श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली होत असे. मात्र तरीही आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी भीमरावांनाही प्राथमिक शाळेत घातले. त्या काळी समाजात मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता पाळली जात असे. बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसे. त्यांच्यासोबत रोटी-बेटी व्यवहार करत नसे. इतकेच काय तर सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा त्यांना अधिकार नव्हता.

हाल-अपेष्टा सहन करत विविध ठिकाणच्या विविध शाळा व महाविद्यालयांतून भीमरावांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना अस्पृश्य म्हणून हीन वागणूक दिली गेली. सुमारास बडोदा संस्थानाचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथे कोलम्बिया विद्यापीठात एम.ए., तसेच डॉक्टरेट मिळवली. अमेरिकेत असताना पाठ्यक्रमाव्यतिरिक्त इतर विषयांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यासाठी दिवसातील 18-18 तास ते अभ्यास करत.

भारतात आल्यावर ते बडोदा संस्थानात नोकरी करू लागले. येथेही पुन्हा त्यांना अस्पृश्यतेचे अनुभव येऊ लागले. त्यांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्यांच्या हाताखालचे सेवक कागदपत्रे त्यांच्या दिशेने फेकत असत. ‘‘अशाप्रकारे माझ्यासारख्या उच्चशिक्षिताची ही अवस्था असेल, तर गरीब, अज्ञानी लोकांचे काय हाल होत असतील?’’, असा विचार करून या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला.

याच काळात कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक राजर्षी शाहू महाराजांशी त्यांचा संपर्क आला. छत्रपती शाहू महाराजही अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत होते. त्यांनी असेच कार्य करण्यासाठी बाबासाहेबांना प्रेरणा दिली व बहुजन समाजासही ‘‘हाच तुमचा नेता आहे’’, हे सांगितले.

बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या कार्यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह फार महत्त्वाचा आहे. सर्व पाणवठे सर्वांसाठी खुले व्हावेत ही भूमिका मांडून बाबासाहेब 20 मार्च 1927 रोजी आपल्या अनुयायांसह चवदार तळ्यावर गेले व तेथील पाणी प्यायले. या वेळी तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांना व त्यांच्या अनुयायांना मारहाण केली. याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांसह 25 डिसेंबरपासून सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहात त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

याच काळात त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. समतेवर आधारित बौद्ध धर्म त्यांना मनापासून भावला. कायद्याने अस्पृश्यता निवारण झाले असले तरी प्रत्यक्ष समाजातून अस्पृश्यता गेलेली नव्हती आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसर्‍याच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह धर्मपरिवर्तन करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

अस्पृश्य म्हणून वाळीत टाकले असताना आणि अतिशय दुःख वाट्याला आले असतानाही दुःखी न होता त्या ऐवजी शिक्षणाची कास धरून स्वतःसह स्वतःच्या बांधवांचा उद्धार त्यांनी केला आणि दुसरीकडे स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री होऊन ही त्या सुखात आपल्या समाजबांधवांना न विसरता त्यांचा विचार करत राहिले, त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करत राहिले. त्यांना संस्कृत शिकण्यास शाळेने परवानगी दिली नाही. पण म्हणून संस्कृत भाषेचा तिरस्कार त्यांनी कधी केला नाही. त्या उलट ते ती भाषा स्वतः शिकले. त्यातील ज्ञान मिळवले व पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी असे आग्रही प्रतिपादन केले. यातूनच त्यांचे स्थितप्रज्ञतत्त्व दिसते.

- कौस्तुभ कानडे

शिक्षक सेवक, डी.ई.एस. सेकंडरी स्कूल