिकवले. पाटाचं पाणी राघवने मामासोबत पिकाला सोडलं. राघव शेतात मनमुराद उड्या मारत होता. दुपारची वेळ झाली. मामी टोपल्यातून सगळ्यांसाठी जेवण घेऊन आली. झाडाच्या सावलीत बसून तिघांनी जेवण केले. झाडाला टांगलेला झोकाही राघव भरपूर खेळला.

जेवण, खेळून झाल्यावर आजोबा, राघव घरी आले. ओसरीत खाटेवर दोघेजणं बसले होते. तेव्हा आजोबा राघवला समजून सांगत होते. ‘‘हा मामा, शेतकरी आहे. दिवसभर आपल्यासाठी शेतात काम करून धान्य पिकवतो.’’

‘‘दार उघडं बये दार उघड!’’ जसा आवाज दारातून आला. कोण आलं? पाहण्यासाठी राघव दाराकडे पळत गेला. दार उघडतो, तो समोर, वेगवेगळ्या चिंध्या एकत्र करून घातलेला झगा, पायात तांब्याचं कडं, डोक्यावर वाढलेले केस, कपाळावर कुंकू, खांद्यावर चाबूक असा माणूस सोबत बाई होती. तिच्या डोक्यावर देवीचा फिरता देव्हारा होता. आजोबांनी त्या बाईला पैसे ‘दान’ म्हणून दिले. त्या माणसाने अंगावर चाबकाने फटके मारून घेतले. राघवने दचकून आजोबांना विचारले,‘‘हे कोण?’’ आजोबा सांगू लागले, ‘‘हे पोतराज, मरीआई देवीचे उपासक. यांनाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. चाबकाने असे अंगावर मारून घेत, डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन हे कडकलक्ष्मीचे भक्त गावात भिक्षा मागतात.’’  राघव त्या पाठमोर्‍या जाणार्‍या पोतराजाकडे बघत हे ऐकत होता. ‘‘पण हे असं चाबकाने स्वतःलाच मारून घेणं भयानक वाटतं’’ तो हळूच पुटपुटला. ‘‘हे मात्र खरं आहे.’’ आजोबा हसत म्हणाले. आजोबा व राघवं पुनः ओसरीतील खाटेवर जाऊन पहुडले.

एव्हाना ऊन उतरायला लागलं. तेवढ्यात वाड्यासमोर कसलीतरी गर्दी जमली. गर्दीचा आवाज येऊ लागला. काय गडबड आहे हे बघण्यासाठी राघव उड्या मारत वाड्याच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. तर डोंबार्‍याने आपला खेळ सुरू केला होता. सगळी आजूबाजूची लोकं, लहान मुलं डोंबार्‍याचा खेळ पाहण्यास जमली. खेळ संपत आल्यावर डोंबारी एक रिकामं भांड घेऊन गर्दी समोर येत होता. त्यात लोकांनी त्याला सुट्टे पैसे दिले. डोंबार्‍याचा खेळ संपल्यावर बहुरुपी आला. तो पोलिसाचा वेश घेऊन आला होता. त्यांनी मुलांना भरपूर हसवले, ते त्याच्या गंमतीदार करमतींनी. राघवला डोंबार्‍याचा खेळ, बहुरुपीच्या गंमतीदार करामती खूप आवडल्या. ‘‘राघव, पहाटेपासून काम करणार्‍या या खेड्यातील लोकांना हेच करमणूकीचे  साधन आहे. त्यामुळेच इथल्या लोकांना, मुलांना मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेमची गरजही भासत नाही.’’ त्यावर राघव म्हणाला,‘‘आजोबा, खरंच आजचा दिवस एकदम धम्माल होता. मलाही आज मोबाईल, व्हिडिओ गेमची खरचं आठवणचं झाली नाही.’’

बघता बघता दिवस मावळलाही होता. रात्रीचे जेवण झाल्यावर आजोबा, राघव ओसरीत खाटेवर बसले होते. राघव आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडला होता. थंडगार वार्‍याची झुळूक, शेजारच्या देवळातून टाळ मृदुंगाचा आवाज सगळीकडे पसरवत होता. ‘‘विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल’’ असा भजनाचा आवाजही येत होता. खाटेवर झोपून आकाशातल्या तार्‍यांकडे बघणारा राघव म्हणाला, ‘‘आता कीर्तन का? आजोबा?’’ ‘‘दिवसभर काबाड कष्ट करून थकलेले  जीव रात्री देवळात जातात, देवाचे आभारही मानतात, एवढा चांगला दिवस दिल्याबद्दल. देवाबद्दल ओढ, आस्था हा कीर्तनकारबुवा लोकांच्यामनातं निर्माण करतात.’’ या खेड्यातील दिवसाची सुरुवात वासुदेव देवाच्या नावाने गाव जागवतं करतो, तर रात्री कीर्तनकार पुनः लोकांना देवाच्या चरणी नेऊन ठेवतो. हे आता राघवच्या लक्षात आले होते. आजोबा राघवला म्हणाले, ‘‘चल जायचे का देवळात कीर्तनाला?’’ पण राघव कधीचाच झोपला होता, हे आजोबांना नंतर कळले.

- शुभांजली शिरसाट