माणसातला देव

दिंनाक: 30 Mar 2019 17:06:49


मराठी शाळेत शिकत असताना दुपारच्या मधल्या सुट्टीत तो मला नेहमी भेटायचा. शाळेच्या गेटपाशीच तो उभा असायचा. खाकी रंगाची जाड हाफ पँट आणि शुभ्र पांढरा घोळदार अंगरखा घातलेला तो तगडा आईसफ्रूटवाला शाळेची घंटा वाजायच्या आधीच डोक्यावर जाडजूड पत्र्याची निळ्या रंगाची पेटी घेऊन येताना दिसे. खिडकीतून माझी नजर त्यालाच न्यहाळत असे. सुट्टीची घंटा वाजली रे वाजली की आम्ही सर्व जण धावत जाऊन त्या आईसफ्रूटवाल्याच्या भोवती गर्दी करत असू. कांडी मिळवण्यासाठी सर्वांचीच एकसाथ धडपड चाले. पन्नास पैशाचं नाणं त्या आईसफ्रूटवाल्याच्या हातात दाबून त्याच्याकडची कांडी मिळवायची आणि लगेचच चोखायला सुरुवात करायची. शेवटी काडीवर राहिलेला वितळून जाणारा बर्फही कडामकुडुम खाऊन टाकायचा. त्यातला आनंद अवीट होता. थंडगार घशानं मुद्दाम हवा सोडत ‘हाsss हूsss’ करून इतरांना चिडवायचं.

पुढे बाल्य हरवलं तसा तो आईसफ्रूटवालाही हरवला. गाव सुटलं. शाळा – कॉलेज करत मुंबईला आलो. उत्तम शिकलो. डॉक्टर बनलो. हृदयरोगतज्ञ म्हणून शहरात बरीच ख्याती मिळवली. तरी का कुणास ठाऊक, माझ्या मनात तो आईसफ्रूटवाला नेहमी अध्येमध्ये डोकावायचा.

“सर्वांना देणार... गडबड नको, एकेकाने या... हळूहळू. पैसे पाडू नका आणि आईसफ्रूटही पाडू नका.”

त्याचा धीरगंभीर आवाज आणि हसतमुखानं काम करण्याची पद्धत आजही मला अवचित आठवे. माझ्याशी तर दोस्तीच होती त्याची. मला तो खूप आवडायचा. मला आठवतं – एकदा सुट्टीची घंटा वाजताच मी नेहमीप्रमाणे त्या आईसफ्रूटवाल्याकडे धाव घेतली. धावताना खिशातलं पन्नास पैशाचं नाणं गडबडीत कुठेतरी हरवलं. धावत जाऊन आईसफ्रूटची कांडी मिळवली, पण खिशात हात घालतो तर नाणं गायब. एका हातानं आईसफ्रूटचं गळणारं पाणी चोखत शर्ट-पँटचे खिसे तपासूनही ते सापडलं नाही. बरं, दुसरे पैसेही जवळ नव्हतेच. आता आईसफ्रूटवाला रागावेल म्हणून उष्टी कांडी त्याला परत देऊ लागलो. आजूबाजूची मुलं फिदीफिदी हसू लागली. आता तो माझ्या थोबाडीत मारून “कांडी उष्टी का केलीस?” असं विचारणार, असंच साऱ्यांना वाटलं. पण तो आईसफ्रूटवाला नेहमीप्रमाणे हसला.

“उद्या देईन पैसे.”

“नको. मी आता दोन-चार दिवस येणार नाहीये... राहू देत तुझे पैसे. पन्नास पैशाने माझं काही कमी होणार नाही.”

पुढे बरेच दिवस तो आलाच नाही. जेव्हा आला तेव्हा तो आणि मी, दोघेही हा प्रसंग विसरून गेले होतो. आठवण असूनही असेल, पण त्यानं कधीच ते पैसे माझ्याकडे मागितले नाहीत. मीही परीक्षेच्या गडबडीत विसरून गेलो.

आज अचानक तो आईसफ्रूटवाला आणि तो प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे, पेशंटच्या गर्दीतून रांगेतून ओशाळवाणं हसत एक वृद्ध गृहस्थ माझ्यासमोर आले. त्यांचा चेहरा का कुणास ठाऊक, मला परिचित वाटू लागला. सत्तरी ओलांडली असली तरी त्यांचं शरीर खूप काटक होतं. पण हृदय थकलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनी खूप खटपट करून त्यांना गावाकडून माझ्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलं होतं. गावाकडच्या डॉक्टरांनी चिट्ठी देऊन त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. मी तपासायला सुरुवात करताच ते माझ्याकडे बघून हसले आणि तो बालपणीचा आईसफ्रूटवाला मला पुन्हा आठवला. मी त्यांच्या हृदयाचा आलेख (ईसीजी) काढला. त्यांचा आजार गंभीर होता, पण उपचाराने बरा होणार होता. मी त्यांना दवाखान्यात दाखल करून घेण्याची सूचना केली.

त्यावर माझा एक सहकारी म्हणाला, “त्यांचं बिल कोण देणार डॉक्टर? त्यांच्याकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे पुरेसे पैसे नाहीत. आपलं नुकसान होईल त्यांना दाखल करून घेतलं तर.”

“असू दे. बिलाचं नंतर पाहू. आधी त्यांना दाखल करून घ्या.”

मी त्यांच्यावर उपचार सुरू केले. पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि माझे उपचार यामुळे पंधरा दिवसांतच ते खडखडीत बरे झाले. मी रोज त्यांच्या कॉटपाशी त्यांना तपासायला गेलो की ते फक्त हसायचे. पंधरा दिवसांनी मी त्यांना म्हटलं, “आजोबा, आता तुम्ही पूर्णपणे ठणठणीत बरे झालात. घरी परत जायला हरकत नाही.”

ते विलक्षण आनंदून गेले. पण लगेचच गंभीर होत म्हणाले, “डॉक्टरसाहेब, तुमचं बिल भरल्याशिवाय मला इथून सोडणार नाहीत ना? माझ्या मुलानं फक्त थोडेच पैसे भरलेत... पुढचे भरणं शक्य नाही. गावाकडे जाऊन पुन्हा धंदा सुरू केला की पाठवीन हळूहळू तुमचे सगळे पैसे.”

“ठीक आहे... पैशाची काळजी करू नका. तब्येतीची मात्र काळजी घ्या... पण काय हो आजोबा, कोणता धंदा करता तुम्ही?”

“मी शाळेजवळ आईसफ्रूट विकतो. हल्ली सोबत दुधाची कुल्फीही विकतो. दर वाढवलाय आता थोडा, पण मुलांना परवडायला हवं ना? म्हणून दोनच रुपये ठेवलाय... दिवसाकाठी पन्नास-साठ रुपये मिळतात. मी पाठवीन तुमचे पैसे. फेडीन सगळे हळूहळू.”

हा तोच आईसफ्रूटवाला असल्याची माझी खात्री पटल्याने मी क्षणभर स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्याबरोबर मी रागावलो असं समजून ते ताडकन कॉटवरून उठले. त्यांनी माझे पायच धरायला सुरुवात केली. मी तत्काळ खांदे पकडून त्यांना थांबवलं.

“अहो आजोबा, बिलाची कसली काळजी करताय? तुमचं बिल मिळालंय मला वीस वर्षांपूर्वीच!”

“वीस वर्षांपूर्वी? ते कसं काय?”

“अहो, गावाला शाळेत शिकत असताना तुमच्याकडून रोज आईसफ्रूट घ्यायचो. एकदा पैसे हरवले तरी तुम्ही पैसे न घेताच आईसफ्रूट दिलं होतं. त्या पन्नास पैशांचं व्याज किती झालं असेल सांगा गेल्या वीस वर्षांत? खरं सांगू का, त्या पन्नास पैशांचं मोल कदाचित करता येईल. पण त्यामागच्या तुमच्या सद्भावनेचं मोल कसं करता येईल? खरं ना? तेव्हा जा तुम्ही. तुमचं सगळं बिल मला मिळालं.” असं म्हणून मीच आजोबांना नमस्कार केला.

“डॉक्टर, तुम्ही देवासारखे आहात. मला वाचवून खूप उपचार केलेत माझ्यावर.”

आईसफ्रूटवाल्याच्या डोळ्यांत पाणी तरारून आलं.  

“आजोबा, देव शेवटी माणसातच असतो ना? तुम्ही मला त्या वेळी देवासारखे वाटला होतात. आज मी तुम्हाला देवासारखा वाटतो आहे. शेवटी देव शोधायचा तो माणसातच.”

असं म्हणून मी त्या आईसफ्रूटवाल्याची मोठ्या सन्मानानं पाठवणी केली.

- प्रा. सुहास द. बारटक्के