हिरवं हृदय

दिंनाक: 10 Apr 2019 18:03:41

 


परवा नातीला भेटायला गेले.  गेल्याबरोबर  आज्जी ऽऽऽ म्हणून गळ्यात पडणारी नात टीव्हीवर नजर लावून बसलेली! मी माझ्या लेकीला विचारलं आज काय झालं परीला? इतकी कधी गुंतून पडत नाही टीव्हीवरच्या कार्यक्रमात! नेहा, नको बाई सवय लावू तिला टीव्ही बघण्याची...  नेहा माझ्यासाठी चहा ठेवता ठेवता म्हणाली, तू परीजवळच बस आणि बघ तरी ती काय पाहतेय! तुझ्या संस्कारातच मीसुद्धा वाढलेय... जा बैस परीजवळ. मी तिथंच आणते चहा...

आम्हा मायलेकींच्या बोलण्यामुळं क्षणभरच परीनं माझ्याकडं पाहिलं, पटकन ती उठून माझ्याजवळ आली आणि माझा हात धरून टीव्हीसमोर मला घेऊन गेली... एवढीशी फक्त साडेचार वर्षांची माझी नात मला सांगत होती बघ... ‘मोआना... मोआना’.

दोस्तांनो, मीसुद्धा बघतच राहिले... ती धिटुकली मोआना, निळ्याशार समुद्राच्या लाटा, किनार्‍यावरची हिरवाई, नारळाची झाडं. प्रशांत महासागरातल्या चिमुकल्या बेटांपैकी मोनुनुई नावाचं पॉलिनेशियन बेट, तिथली तुरुतुरु चालणारी माणसं, एक राजा आणि एक राणी, त्यांची लाडकी राजकन्या मोआना आणि तिच्या आज्जीनं सांगितलेली कहाणी! इतकी सुंदर रोमांचकारी डिस्नीची अ‍ॅनिमेशन फिल्म पाहण्यात मीसुद्धा गुंतून गेले.

पॉलिनेशियन लोककथेवर आधारित असलेल्या त्या चित्रपटात ‘ते फिती’ नावाच्या वनराणीची गोष्ट होती. त्या वनराणीचं पाचूसारखं दिसणारं हिरवंगार हृदय, माओवी नावाच्या बलदंड माणसानं पळवलं आणि हळूहळू बेटावरची हिरवाई सुकू लागते, नारळ काळे पडतात, बेटावरची जीवसृष्टी धोक्यात येते. म्हणून राजकन्या मोआनाची आजी तिच्यावर कामगिरी सोपवते की, तू माओवीकडून वनराणीचं हृदय मिळव आणि ते पुन्हा तिच्या शरीरात बसव... आणि मग मोआना निघते मोहिमेवर... तिची ती मोहीम म्हणजे संघर्ष, धाडस आणि शौर्याची परिपूर्ण अशी रोमांचकारी कहाणी. मोआना वनराणीला हृदय मिळवून देते आणि अवघी सृष्टी पुन्हा हिरवाईनं बहरून येते...

दोस्तांनो, तुमच्यातील काही जणांनी ही फिल्म पाहिलीही असेल... काय विचार केला तुम्ही? तुमच्यावरही एक जबाबदारी आहे याची जाणीव झाली का तुम्हाला? आपल्यालाही आपल्या भोवतालची हिरवाई जपायची आहे, वनराई जपायची आहे, वनराई वाचवायची आहे.

नुकताच होळीचा सण आपण साजरा केला. त्यामागचा उद्देश जाणून घेतला तर पर्यावरणाचं रक्षण आपण करू शकतो. झाडं तोडून होळी साजरी करायची नाही तर अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करून कचर्‍याची होळी करायची. त्या होळीत जाळून टाकायचे दुष्ट विचार. रंग खेळायचा मैत्रीचा, एकतेचा, देशभक्तीचा आणि पर्यावरण रक्षणाचा!

पर्यावरणपूर्वक होळी साजरी करण्यासाठी आवाहन केलं जातं, तेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद देणं हे आपलं कर्तव्य आहे. नैसर्गिक रंग खेळून पाणीबचत आपण करू शकतो. दोस्तांनो, तुमच्यातील काही मित्र पाणीबचतीसाठी चांगलं काम करत आहेत. घरातील मोठी माणसं नळाचं पाणी वाया घालवत असतील तर आठवण करून द्यायची पाणीबचतीची. बागेत किंवा इतर ठिकाणी नळाचं पाणी वाया जात असेल तर पुढं होऊन नळ बंद करायला हवेत. सांडपाण्यावर झाडं वाढवायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक वाढदिवसाला पर्यावरणासाठी एकेक संकल्प करायला हवा. प्लास्टिकचा कमीत कमी वापर, विजेची बचत, सौरऊर्जाचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो यासाठी सर्वांनीच विचार करायला हवा. म्हणजे पृथ्वीमातेच्या ऋणातून आपण मुक्त होऊ.

दोस्तांनो, आपण आपल्या आईसाठी किती संवेदनशील असतो, अगदी तसंच या पृथ्वीमातेसाठीही आपण संवेदनशील असायला हवं. ‘आई थोर तुझे उपकार’ असं आपण आईविषयी म्हणतो, अगदी तसेच पृथ्वीमातेचे आपल्यावर उपकार आहेत. तिच्या ऋणातून मुक्त व्हायचं तर हिरवाई, वनराई वाचवायची.  प्रदूषणरूपी राक्षसापासून वसुंधरेच्या हिरव्या हृदयाचं रक्षण करायचं.

मग बघा तुम्हीसुद्धा आनंदानं गात राहाल...

किलबिल किलबिल पक्षी बोलती

झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती

फूलपाखरे वर भिरभिरती, स्वप्नी आले काही

स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई...

- डॉ. प्रतिमा विश्वास