इसवीसनाच्या पहिल्या शतकातील ही गोष्ट. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्राच्या भागात सातकर्णी घराण्याचे राज्य होते. सातकर्णी राजाला संस्कृत बोलता येत नव्हते. त्याची राणी मात्र उत्तम संस्कृत बोलत असे. एकदा काय झालं... तो आपल्या राणीसह तळ्याकाठी विहार करायला गेला होता. बरोबर काही सेवक, सैनिक आणि काही सखेसोबती होते. थट्टा मस्करी चालू होती. राजाने गंमतीने आपल्या राणीच्या अंगावर पाणी उडवले. तेव्हा त्याची राणी त्याला संस्कृतमध्ये म्हणाली, मोदक! मोदक! अर्थात मा-उदक म्हणजे नको! पाणी नको! याला बिचार्‍याला वाटले तिला मोदक खावेसे वाटत आहेत. त्याने लगेच सेवकाला आज्ञा केली, राणीसाहेबांसाठी मोदक करून आणा!

‘मोदकाची’ फोड चुकल्याने, त्याची विद्याविभूषित राणी त्याला हसली! चार लोकात संस्कृत न आल्याने त्याची फजिती झाली होती. राजाला फार वाईट वाटले. त्याने लवकरात लवकर संस्कृत शिकायचा निश्चय केला.

राजाने आपल्या राजकवींना बोलावून विचारले - कमीत कमी किती दिवसात मला संस्कृत शिकवणार? गुणाढ्य म्हणाला, “बारा वर्ष तरी लागतील.” सर्ववर्मा म्हणाला,  “सहा महिन्यात शिकवीन!” गुणाढ्यने सर्ववर्माशी पैज लावली, तू जर सहा महिन्यात राजाला संस्कृत शिकवून दाखवलंस तर मी संस्कृतच काय, प्राकृतमधून सुद्धा लिहिणे सोडून देईन!

सर्ववर्मा मनातून घाबरला. सहा महिन्यात राजाला संस्कृत कसे शिकवायचे या विवंचनेत त्याला झोप येईना. त्याच्या बायकोने त्याला कार्तिकेयाची प्रार्थना करण्यास सुचवले. त्याप्रमाणे सर्ववर्माने कार्तिकेयची प्रार्थना केली. कार्तिकेयने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर सर्ववर्मा शांत चित्ताने कामाला लागला.

सर्ववर्माने 6 महिन्यात राजाला संस्कृत शिकवले. सातकर्णी राजा उत्तम संस्कृत बोलू लागला. सर्वांत आधी जिच्यामुळे तो संस्कृत शिकला, त्या राणीचे सातकर्णी राजाने आभार मानले!

इकडे पैज हरल्याने गुणाढ्य अतिशय खिन्न झाला. संस्कृत सोडलं. प्राकृत सोडलं. गाव सोडलं. अरण्यात गेला. विंध्यारण्यात भटकत असताना, त्याला कणभूती नावाचा एक पिशाच्च भेटला. दोघांची मैत्री झाली. एकदा कणभूती त्याला म्हणाला, “तू विद्वान कवी आहेस, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट तू लक्ष देऊन ऐक. ती गोष्ट लिही आणि तिचा प्रसार कर!”

“पण मी तर संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषांतून लिहिणार नाही असा पण केलाय!,” गुणाढ्य म्हणाला.

कणभूती म्हणाला, “मग तू पैशाची भाषेतून या कथा लिही!” त्यावर गुणाढ्य पैशाची भाषा शिकला. मग कणभूतीने गुणाढ्यला बोलावून घेतले आणि त्याला एकाहून एक सरस अशा सात सुरस कथा ऐकवल्या. या कथा ऐकून गुणाढ्य वेडाच झाला! पुढची सात वर्ष गुणाढ्यने या कथा पैशाची भाषेत लिहून काढल्या.

कथा लिहून झाल्यावर त्याचं मोठ्ठ बाड घेऊन गुणाढ्य सातकर्णी राजाकडे आला. सातकर्णीने पैशाची सारख्या हलक्या भाषेतली कथा फेकून देण्यास सांगितले. गुणाढ्य हताश होऊन अरण्यात परतला. अतिशय दु:खी अंत:करणाने तो आपल्या कथेचं एक-एक पान वाचून जाळू लागला. त्याचे अवीट कथाकथन ऐकायला अरण्यातील पशु-पक्षी जमले. तहान भूक हरपून ते प्राणी गुणाढ्यची कथा ऐकण्यात रमून गेले.

ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. राजाला नवल वाटले. तो अरण्यात गेला. गोष्ट ऐकता-ऐकता तो सुद्धा मंत्रमुग्ध झाला. पश्चाताप पावला. आता पावेतो सहा कथा जळून खाक झाल्या होत्या. एक कथा तेवढी उरली होती, ती त्याने गुणाढ्य कडून घेतली. या कथेचे नाव होते- बृहतकथा! या कथांच्या प्रेमात पडलेल्या सातकर्णी राजाने, या ग्रंथाला लेखक परिचय लिहिला.

बृहत्कथेमध्ये एक लाख श्लोक असून ती कथा जगातील सर्वांत मोठ्या व उत्कृष्ट कथांपैकी एक आहे. या एका भागात - विद्याधर राजांच्या, पशुपक्ष्यांच्या, परंपरेने चालत आलेल्या भुताखेताच्या, जादूगारांच्या, राक्षसांच्या, समुद्रसफरीच्या, अज्ञात द्वीपांच्या अद्भुत रसाने परिपूर्ण भरलेल्या कथा आहेत. आपल्या ओळखीच्या अनेक कथा यात आहेत, जसे - विक्रम वेताळाच्या कथा, सिंहासन बत्तीशीच्या कथा, पंचतंत्रच्या कथा आणि शिवाय खूपच्या खूप गोष्टीच गोष्टी!

                                                             - दीपाली पाटवदकर