अर्णवचे आई–बाबा त्याला घेऊन माझ्याकडे आले होते. पाचवीत होता तो. अगदी गोड मुलगा, शांत बसला होता.  थोडे घाबरट भाव होते चेहऱ्यावर. आत आल्यावर खाली मान घालूनच बसला होता.

“काय झाले अर्णवला?”,  मी विचारले.

“सांग ना अर्णव आणि काय दिवे लावलेत ते? तू काय सांगणार म्हणा. सांगायला तोंड कुठे आहे आता?”, अर्णवच्या आईची मुलुखमैदान एकदम धडधडू लागली.

“हे बघा, जरा नीट, शांतपणे सांगाल का, तुम्ही अर्णवला कशासाठी घेऊन आला आहात?”

“शांत कशी होऊ डॉक्टर मी? अर्णवची  अभ्यासातील ही ही ‘प्रगती’. (प्रगतिपुस्तकातील लाल रेघा दाखवत) हिने मला नुसते हवालदिल करून सोडले आहे. प्लीज, त्याला यातून बाहेर काढा.”, असे म्हणून ती एकदम रडायला लागली. मग अर्णवच्या बाबांनी तिला शांत केले व स्वतः सांगायला सुरुवात केली, “काही नाही हो डॉक्टर, मनाला फारच लावून घ्यायची हिला सवय झाली आहे. पराचा कावळा करते. प्रॉब्लेम झाला आहे अर्णवच्या अभ्यासात. पण जरा शांतपणे तुमच्यासारखा तज्ज्ञाचा सल्ला घेऊन मार्ग शोधण्यासाठीच तर आलो आहोत.

आमचा अर्णव आधी अभ्यासात व्यवस्थित होता. म्हणजे चांगले मार्क मिळायचे त्याला. सर्व विषयात आधी चांगला होता, दुसरीपर्यंत. परंतु तिसरीपासून हळूहळू गाडी घसरायला सुरुवात झाली. ८०–८५ मार्क मिळवणारा ७० वर आला. गेल्या वर्षी ६० पर्यंत आला आणि आता तर तीन विषयात नापास, पहिल्या सहामाही परीक्षेत. म्हणून खूप काळजी वाटते आहे. का असा मागे पडतो आहे, तेच कळत नाही.”

“बरं, त्याच्या जन्मापासूनची माहिती कळेल का?”

“हो, सांगतो ना. नॉर्मल डिलि‌‍वरी होती. त्याला, आईला काही प्रॉब्लेम नव्हता. जन्मानंतरसुद्धा व्यवस्थित वाढ होत होती. त्याचे मान धरणे, रांगणे, बसणे, चालणे, बोलणे सगळेच अगदी वेळेवर झाले. दुसरा काही मोठा आजारही नाही. छोटे सर्दी, ताप सोडून काही नाही. आता हा वेगळाच प्रॉब्लेम आमच्यासमोर उभा राहिला आहे. काय करावे तेच कळत नाही, डॉक्टर. अर्थात, म्हणूनच तुमच्याकडे आलो आहोत.  प्लीज, आम्हांला मदत करा.”

    “हे बघा, अभ्यासात मागे पडण्याची तीन मुख्य कारणे असतात. एकतर बुद्धी सर्वसाधारण बुद्ध्यांकापेक्षा कमी असणे, अध्ययनक्षमता कमी असणे किंवा भावनिक संतुलन बिघडलेले असणे, अशी तीन  प्रकारची मुख्य कारणे असतात. त्यापैकी तुमच्या अर्णवच्या बाबतीत कोणते कारण आहे याचा आपण शोध घेऊ या. म्हणजे त्याप्रमाणे उपचारांची दिशा ठरवता येईल.”

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता अर्णवविषयी आणखी माहिती गोळा केली जाईल किंवा त्याच्या काही मानसिक, बौद्धिक चाचण्या घेतल्या जातील. म्हणजे त्यातून निदान होईल, पुढच्या उपचारांची दिशा ठरवता येईल.

आमच्याकडे येणाऱ्या  १० पैकी जवळजवळ ६–७ मुलांची ही समस्या असते की, आमचा मुलगा/मुलगी अभ्यासात मागे पडत चालला/ली आहे. त्यामुळे त्याच्या केसची पूर्ण माहिती घेऊन, बौद्धिक, मानसिक चाचण्या घेऊन वरील तीन कारणांचा शोध घेतला जातो व त्या त्या कारणाप्रमाणे पुढच्या उपचारांची दिशा ठरते.

माणसाचा बुद्ध्यांक ९०–११० च्यामध्ये असेल तर ती सामान्य बुद्धिमत्ता असते. त्याच्यावर (११०–१४०) बुद्ध्यांक असेल तर ती उच्च बुद्धिमत्ता व १४० च्यावर बुद्ध्यांक असेल तर ती अतिउच्च बुद्धिमत्ता व त्या मुलाला ‘वरदान मिळालेले मूल ’ (Gifted child) म्हणतात.

बुद्ध्यांक ९० ते ७० दरम्यान असेल तर ते मूल ‘गतिमंद’ (Slow Learner) मानले जाते. अर्थात काही वेळा भावनिक,  अन्य न्यूरॉलॉजिकल/मेंदूचे विकार यामुळेही ८०–९० बुद्ध्यांक असू शकतो.

 ७० पेक्षा कमी बुद्ध्यांक असल्यास मूल मतिमंद मानले जाते. त्यातसुद्धा ५० पर्यंत सौम्य मतिमंद, ३५ पर्यंत मध्य, २० पर्यंत तीव्र, २० च्याही खाली अतितीव्र मतिमंदत्व मानले जाते.

बऱ्याचदा गतिमंदत्व, सौम्य मतिमंदत्व हे सुरुवातीला लक्षात येत नाहीत. वरच्या इयत्तांमध्ये गेल्यावर ते लक्षात येऊ शकते, ते सुद्धा बुद्ध्यांकचाचणी केल्यावरच! मूल गतिमंद असेल तर अभ्यासाची दिशा त्याप्रमाणे ठरवावी लागते. स्वतंत्रपणे अभ्यास कसा घ्यावा याचे पालकांना, शिक्षकांना  मार्गदर्शन केले तर मदत मिळू शकते. मतिमंदत्व असेल तर मात्र त्यांच्यासाठीच्या वेगळ्या शाळेत घातले तर प्रगती होऊ शकते. विशेषतः सौम्य मतिमंद मुले लक्षणीय प्रगती करू शकतात. आत्मविश्वासाने जगात वावरण्यास पात्र ठरताना, अडथळा असतो तो पालकांना हे मान्य/स्वीकार होण्याचा! बऱ्याचदा नीट समजल्यावरही, त्या शाळेतील मुले विचित्र दिसतात, माझे मूल आणखी मतिमंद होईल, वगैरे अनाठायी धास्ती मनात बाळगून साधारण शाळेत ठेवण्याचा  अट्टाहास करतात व पर्यायाने (स्वप्रतिष्ठेच्या नादात) मुलाचे नुकसान करतात.

दुसरा भाग आपण बघितला तो अध्ययन अक्षमतेचा. अध्ययन अक्षमता किंवा Learning Disability मध्ये बुद्ध्यांक हा सर्वसाधारण (९०–११०) किंवा त्यापेक्षा जास्त उच्च (११०–१४०) असू शकतो. त्याची ऐकण्याची, दिसण्याची क्षमता ही नॉर्मल/साधारणपणे व्यवस्थित असते. मेंदूचे इतर कोणतेही विकार नसतात. तरीही ते मूल मागे पडत असते. बुद्ध्यांक जरी साधरण वा जास्त असला तरी त्याचे जे दोन भाग – verbal IQ व performance IQ – असतात, त्याच्यामध्ये जास्त तफावत असते. साधारणपणे थोडी तफावत असतेच. पण त्यापेक्षाही जास्त तफावत असेल तर अध्ययन अक्षमतेची (L.D.ची) शक्यता जास्त असते. तसे असेल तर मग पुढे त्याच्या स्पेशल टेस्ट (चाचण्या) या मुंबईतील नायर हॉस्पिटलचा मनोविकार विभाग व शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचा बालरोग विभाग या दोनच ठिकाणी होतात. त्यानुसार मग जे निदान असेल त्याप्रमाणे अभ्यासात बदल करावा लागतो, ज्याला Remedial Education असे म्हणतात. अध्ययन अक्षमतेचे चार मुख्य प्रकार असतात; वाचन अक्षमता (Reading Disorder), लेखन अक्षमता (Writing Disorder, dysgraphia), गणिती अक्षमता (Mathematical Disorder, Dyscalculia) व भाव लेखन/स्वलेखन अक्षमता (Disorder of Writing Expression). यापैकी ज्या प्रकारची अक्षमता असेल त्याप्रमाणे त्या मुलाला Remedial Education दिले तर हळूहळू लक्षणीय प्रगती घडू शकते. थॉमस एडिसन, अल्बर्ट आईनस्टाईन वगैरेसारख्या थोर शास्त्रज्ञांनादेखील अध्ययन अक्षमता होती, ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे. म्हणजे आपल्या मुलाचा  प्रॉब्लेम समजून  घेऊन त्याला त्याप्रमाणे योग्य मदत केली तर आपण ‘एडिसन’ घडवू शकतो, हे  लक्षात घेतले पाहिजे!

तिसरी समस्या भावनिक व वर्तणूक विषयीची समस्या. घरातील व शाळेतील वातावरण, मुलाचा स्वभाव यामुळे मुलांना लहान वयातसुद्धा चिंता, नैराश्य  येऊ शकते. किंवा  त्यांना  अतिचंचलपणा  वगैरेसारख्या इतर वर्तणूकविषयी समस्या असतील तरी या  सर्वांचा  मुलांच्या  अभ्यासावर परिणाम  होतो. कारण  त्यांना  ‘टेन्शन’ आलेले असते, टेन्शन (ताणतणाव) म्हणजे

      जे मनात असते, शरीरावर दिसते

      कामातून कळते, नात्यातून बोलते.

मुलांच्या मनातील ताणतणाव  ते  बोलू, सांगू शकत नाहीत, त्यामुळे मनोशारीरिक समस्या, अभ्यासात मागे पडणे  आदी  लक्षणातून  ते बाहेर येते. पुढच्या लेखात आपण या  सर्व  समस्यांचा  विचार  करणारच  आहोत.

अभ्यासात  मागे पडण्याची कारणे आपण पाहिली. पण ती स्वीकारून पुढे जाणे महत्वाचे असते. त्यासाठी पालकांकडूनही ‘स्वीकार केला जाणे महत्वाचे. त्यासाठी गीताईत सांगितल्याप्रमाणे  वृत्ती हवी,

   ‘हानिलाभ हारजीत सुखदु:खे करी सम!’

-    डॉ. अद्वैत  पाध्ये

मानसोपचार तज्ज्ञ­