झुक झुक झुक झुक आगीनगाडी

धुरांच्या रेषा हवेत काढी

पळती झाडे पाहू या...

मामाच्या गावाला जाऊ या...

जाऊ या.. मामाच्या गावाला जाऊ या...

हे गाणे ऐकताच मला माझ्या मामाच्या गावाची आठवण येेते. माझ्या मामाच्या गावाचे नाव ‘शेवगाव’ आहे. दर वर्षी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला रेल्वेतून जाते. रेल्वेत बसल्यावर बाहेर पाहताना जणू काही बाहेरची माणसे व झाडे पळतात असे वाटते, पण प्रत्यक्षात रेल्वे पळत असते. त्यामुळे मला खूप गंमत वाटते.

मामाच्या गावाला पोहोचल्यावर सकाळी पहिल्यांदा आम्ही नदीवर जातो, कारण शहरात तर नदी पाहायलासुद्धा मिळत नाही. त्यामुळे मी मामीबरोबर धावतच नदीवर जाते. नदीवर आंघोळ करते. तासन्तास पाण्याशी खेळत बसते. मामीचे धुणे होईपर्यंत आम्ही वाळूत शंख, शिंपले गोळा करतो. मग ते शिंपले घेऊन आम्ही घरी येतो. घरी येताना व नदीवर जाताना वाटेत चिंचा, आवळे, बोरं यांची झाडे आहेत. मग आम्ही चिंचा, आवळे, बोरं गोळा करतच घरी येतो.

घरी आल्यावर अंगणातच झाडाच्या सावलीत बसतो. झाडाची गार गार सावली पंख्याच्या हवेपेक्षा कितीतरी छान वाटते. मग आजी चुलीवरच्या गरमगरम भाकर्‍या, पिठलं, ठेचा आणि कांदा असे जेवण वाढते. झाडाखाली गार हवेत पिठलं, भाकरी खाताना एवढी मजा येते, की त्यापुढे शहरातील हॉटेलमधील जेवणसुद्धा फिके वाटते. आजी, आजोबा, मामा, मामी, गणूमामा आणि मी; आम्ही सर्व जण अंगणातच जेवण करून झाडाखालीच थोडा वेळ खेळतो आणि आराम करतो.

उन्हाळ्यात तर अंगणातल्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले असतात. म्हणूनच उन्हाळ्यात तर काही वेगळीच मजा असते.

रात्री आम्ही सर्व जण अंगणातच झोपतो. रात्री झोपताना माझे लक्ष निरभ्र आकाशाकडे जाते. आकाशातल्या चांदण्यांकडे पाहताच असे वाटते की, त्या तोडून त्यांची सुंदर अशी माळ तयार करावी. चांदण्यांकडे पाहतापाहता झाडामागून चंद्र हळूच डोकावताना दिसतो. त्या क्षणी मला,

‘चांदोमामा चांदोमामा भागलास का

निंबोणीच्या झाडामागे लपलास का

निंबोणीचं झाड करवंदी

मामाचा वाडा चिरेबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा

तूप-रोटी खाऊन जा

तुपात पडली माशी

चांदोमामा राहिला उपाशी’

या गाण्याची आठवण होते. असे वाटते, जणू तो आपल्याशी लपंडाव खेळत आहे. असे सर्व चांदण्या, चंद्र असलेले अवकाश जणू काही मखमलीची चादरच अंगावर घेतली आहे, असे वाटते. या आकाशाकडे बघताबघता कधी झोप लागते ते कळतच नाही.

अशा पद्धतीने मामाच्या गावाचे दिवस कसे निघून जातात ते कळतसुद्धा नाही. मामा आम्हाला ड्रेस घेतो. तेथील नद्या, डोंगर, झाडे अशा सर्व निसर्गातून निघावेसेच वाटत नाही. गावासारखी मजा शहरात अनुभवायला मिळत नाही. एक उन्हाळ्याची सुट्टी संपताच आम्ही दुसर्‍या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतो. आम्ही आमच्या घरी आल्यानंतर त्या आठवणी आठवल्या की, पुन्हा कधी मामाच्या गावाला जाईन असे होते आणि पुन्हा ते गाणे आठवत,

‘पळती झाडे पाहू या

मामाच्या गावाला जाऊ या...’

-अबोली मोहन जठार

इ.६ वी