धृवची शिकवणी

दिंनाक: 08 Mar 2019 18:48:06


धृव शाळेतून आला, त्यानं दफ्तर सोफ्यावर टाकलं आणि धूम ठोकली. धृव खेळून आला, त्यानं शूज काढून टाकले आणि तो पळाला. धृव जेवून उठला, ताट तिथंच सोडून निघून गेला. धृवने हे केलं नाही. धृवने ते केलं नाही. एकूणच काय! तर धृव घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नाही, ही तायडीची नेहमीची तक्रार. तायडी मात्र आईला सगळ्या कामात मदत करणारी.  आईनं धृवला अनेकदा सांगितलं की, घरातल्या कामात थोडीतरी मदत कर. आजीनं सांगून पाहिलं, निदान स्वतःची तरी कामं नीट करत जा. पण धृव वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याचं म्हणणं होतं की, घरातली कामं ही स्त्रियांनी करायची असतात. स्वयंपाक, झाडलोट, आवराआवर ही सगळी कामं पुरुषांनी नसतात करायची. बाबांनी त्याला सांगितलं, “अरे घरची कामं करण्यात पण मजा असते.” त्यावर धृव म्हणला, “ही क्षुल्लक कामं करण्यात कशाची आलेय मजा? ही तर कुणीही करू शकतं.” धृवच्या मनात स्त्री -पुरुषांच्या कामांसंबंधी असा भेदभाव कुठून आला? हा प्रश्न आई, बाबा आणि आजीलाही सतावत होता. त्याला ह्या विचारांतून बाहेर कसं काढायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

धृवला घरातल्या कामांचं तसंच स्त्रियांच्या श्रमांचं महत्व पटवून देण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल, असा विचार आई, बाबा आणि आजी करू लागले. पण त्यांना मार्ग काही मिळत नव्हता. असेच काही दिवस गेले. धृवमध्ये कसलाच बदल होत नव्हता. त्याची बेफिकिरी कमी होत नव्हती. तसं घरचं वातावरण मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष असा भेदभाव करणारं नव्हतं. जितके लाड धृवचे होत होते तितकेच तायडीचे पण होत होते. बाबा ऑफिसला जात तर आई घर सांभाळत होती. धृवला कधीच कुठली गोष्ट ज्या- त्या जागेवर सापडली नाही असं झालं नाही. पण, आपण भिरकावून दिलेल्या वस्तू नंतर गरजेच्या वेळी जागच्या जागी कशा काय मिळतात? असा प्रश्न धृवला कधीच पडला नाही.

तो दिवस होता श्री. गजानन महाराजांचा प्रकटदिन. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धृवच्या घरी मोठा उत्सव होता. महाराजांच्या पादुका मखरात विराजमान झाल्या होत्या. मखराभोवतीची मोहक सजावट मन प्रसन्न करत होती. दारासमोरच्या  ताईने काढलेल्या रेखीव रांगोळीपाशी येणारा- जाणारा प्रत्येकजण थबकत होता.

धृवचे काका, मावशी,आत्या, आजी आणि सगळे चुलत-मावस ताई-दादा या उत्सवाच्या निमित्ताने घरी आले होते. त्यांच्या येण्याने घर भरून गेलं होतं. दरवर्षी या उत्सवाला सगळे नातेवाईक येत. घरात सर्वत्र एक चैतन्य भरून राहात असे. बरीच माणसं येणार म्हणजे साहजिकच कामही प्रचंड होतं. इतर वेळी एकट्या आईवर पडणाऱ्या कामाची आज मात्र नकळत विभागणी झाली होती. आजी दरवाज्यात बसून घरी येणाऱ्या पाहुण्यांचं अगदी तोंडभरून स्वागत करत होती. आईने अगदी पहाटेपासूनच स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. आईबरोबर मावशी आणि काकुनेही स्वयंपाकात लक्ष घातलं होतं. सगळ्यांनी मिळून पुरी-भाजी, बासुंदी, भजी आणि पापड असा फक्कड बेत केला होता. ताईने दर्शनाला आलेल्या भक्तांना प्रसाद वाटण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. बाबा पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था पहाण्यात गर्क होते. “अरे धृवा, जरा तू पण मदत कर रे बाबांना व्यवस्था पहायला. काकांना पानं वाढायला  मदत कर जा जरा.” भाताचं भलं मोठं पातेलं घेऊन जाता–जाता मावशी बोलली. त्यावर धृव काही बोलणार तितक्यात ताई म्हणाली, “ छे गं मावशी, काहीतरीच काय? आमचा धृव नाही हो करत असली बायकांची कामं.” मावशीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तशीच पुढे गेली. धृव मात्र हे ऐकून खट्टू झाला. “दुष्टच आहे तायडी. तिला आत्ता सगळ्यांसमोर असं बोलायची गरज होती का?”

सोहळा एकदम छान पार पडला. सगळ्यांना समाधान वाटले. पण धृवला मात्र आज वेगळंच वाटत होतं. त्याला आज खूप एकटं एकटं पडल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळी घरातले सगळे गप्पा मारत बसले होते, तेंव्हा धृव सगळ्यांना जाब विचारतच बोलू लागला. “आज तुम्ही सगळे माझ्याशी असे का वागलात? कुणीही माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी कितीवेळा म्हणालो की मदत करू का, पण कुणीच माझी मदत घेतली नाही. मला तुमचा सगळ्यांचा खूप राग आलाय.” त्यावर थोडावेळ शांत राहून आई म्हणाली, “अरे धृव, तू कशी बरं आम्हाला मदत करणार! घरातली कामं तर बायकांची असतात ना. ती कामं तुला नाही जमणार, हे माहित आहे आम्हाला.” त्यावर बाबा म्हणाले, “हे बघ धृव, ज्याची कामं त्यानेच करावीत. तू नको ह्यात लक्ष घालूस.” हे ऐकून धृव चिडला आणि म्हणाला, “ही सगळी कामं मी पण करू शकतो. त्यात काही अवघड नाही.” ह्यावर अगदी हसत आजी म्हणाली, “बाळा, तुझे आई-बाबा बरोबर बोलत आहेत. तू ह्यात लक्ष घालू नकोस. ही कामं तुला नाही येणार.” आता मात्र धृव रागाने लाल झाला आणि त्याने ठणकावून सांगितलं, “उद्या सकाळी मी सगळी कामं करूनच दाखवतो.” ठरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून धृवने कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने झाडलोट केली. पण बराच वेळ काम करूनही कचरा साफ होईना. मग त्याने चहा बनवायचा प्रयत्न केला. तोही फसला. पोहे करायला पोहे भिजवले, तर त्याचा कणके सारखा गोळा झाला. त्याला काहीच जमेना म्हणून तो अगदी रडकुंडीला आला. त्याची ही सगळी अवस्था आई, बाबा, आजी आणि तायडी सोफ्यावर बसून बघत होते. अखेर धृव हॉलमध्ये आला आणि रडू लागला. रडत रडत तो बोलू लागला, “आई, आजी, तायडे... मला माफ करा. मला खरंच नाही जमत हे सगळं. ही कामं फार अवघड आहेत.” धृवने माफी मागितल्यावर आईने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, “बेटा, कुठलंच काम छोटं नसतं. जगात प्रत्येकाच्या कामाचा आदर करावा आपण.” बाबा म्हणाले, “धृव, घरात स्त्रिया जी कामं करतात, ती खरंच कठीण असतात. त्यात खूप श्रम असतात. पण त्या कामाची फारशी कुणी कदर करत नाही. खरंतर पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त काम करतात. नोकरी सांभाळूनही घरातलं सगळं काम त्या करतात. म्हणून आपण निवांतपणे खाऊ-पिऊ शकतो. तायडीचा जन्म झाला आणि तुझ्या आईने नोकरी सोडली. त्यानंतर तू आलास. म्हणून पुन्हा तिने दुसरा जॉब देखील पाहिला नाही. कारण काय? तर तुम्हां दोघांकडे दुर्लक्ष होऊ नये. तुमचं पालन-पोषण नीट करता यावं.” पुढे आजी म्हणाली, “बाळा, तुझा बाबा पण घरातली सगळी कामं करायचा. तुझ्या आईला मदत करायचा. आता त्याला वेळ मिळत नाही म्हणून तो करत नाही इतकंच.”

हे सगळं ऐकून धृवला अजूनच रडू आलं. त्याने सर्वांना वचन दिलं की तोही आता घरात आईला, तायडीला मदत करणार, स्वतःची कामं स्वतः करणार, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणार, आणि लवकरच स्वयंपाक शिकून तो घरातल्या सगळ्यांना खाऊ पण घालणार. धृवच्या ह्या निश्चयाचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. आईने त्याला मिठी मारली. आपलं बाळ आता मोठं झाल्याची जाणीव आईला सुखावून गेली. आता धृवला स्त्रियांच्या श्रमाची आणि कामाची किंमत कळली होती.

मुलांनो असाच आदर आणि प्रेम आपण आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला अगदी दररोज दिlaa तर प्रत्येक दिवस होईल महिला दिन. पटतंय ना?

- प्रियांका शेजाळे