सेल्फी ससा

दिंनाक: 04 Mar 2019 15:42:31

 
एका जंगलात एक ससा राहत होता. जंगलातील प्राण्यांनी त्याचे नाव ‘सेल्फी’ ठेवले होते. कारण बघावं तेव्हा तो आपल्या मोबाईलवर सेल्फी घेत असायचा. शाळेत जाताना, खेळताना, मित्रांसोबत डबा खाताना असे प्रत्येक वेळी तो सेल्फी घ्यायचा आणि मित्रांना दाखवायचा. सेल्फी काढणे हा त्याचा छंदच होता. एकदा काय झाले, मित्रांकडून कौतुक मिळवण्यासाठी त्याने वाघाच्या गुहेबाहेर उभे राहून सेल्फी घेतला. सेल्फी घेताना वाघोबा आपल्या मागे उभा आहे, हे लक्षात आल्यावर त्याने मागे वळूनही न पाहता धूम ठोकली. सगळ्यांकडून कौतुक करून घेण्यासाठी मधमाश्याच्या पोळ्याशेजारी, नदीकाठी, आत दाट जंगलात जाऊन तो सेल्फी घेत असे. यात त्याच्या जिवाला धोका असल्याने त्याचे मित्र त्याला असे न करण्याबाबत समजावत असत, पण तो कोणाचंही ऐकत नसे.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले... शाळेने वर्षा सहलीचे आयोजन केले. शाळेतील सारे प्राणीविद्यार्थी वर्षा सहलीसाठी तयार झाले. डोंगरकड्यावरती सारे जण सहलीसाठी जाणार होते. ठरलेल्या दिवशी सारे प्राणी डोंगरावर जमा झाले. पाऊस पडून गेला होता म्हणून सगळीकडे छान प्रसन्न वाटत होते.
गुरुजींनी सगळ्यांना एकत्र खेळायला सांगितले होते. मिकू उंदीर आणि पिंकी खारूताई बॅडमिंटन खेळत होती. तर टेडी अस्वल, बबली हरीण लपाछपी खेळण्यात दंग होते. सारे प्राणी मज्जा-मस्ती करत होते. सेल्फी ससा मात्र एका गटात काही वेळ खेळून तिथे सेल्फी घेत होता. सेल्फी काढून झाल्यावर दुसर्‍याच्या खेळात सामील होऊन तिथेही सेल्फी घेऊन बाजूला होत होता. त्यामुळे त्याला कोणताच खेळ एन्जॉय करता आला नाही. नंतर मात्र त्याला स्वतःलाच त्यांच्यासोबत खेळायचा कंटाळा आला.
‘खेळ काय आपण रोजच खेळतो, एवढ्या लांब डोंगरावर आलोच आहोत; तर काहीतरी भन्नाट करू’, असा तो विचार करू लागला. असा विचार करतच लांब मित्रांपासून दूर तो डोंगराच्या कड्यावर आला. ‘या कड्याच्या खाली काय असेल बरं... पुढे जाऊन पाहायला हवं...’ असं मनातल्या मनात म्हणत तो हळूहळू पुढे सरकला व त्याने त्या कड्यावरून खाली पाहिले, तर त्याला खूप खोल खोल नदी आणि झाडीच झाडी दिसली. असं काही आधी न पाहिल्याने त्याला मज्जा वाटली.
आपण या कड्यावर उभं राहून नदीचा व झाडीचा फोटो घ्यायचा व सगळ्यांना आश्चर्यचकित करायचे असा तो विचार करू लागला. सेल्फी ससा कड्याच्या एकदम टोकाला उभे राहण्यासाठी हळूहळू अजून पुढे जाऊ लागला. पाऊस पडून गेल्याने जमीन भुसभुशीत झाली होती. त्यातच पुढे जाताना सेल्फी सशाचा पाय घसरून तोल गेला आणि तो कड्यावरून खाली पडला.
 इकडे बराच वेळ सेल्फी ससा कुठेच दिसेना; म्हणून सारे मित्र त्याला शोधत होते. शोधत शोधत सारे जण डोंगराच्या कड्यावर आले. तिथे त्यांना सेल्फीचा मोबाईल पडलेला दिसला. ‘‘अरे, हा तर सेल्फी सशाचा मोबाईल आहे...’’, पिंकी खारूताई मोबाईल हातात घेत म्हणाली.
 आता सार्‍यांना सेल्फीची काळजी वाटू लागली. गुरुजींनी सेल्फीला हाका मारायला सुरुवात केली. गुरुजींचा आवाज ऐकून सेल्फीनेही जोरात आवाज दिला, ‘‘गुरुजी मी इकडे आहे. मला वाचवा’’, सेल्फी जोरात ओरडत होता. सार्‍यांनी आवाजाच्या दिशेने लक्ष दिला. सेल्फी कड्याखाली एका झाडाच्या फांदीला लटकला होता. सगळा प्रकार गुरुजींच्या लक्षात आला. गज्जू हत्ती पटकन जाऊन दोरी घेऊन आला. सार्‍या प्राण्यांनी प्रयत्न करून सेल्फीला वर काढले. सेल्फी ससा वर येऊन रडू लागला. त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने आपण पुन्हा असे काही नाही करणार, असे गुरुजींना व मित्रांना वचन दिले.
उत्कर्षा मुळे-सागवेकर
9769141074