ज्याचं काम त्यानेच करावं......

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.......

जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोता खाय........

It's not my cup of tea.........

ये मेरे बस की बात नहीं ...........

"याला काय म्हणतात माहिती आहे?", स्नेहलताईनं विचारलं.

“म्हणी किंवा वाक्प्रचार.”, केतकी लगेच उत्तरली. “ते प्रत्येक भाषेत असतात.”

“म्हणजे काय?”, छोट्या वेदाला प्रश्न पडला.

“अगं, म्हणजे एखाद्या प्रसंगावरून किंवा घडलेल्या गोष्टीचा संदर्भ घेऊन, काही विशेष विचार इतरांना द्यायचा असेल तर अशी विशिष्ट वाक्यरचना वापरली जाते. त्याला 'म्हण' असे म्हणतात. म्हणजे काही एक म्हणणं...", निखिलने समजावयाचा प्रयत्न केला.

“नाही कळलं काही.”, वेदा अधिकच गोंधळून म्हणाली.

 

“एक गंमत सांगते तुला... तुला नाचता येतं ना? तू शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतेस. हो किनई?”, सायली म्हणाली.

“हो... मला खूप मज्जा येते नाच शिकायला, नाचून दाखवायला...”, वेदा.

“पण त्या सानाला काही केल्या जमतच नाही नाचायला. पण ती ते मान्य नाही करत. न नाचण्याची काहीतरी वेगळीच कारणं सांगते."

“अशा वेळी तिला म्हणायचं, “नाचता येईना अन् म्हणे अंगण वाकडं.”

“म्हणजे कळलं का काय ते? स्वत:ला नाचता येत नाही ते लपवण्यासाठी, अंगण (पायाखालची जमीन) वाकडी आहे, म्हणून मला नाचता येत नाही असं कारण द्यायचं. हे बरोबर आहे का? अशा वेळी म्हणतात,

नाचता येईना अन् म्हणे अंगण वाकडं. याला म्हणतात "म्हण".” सायलीनं पटवून दिलं.

“त्यामुळे कोणाला एखादं काम जमत नसलं आणि ते मान्य न करता तो दुसरीच कारणं देत राहिला तर असं म्हणायचं. यालाच म्हणतात, या गोष्टीवरून ही म्हण पडली. म्हणजेच असं म्हणायची पद्धत पडली.”, स्नेहलताई.

“आपण आज एक खेळ खेळू या. मी जे सांगीन, त्यावरून कोणती म्हण पडली हे तुम्ही सांगायचं. चालेल?”

स्नेहलताईनं आज नवीनच खेळ शोधून काढला.

“एखाद्याला एखाद्या गोष्टीतलं फार काही कळत नाही, तरी पण तो बिनधास्त सगळं माहीत असल्यासारखं फारच बोलत राहतो.”

"उथळ पाण्याला खळखळाट फार.", केतकी.

“बरोब्बर! आता हे बघा.... मागचा पुढचा काही विचार न करता, कुठेही काहीही बोलायचं.......”

"उचलली जीभ, लावली टाळ्याला", साहिल.

“तिथे मी बसणार की तू बसणार....असं दोघं भांडत बसले आणि शेवटी तिसराच येऊन बसला.”

"दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ.", निखिल.

“स्नेहलताई, आता मी एक विचारू?”, प्रज्ञा म्हणाली. 

“विचार की!” ताई म्हणाली.

“एका समारंभात पाहुण्यांचं स्वागत करायला फुलांचा गुच्छ द्यायचा होता. ज्याला तो आणायला सांगितला होता, त्यानं तो सगळा समारंभ संपून गेल्यावर आणला.

“वरातीमागून घोडं.", नेहा.

छोट्या वेदाला खुद्कन हसू आलं.

“कधी कधी एखाद्या माणसाच्या वागण्याची कुठेच तक्रार करता येत नाही, कारण तो आपल्या अगदी जवळचा नातेवाईक असतो.”

"आपलेच दात, आपलेच ओठ.", सायली.

“एखादे वेळेस आपली इच्छा नसताना, नको त्या माणसाबरोबर गोडीनं बोलावं लागतं, त्याची मर्जी राखावी लागते.”

"अडला हरी गाढवाचे पाय धरी.", निखिल

“एखाद्याचा स्वभावच असा धडाडीचा असतो, की कोणत्याही संकटांना, अडीअडचणींना न घाबरता आपलं उद्दीष्ट साध्य करतो.”

"लाथ मारीन तिथं पाणी काढीन.", साना

“कितीही सांगितलं तरी त्याच्या वागण्यात काही फरक पडत नाही. काही दिवस सुधारल्यासारखा वागतो, पण पुन्हा त्याच चुका करतो.”

"मला माहिती आहे! कितीही दिवस नळीत घातलं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.", वेदानं पटकन सांगितलं.

“तुझ्या बाबतीत असं होतं वाटतं! नाही म्हणजे ही म्हण तुला पटकन आठवली म्हणून म्हणतो.”, निखिलने वेदाला चिडवलं. सगळे त्याच्या हसण्यात सामील झाले.

 

“एखादी गोष्ट इकडे तिकडे सगळीकडे खूप खूप शोधली, पण सापडली शेवटी जवळंच.”

"काखेत कळसा अन् गावाला वळसा.", केतकी.

“वा.. वा... तुम्हाला बऱ्याच म्हणी माहिती आहेत, असं दिसतंय.”, स्नेहलताईनं सगळ्यांना शाबासकी दिली.

“आता मात्र एक लक्षात ठेवा...”, स्नेहलताई सांगू लागली.

"आता परीक्षांचे दिवस आले आहेत. तेव्हा 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून चालणार नाही. तर जोरात अभ्यासाला लागा. अभ्यास मागे राहिला तर 'रात्र थोडी सोंगं फार' असं म्हणायची वेळ येईल. अभ्यास आणि वेळ यांचं गणित जमवताना 'तारेवरची कसरत करावी लागेल’. नीट वेळापत्रक आखा. तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुमचे पालक 'पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात’. तुम्ही 'अटकेपार झेंडा रोवला' तर त्यांना 'आभाळ ठेंगणं होईल'.

वर्षभर तुम्ही माझं ऐकलंत. आता त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. नाहीतर पुन्हा आपले 'पहिले पाढे पंचावन्न’. दुसऱ्याच्या चुका जास्त लक्षात ठेऊ नका. 'झालं गेलं गंगेला मिळालं' असं म्हणून विसरून जा.

 

"जुने जाऊ द्या मरणा लागुनि । जाळून किंवा पुरून टाका..." आता येणाया फाल्गुन पौर्णिमेला, हुताशनी पौर्णिमेला, म्हणजेच होळीला सर्व वाईट गोष्टींचा नाश करा. चांगल्याची आस धरा. पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडत्या विषयांत खूप खूप अभ्यास करून मोठे व्हा. तुमच्या गरजा मर्यादित ठेवा. म्हणजे, अमुक एक गोष्ट मिळाली नाही म्हणून नैराश्य येणार नाही.

आता मीसुद्धा माझ्या आवडत्या विषयात पीएच्.डी. करण्यासाठी इथून लांब जाणार आहे. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल. पण आपण संपर्कात राहू. बाय...”

“बाय बाय स्नेहलताई... आणि तुलाही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा...!!!”

- मधुवंती पेठे