गुरुदेव रवींद्रनाथ यांचा विवाह ९ डिसेंबर १८८३ रोजी भवतारिणीदेवी यांच्याशी  झाला. त्या वेळी रवींद्रनाथ २२ वर्षांचे आणि पत्नी ८ वर्षीय. भवतारिणी हे नाव ठाकुरांकडे आवडले नाही. त्यांनी त्यांना नाव दिले मृणालिनीदेवी. त्यांचा संसार सुखाचा होता. मृणालिनीदेवी उत्तम गृहिणी होत्या आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य, सरबराई त्या मनापासून करत. 
रवींद्रनाथ आणि मृणालिनीदेवी यांना पाच अपत्ये झाली. त्यांची नावे - माधुरीलता, रथींद्रनाथ, रेणुका, मीरा आणि शमिंद्रनाथ. कोलकात्यातील ठाकूरांच्या भल्या मोठ्या वाड्यात खूप माणसे राहत. त्या सर्वांमध्ये मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे अवघड वाटू लागले. म्हणून रवींद्रनाथ पत्नी मुलांसह कोलकाता सोडून शिलाईदह येथे राहावयास गेले. तिथे त्यांची खूप विस्तृत जमीनदारी होती. त्याचा व्यवहार रवींद्रनाथ पाहू लागले. 
शिलाईदह येथील पद्मा नदीतीरी त्यांचे निवासस्थान होते. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था घरीच केली गेली. गणित, संस्कृत, इंग्रजी यासाठी शिक्षक नियुक्त केले आणि बांगला साहित्य शिकवण्याची जबाबदारी खुद्द रवींद्रनाथानी घेतली. मृणालिनीदेवींनी मुलांना गृहकर्माचे संस्कार दिले. दर रविवारी त्यांनी घरातल्या नोकरांना सुट्टी दिली आणि घरकामाची जबाबदारी मोठी कन्या माधुरीलता आणि पुत्र रथींद्र यांच्यावर सोपवली. त्या काळी जमीनदाराच्या घरातील कोणा गृहिणीने असा विचार केल्याचे दुसरे उदाहरण नाही. 
त्यानंतर १९०१ साली रवींद्रनाथ सापरीवर शांतिनिकेतन येथे आले. मुलांचे पुढील शिक्षण आणि त्याच बरोबर खेयापाड्यातील गरीब मुलांचे शिक्षण हा हेतू त्यामागे होता. संस्कृत साहित्यातील ब्रह्मचर्य आश्रम आणि तपोवनचे त्यांना फार आकर्षण होते. त्यानुसार त्यांनी विद्यालय स्थापन केले. विद्यालयाचा खर्च चालवण्यासाठी त्यांनी स्वतः जवळील सर्व पैसे दिले, पुरी येथील घर विकले. तरीही भागेना तेव्हा मृणालिनीदेवींनी त्यांचे दागिने विकले आणि ते पैसे विद्यालयासाठी दिले. परंतु त्यानंतर वर्षभरातच मृणालिनीदेवी आजारी पडल्या आणि २३ नोव्हेंबर १९०२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर दहा महिन्यांनी त्यांची द्वितीय कन्या रेणुका एका आजारात मरण पावली. त्याच वर्षी छोटा शमिंद्र कॉलराच्या साथीत त्यांना सोडून गेला. १९०५ मध्ये पित्याचे छत्र हरपले. एकामागोमाग झालेल्या या आघातांनी रवींद्रनाथांना खूप दुःख दिले. पण विद्यालयाचे कार्य त्यांनी कधी खंडित  होऊ दिले नाही. 
मोठा मुलगा रथींद्रनाथ याला त्यांनी कृषीविज्ञानातील उच्च शिक्षणासाठी जपानला पाठवले. त्यानंतर १९०६ मध्ये रथींद्रनाथ अमेरिकेला गेले. तीन वर्षे तिथे विज्ञानातील शिक्षण घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतात परतले. रवींद्रनाथांनी त्यांना शिलाईदहला पाठवले. तिथे त्यांनी गरीब शेतकऱ्यासाठी आपल्या कृषिशास्त्रातल्या ज्ञानाचा उपयोग केला, त्यांना शेतीतील नवनवीन प्रयोगपद्धती शिकवल्या ज्यामुळे त्यांचे कृषी उत्पन्न वाढले. 
रथींद्रनाथांचा प्रतिमादेवींशी विवाह झाला. प्रतिमादेवी या बालविधवा होत्या. त्यांनी शांतिनिकेतनच्या कामात खूप मदत केली. रवींद्रनाथानी मुलगी मीरा हिचे पती नागेंद्रनाथ यांनाही कृषीविद्या शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवले. अशा प्रकारे मुलगा आणि जावई यांच्याकडूनही गुरुदेवांनी आपल्या जन्मभूमीची सेवाच केली. रथींद्रनाथांनी आपल्या आठवणींमध्ये हे सारे लिहून ठेवले आहे. 
- स्वाती दाढे