मी नारी

दिंनाक: 08 Mar 2019 12:11:45


 
मी नारी मी शक्ती 
मी करुणा मी मुक्ती! 
मी नीती मी प्रीती 
मी भक्ती मी कीर्ती! 
मी सरिता मी सिंधू 
मी निर्झर मी बिंदू! 
मी माया मीच दया 
तरु तळी ची मी छाया! 
मी कालिका मीच फूल 
मी परिमल रानभूल!
मीच बीज मी अंकुर 
मीच लता मीच बहर! 
मीच वीज मी दाहक 
मी ठिणगी मी पावक! 
मीच गगन मी चांदणी 
चंद्रकोर नीलांगणी !
मी पृथ्वी मीच क्षमा 
मीच उमा मीच रमा!
मी विद्या मी लक्ष्मी 
अवकाशी मी सु क्ष्मी! 
मी वादळ मी वारा 
मी वर्षा मी धारा! 
मी संध्या मीच निशा 
उज्ज्वल शी मीच उषा!
मी समई मीच वात 
मी तेजस प्राणज्योत! 
मी कविता मी लकेर 
मीच गीत मीच सुर!
मीच सृजन मी प्रतिभा 
मी निर्मिती मी आभा!
मी चतुरा मी विदुषी 
संवादिनी मधूभाषी! 
मी वृत्ती आसक्ती 
मी तृष्णा मी तृप्ती! 
मी सबला मी मृदुला 
मी सरला मी सुफ ला! 
मी स्वामिनी मी मोहिनी 
मी साजणी मीच रमणी! 
मी शाश्वत मी प्रेरक 
मी व्यापक मी तारक ! 
मी वनिता मी दुहिता 
मी कांता मी माता! 
मीच सत्य मी कृतार्थ 
मी सुंदर जीवनार्थ!!!
 
- चारुता शरद प्रभुदेसाई